

नवी दिल्ली : नीट-यूजी २०२४ च्या प्रश्नपत्रिकेची चोरी किंवा चोरी केलेल्या प्रश्नपत्रिकेचे वितरण करण्यात संजीव कुमार उर्फ संजीव मुखिया याचा कोणताही सहभाग असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत, असे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी स्पष्ट केले. २०२४ मध्ये बिहार पोलिसांनी नीट-यूजी प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणाचा शोध लावून गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले की, सुरवातीच्या टप्प्यात संजीव कुमार उर्फ संजीव मुखिया याच्यावर प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणात सहभागी असल्याचा प्रथमदर्शनी संशय व्यक्त करण्यात आला होता, कारण तो आधीच्या इतर काही पेपरफुटी प्रकरणांमध्येही सहभागी असल्याचे आढळले होते. त्यानुसार बिहार पोलिसांनी एफआयआरमध्ये त्याला आरोपी म्हणून नाव दिले होते.
तपासादरम्यान संजीव कुमार उर्फ संजीव मुखियाचा नीट-यूजी २०२४ च्या प्रश्नपत्रिकेची चोरी किंवा वितरणात सहभाग असल्याचे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे सीबीआयला मिळालेले नाहीत, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले. सखोल आणि कसून केलेल्या तपासानंतर, या संपूर्ण कटाची आणि त्यात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची ओळख पटली असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.