

नवी दिल्ली : देशाच्या अनेक भागात सध्या उष्णतेची भयानक लाट आली असून ही स्थिती २८ मे पर्यंत कायम राहील, असा अंदाज आहे. नऊ दिवसांच्या या अत्यंत उष्णतेच्या काळाला अनेक ठिकाणी ‘नौतपा’ असे म्हटले जाते. जैसलमेरमध्ये तापमानाने ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. भारतीय हवामान विभागाने पश्चिम राजस्थानमध्ये 'तीव्र उष्णतेची लाट' आणि पूर्व राजस्थानमध्ये ३० मे पर्यंत 'उष्णतेची लाट' असल्याचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील ७ दिवस मध्य आणि वायव्य भारतात, तर पुढील ३-५ दिवस पूर्व आणि द्वीपकल्पीय भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. २९ मे नंतर तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञ प्रवीण चौधरी यांच्या मते, 'सुपर एल निनो'च्या प्रभावामुळे हवेतील आर्द्रता कमी होऊन कोरडे हवामान निर्माण झाले आहे, ज्यामुळे तापमान ४८-५० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
देशातील अनेक राज्ये ४० अंशांपेक्षा जास्त तापमानाचा सामना करत आहेत. पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश या भागात उष्णतेची लाट आली आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर, खजुराहो, नौगाव भागात तापमानाने ४७ ते ४८ अंश सेल्सिअसचा आकडा गाठला असून तेथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भीषण उष्णतेमुळे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील सरकारी कार्यालये आणि सर्व शाळांच्या वेळा बदलल्या आहेत. २५ मे पासून या संस्था सकाळी ७:३० ते दुपारी १:३० या वेळेत सुरू राहतील.
रांचीमध्ये तीव्र पाणीटंचाई
एकीकडे उष्णतेचा कहर सुरू असताना, झारखंडची राजधानी रांचीमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठ्याचा वांधा असल्याने नागरिक पूर्णपणे महानगरपालिकेच्या टँकरवर अवलंबून आहेत. मात्र, हे टँकर सर्व भागांत पोहोचत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे.
यवतमाळमध्ये उष्माघाताचे ८ बळी?
राज्यातही दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून यवतमाळ जिल्ह्यात ४८ तासांत आठ जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू उष्माघाताचे बळी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या सर्वांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल यायचे असल्याने त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. दिग्रस येथे चोवीस तासांत तिघांच्या मृत्यूची माहिती पुढे आली होती. यासोबतच यवतमाळच्या चापमनवाडी आणि भोसा मार्गावर दोघांचे, पुसदमध्ये दोन, तर बाभुळगाव येथे एकाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. यातील चौघांची ओळख पटली असून चौघे अज्ञात आहेत.
संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट कायम असून शहराप्रमाणे ग्रामीण भागाला देखील या उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागात देखील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागात शेतीची काम दुपारी खोळंबलेली आहेत.