

झारखंडच्या गिरीडीह जिल्ह्यातील जामुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिरसिया गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नी माहेरी वारंवार जात असल्याच्या रागातून एका पतीने थेट जेसीबी घेऊन सासरच्या घरावर हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जेसीबी चालवत सासरच्या घरी धडक
मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याने पत्नी माहेरी राहत होती. याच कारणावरून संतप्त झालेल्या पतीने बुधवारी (दि. २४) रात्री स्वतः जेसीबी चालवत सासरच्या घरी धडक दिली. त्यावेळी घरातील सदस्य झोपेत होते.
“घरच उरणार नाही, मग...
प्रत्यक्षदर्शी आणि नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, आरोपी मोठ्याने ओरडत पत्नीला पुन्हा माहेरी राहता येणार नाही, अशी धमकी देत होता. “घरच उरणार नाही, मग माहेरी कशी राहणार?” असे म्हणत त्याने जेसीबीच्या साहाय्याने घराची भिंत तोडण्यास सुरुवात केली.
अंधाराचा फायदा घेत...
अवघ्या काही मिनिटांतच घराची एक संपूर्ण भिंत जमीनदोस्त करण्यात आली. आरोपी मुख्य घर पाडण्याच्या तयारीत असतानाच जेसीबीचा मोठा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. गावकऱ्यांचा विरोध वाढताच आणि पकडले जाण्याची भीती वाटू लागल्याने आरोपी अंधाराचा फायदा घेत जेसीबीसह घटनास्थळावरून फरार झाला.
गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू
या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पीडित सासरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जामुआ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे.