

नवी दिल्ली : मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) च्या प्रक्रियेत कथित अडथळे आणल्याच्या आरोपावरून व्होडाफोन आयडिया (Vi) अडचणीत आले आहे. प्रतिस्पर्धी कंपन्या भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओने Vi विरोधात दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (Telecom Regulatory Authority of India - TRAI) तक्रार केली आहे. ग्राहकांना आपला मोबाइल नंबर दुसऱ्या कंपनीत पोर्ट करता येऊ नये, यासाठी Vi कडून गैरप्रकार केले जात असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. या आरोपांची TRAI ने दखल घेत चौकशी सुरू केली असून, तक्रारींची तपासणी करून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती TRAI चे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी दिली.
TRAI ने Vi कडे मागितला खुलासा
'बिझनेस स्टँडर्ड' च्या वृत्तानुसार, TRAI ने हा मुद्दा थेट Vi समोर मांडला असून, तक्रारींमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची अंतर्गत तपासणी करण्यास कंपनीला सांगितले आहे. त्यामुळे आता Vi च्या चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे दूरसंचार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
Vi वर नेमके आरोप काय?
एअरटेल आणि जिओने केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या ग्राहकांना प्रतिस्पर्धी कंपन्यांचे अधिकारी असल्याचे भासवून काही व्यक्तींकडून फोन केले जात होते. या फोनवर ग्राहकांना लवकरच टॅरिफ दर वाढणार आहेत किंवा प्लॅनमध्ये बदल होणार आहेत, असे सांगितले जात असल्याचा आरोप आहे.
यानंतर संबंधित ग्राहकांना आपला मोबाइल नंबर Vi च्या नेटवर्कवर पोर्ट करण्याचा पर्याय सुचवला जात असल्याचा दावा एअरटेल आणि जिओने केला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दिशाभूल करणाऱ्या पद्धतींचा वापर केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
UPC जनरेट करणारे SMS रोखल्याचा आरोप
काही दूरसंचार सर्कलमध्ये MNP साठी आवश्यक असलेला युनिक पोर्टिंग कोड (UPC) मिळवण्यासाठी १९०० या क्रमांकावर पाठवले जाणारे SMS Vi कडून कथितरीत्या रोखले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ग्राहकांनी आपला नंबर दुसऱ्या नेटवर्कवर पोर्ट करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर UPC जारी करण्यात अनावश्यक विलंब होऊ नये, अशी तरतूद MNP नियमांमध्ये आहे. त्यामुळे SMS रोखणे किंवा UPC प्रक्रियेत अडथळा आणणे हे नियमांचे उल्लंघन ठरू शकते, असा एअरटेल-जिओचा दावा आहे.
Vi चे सवलतीचे प्लॅनही चर्चेत
MNP च्या माध्यमातून ग्राहकांना Vi च्या नेटवर्कवर आणण्यासाठी कंपनीकडून सवलतीचे पोस्टपेड टॅरिफ प्लॅन मोठ्या प्रमाणावर प्रसारित आणि प्रोत्साहित केले जात असल्याचाही आरोप दोन्ही कंपन्यांनी केल्याचे समजते.
मात्र, Vi ने हे आरोप फेटाळून लावले आहेत. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी निष्पक्ष स्पर्धा, आपल्या उत्पादनांची गुणवत्ता आणि ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या मूल्यावर विश्वास ठेवते. तसेच कंपनी आपला व्यवसाय कायद्याचे पालन करूनच चालवत असल्याचे Vi ने स्पष्ट केले आहे.
ग्राहकसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात Vi
हे आरोप अशा वेळी समोर आले आहेत, जेव्हा Vi ने बर्याच वर्षांनंतर पुन्हा आक्रमकपणे बाजारपेठेत आपली छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. कंपनी ५ जी नेटवर्कच्या दिशेने पावले टाकत असून, दर महिन्याला ग्राहकसंख्या वाढवण्यावर भर देत आहे.
कंपनीने २०२८-२९ या आर्थिक वर्षापर्यंतच्या सुमारे ४५ हजार कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाच्या चक्रासाठी बँकांकडून ३५ हजार कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. त्यामुळे ग्राहकसंख्या आणि बाजारातील हिस्सा वाढवणे Vi साठी महत्त्वाचे ठरत आहे.
Vi कडून दरवाढ नाही
दरम्यान, आपल्या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांमध्ये Vi ही अशी कंपनी आहे, जिने अद्याप आपल्या टॅरिफ प्लॅनच्या दरांमध्ये वाढ केलेली नाही. दुसरीकडे, बाजारपेठेत एअरटेल आणि जिओसह दूरसंचार कंपन्यांमध्ये ग्राहकांसाठी विविध योजना आणि सेवा आणण्याची स्पर्धा सुरू आहे.
आता MNP च्या आरोपांची TRAI कडून सुरू असलेली चौकशी कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचते आणि Vi विरोधात पुढील कोणती कारवाई होते, याकडे दूरसंचार क्षेत्रासह ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.