

मध्य प्रदेशातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून नवी चर्चा रंगली आहे. या व्हिडीओमध्ये काही जण धार्मिक विधीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दूध नदीत सोडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सिहोर जिल्ह्यातील नर्मदा नदीकाठी असलेल्या पाताळेश्वर महादेव मंदिर परिसरातील असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर धार्मिक प्रथा, पर्यावरण आणि अन्नाच्या असमानतेबाबत देशभरात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. भक्तांनी अंदाजे ११,००० लिटर दूध नदीत अर्पण केल्याची माहिती समोर येत आहे.
दररोज १५१ लिटर दूध नर्मदा नदीला अर्पण
माध्यमांच्या वृत्तानुसार, शिवानंद दादाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली टँकरमधून दूध नदीत सोडण्यात आले. हा प्रकार २१ दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. माहितीनुसार, या कालावधीत दररोज सुमारे १५१ लिटर दूध नर्मदा नदीला अर्पण केले जाते, तर समारोपाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात दूध नदीत सोडण्यात आले. हा संपूर्ण प्रकार ड्रोनद्वारे चित्रित करण्यात आला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रद्धा की वादग्रस्त प्रथा?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओचे काहींनी धार्मिक श्रद्धेचा भाग मानत समर्थन केले आहे. नदीला पवित्र मानून जलजीवांना अन्न देण्याच्या उद्देशाने हा विधी केल्याचे भक्तांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, या अर्पणामुळे आशीर्वाद आणि आध्यात्मिक समाधान मिळते.
मात्र, या घटनेमुळे मतभेदही निर्माण झाले आहेत. काहींनी धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला आहे, तर अनेकांनी पर्यावरणीय हानी आणि अन्न वाया जाण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. "अशा प्रकारे दूध नदीत सोडण्याचा उल्लेख कोणत्या धर्मग्रंथात आहे?" असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे.
पर्यावरणावर होणारा परिणाम
माहितीनुसार, दूध निरुपद्रवी दिसत असले तरी मोठ्या प्रमाणात नदीत सोडल्यास त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
दुधामध्ये फॅट, प्रथिने आणि साखर यांसारखे सेंद्रिय घटक मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक पाण्यात मिसळल्यावर त्यांचे विघटन वेगाने होते आणि त्यासाठी पाण्यातील ऑक्सिजनचा वापर होतो. यामुळे पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन कमी होतो.
ऑक्सिजनची पातळी घटल्यास मासे आणि इतर जलजीवांसाठी परिस्थिती धोकादायक ठरू शकते. काही वेळा यामुळे मासेमारीवर परिणाम, शेवाळाची वाढ आणि नदीतील जैवविविधतेत बिघाड होण्याची शक्यता असते.
अन्न वाया जाण्याचा प्रश्न
या घटनेमुळे अन्न वाया जाण्याच्या मुद्द्यावरही संताप व्यक्त करण्यात येत आहे. "देशातील अनेक भागांमध्ये कुपोषण, ॲनिमिया आणि अन्नाची कमतरता ही गंभीर समस्या असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात दूध वापरणे योग्य आहे का?" असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सोशल मीडियावर काही युजर्सनी ही कृती धर्माच्या नावाखाली चुकीची असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी "गरीब मुलांना भेसळयुक्त दूध मिळते, आणि येथे इतके दूध वाया जाते," अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
व्यापक चर्चेला तोंड
ही घटना केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित न राहता पर्यावरणीय जबाबदारी आणि सामाजिक समतोल या मोठ्या प्रश्नांना पुन्हा एकदा उजाळा देत आहे. श्रद्धा आणि जबाबदारी यामध्ये संतुलन राखण्याची गरज असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे.
तसेच, कोणताही ठोस आधार नसताना अशा कृती करून समाजाला संदेश देणे योग्य नसल्याचेही काहींचे मत आहे. एकूणच, या घटनेमुळे धार्मिक आस्था, पर्यावरण संवर्धन आणि संसाधनांच्या योग्य वापराबाबत देशभरात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.