VIDEO : लखनऊमधील झोपडपट्टीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांमुळे शेकडो झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर

लखनऊच्या विकासनगर झोपडपट्टीत भीषण आग लागून शेकडो घरे जळून खाक झाली. या घटनेमुळे शेकडो नागरिक बेघर झाले आहेत.
VIDEO : लखनऊमधील झोपडपट्टीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांमुळे शेकडो झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर
VIDEO : लखनऊमधील झोपडपट्टीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांमुळे शेकडो झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर(Photo-X/@PTI)
Published on

उत्तर प्रदेशातील लखनऊच्या विकासनगर भागातील झोपडपट्टीत बुधवारी (दि.१५) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या असून अनेक कुटुंबांचे संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. या घटनेमुळे शेकडो नागरिक बेघर झाले आहेत.

वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली

माहितीनुसार, जोरदार वारा आणि झोपड्यांमध्ये असलेल्या ज्वलनशील साहित्यामुळे काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. काळ्या धुराचे लोट अनेक किलोमीटर दूरपर्यंत दिसत होते.

स्थानिकांच्या मते, आगीत छोट्या एलपीजी सिलिंडरचे स्फोट झाले, ज्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली.

काही माध्यमांच्या वृत्तानुसार, या आगीत २ मुलींचा होरपळून मृत्यू झाला आहे. यातील एक मुलगी २ वर्षांची तर दुसरी अवघ्या २ महिन्यांची होती. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

आग विझवण्यासाठी किमान १० अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. सिलिंडर स्फोटांमुळे बचावकार्य करताना अडथळे निर्माण झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली.

काहीच उरलं नाही...

गुरुवारी सकाळी नागरिक आपल्या जळालेल्या घरांच्या अवशेषांमध्ये उरलेसुरले सामान शोधताना दिसले. अनेकांच्या हाती काहीच लागले नाही. "काहीच उरलं नाही, सगळं जळून गेलं," असे एका महिलेनं सांगताना तिचे अश्रू अनावर झाले.

जळालेले कपाट, वाकलेल्या पेट्या, सायकल, भांडी, गॅस स्टोव्ह आणि कपड्यांचे ढिगारे सर्वत्र दिसत होते. काही ठिकाणी अर्धवट जळालेल्या भाज्याही आढळून आल्या.

आयुष्यभराची कमाई क्षणात राख

दीपा नावाच्या घरकाम करणाऱ्या महिलेने सांगितले, "मी हळूहळू सगळं जमा केलं होतं, पण आता काहीच उरलं नाही."

दुसऱ्या महिलेने सांगितले, "पतीच्या निधनानंतर मी एकटीने पाच मुलांना वाढवलं. थोडे पैसे आणि दागिने साठवले होते, पण तेही आगीत जळून गेले."

सीतापूरमधील महमूदाबाद येथील एका व्यक्तीने सांगितले की, लग्नासाठी साठवलेले २ ते ३ लाख रुपयांचे साहित्य या आगीत जळून खाक झाले. "५० हजारांचे कर्ज घेतले होते, पण सगळं संपलं," असे त्यांनी सांगितले.

जनावरांचेही नुकसान

मजुरी करणाऱ्या सुरेश यांनी सांगितले की, "त्यांच्या काही शेळ्या बेपत्ता झाल्या असून त्या आगीत मृत्यूमुखी पडल्याची शक्यता आहे."

क्षणात झोपड्या उद्ध्वस्त

ढोल वाजवण्याचे काम करणाऱ्या दीपक यांनी सांगितले, "मी कामावर होतो. परत आलो तेव्हा सर्व काही जळून गेले होते. माझी मोटारसायकल, सायकल आणि साठवलेले अन्नधान्यही नष्ट झाले. आता अंगावरील कपड्यांखेरीज काहीच उरले नाही."

मदत व पुनर्वसनाची प्रक्रिया

या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने मदत आणि पुनर्वसनाची प्रक्रिया वेगाने राबवण्याचे निर्देश दिले होते. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी सध्या तपास सुरू आहे.

या भीषण आगीमुळे शेकडो कुटुंबांचे संसार एका रात्रीत उद्ध्वस्त झाले असून सध्या त्यांच्यासमोर जगण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in