पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधर-अमृतसरच्या लष्करी परिसरात दुहेरी स्फोट; CCTV फुटेज व्हायरल

पहिला स्फोट मंगळवारी रात्री सुमारे ८ वाजता जालंधरमधील बीएसएफ पंजाब फ्रंटियर मुख्यालयाबाहेर उभ्या असलेल्या स्कूटरमध्ये झाला.
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधर-अमृतसरच्या लष्करी परिसरात दुहेरी स्फोट; CCTV फुटेज व्हायरल
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधर-अमृतसरच्या लष्करी परिसरात दुहेरी स्फोट; CCTV फुटेज व्हायरल(Photo-X/@airnewsalerts)
Published on

पंजाबमध्ये काही तासांच्या अंतराने दोन वेगवेगळे स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या दुहेरी स्फोटांनंतर राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पहिला स्फोट मंगळवारी रात्री सुमारे ८ वाजता जालंधरमधील बीएसएफ पंजाब फ्रंटियर मुख्यालयाबाहेर उभ्या असलेल्या स्कूटरमध्ये झाला. या स्फोटात वाहनमालक जखमी झाल्याचे 'द टाइम्स ऑफ इंडिया'ने वृत्त दिले आहे.

जालंधर स्फोटाचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

जालंधर स्फोटाचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात बीएसएफ चौक परिसरात झालेला स्फोट दिसून येत आहे.

व्हिडिओमध्ये स्फोटापूर्वी घटनास्थळाजवळ एक स्कूटर उभी असल्याचे दिसते. काही क्षणांतच मोठा स्फोट होऊन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.

स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस जखमी युवक गुरप्रीत सिंह याची चौकशी करत आहेत. तो एका कुरिअर कंपनीमध्ये काम करत असल्याचे सांगितले जात आहे.

अमृतसरमध्ये दुसरा स्फोट

दुसरा स्फोट मंगळवारी उशिरा रात्री अमृतसरमधील खासा कॅन्टोन्मेंट परिसरात झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, अटारी रोडवरील बीएसएफच्या खासा कॅम्पसमोरील आर्मी कॅम्पच्या बाहेरील भिंतीलगत हा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर तातडीने पोलिस आणि सुरक्षा दलांना घटनास्थळी तैनात करण्यात आले.

अमृतसर स्फोटात जीवितहानी नाही

अमृतसरमधील स्फोटात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणी फॉरेन्सिक तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक माहिती समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काँग्रेसकडून राज्य आणि केंद्र सरकारवर टीका

लोकसभा खासदार आणि पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वारिंग यांनी या स्फोटांवर प्रतिक्रिया देत राज्य आणि केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले.

"एकामागून एक स्फोटांनी पंजाब हादरला आहे. काल जालंधरमध्ये आणि आता अमृतसरमधील खासा कॅम्पजवळ स्फोट झाला. राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न कोण करत आहे? पंजाब सरकार अशा घटना रोखण्यात अपयशी का ठरत आहे? भारत सरकार काय करत आहे?"असा सवाल त्यांनी केला.

"गुप्तचर आणि सुरक्षा व्यवस्थेचे अपयश"

"वारंवार होत असलेल्या त्रुटी गुप्तचर आणि सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर अपयश दाखवतात. पंजाबची शांतता धोक्यात घालू दिली जाऊ शकत नाही. आम्ही जबाबदारी निश्चित करून तातडीने कारवाईची मागणी करतो," असेही त्यांनी म्हटले.

logo
marathi.freepressjournal.in