अवघ्या १० वर्षांच्या श्रवण सिंगला राष्ट्रपतींच्या हस्ते 'प्रधानमंत्री बाल पुरस्कार'; म्हणाला, "मला स्वप्नातदेखील...

भारताच्या सीमेवर सैनिकांसाठी धावून जाणाऱ्या श्रवण सिंग या चिमुकल्याचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 'प्रधानमंत्री बाल पुरस्कार २०२६' देऊन गौरविण्यात आले.
अवघ्या १० वर्षांच्या श्रवण सिंगला राष्ट्रपतींच्या हस्ते 'प्रधानमंत्री बाल पुरस्कार'; म्हणाला, "मला स्वप्नातदेखील...
अवघ्या १० वर्षांच्या श्रवण सिंगला राष्ट्रपतींच्या हस्ते 'प्रधानमंत्री बाल पुरस्कार'; म्हणाला, "मला स्वप्नातदेखील...
Published on

भारताच्या सीमेवर सैनिकांसाठी धावून जाणाऱ्या १० वर्षांच्या श्रवण सिंग या चिमुकल्याचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुक्रवारी (दि.२६) हस्ते 'प्रधानमंत्री बाल पुरस्कार २०२६' देऊन गौरविण्यात आले. असामान्य धैर्य, करुणा आणि देशभक्ती दाखवल्याबद्दल श्रवणला हा सन्मान मिळाला आहे. 'भारतीय सेनेचा सर्वात लहान नागरी योद्धा' अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे.

पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील ममदोट येथील शासकीय शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या श्रवण सिंगने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारत-पाकिस्तान सीमेजवळ तैनात असलेल्या जवानांसाठी अन्नपदार्थ पुरवण्याचे काम केले होते. त्याने सैनिकांना पाणी, चहा, दूध, लस्सी आणि बर्फ असे साहित्य पोहचवले होते. अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक भागातही तो सैनिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला. इतकेच नव्हे, तर त्याने जवानांना आपल्या घरी थांबण्याचीही तयारी दर्शवली होती.

श्रवणच्या या देशसेवेची दखल याआधीच लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली होती. मेजर जनरल रणजीत सिंह मनराल आणि लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कातियार यांनी त्याच्या कार्याचे कौतुक केले होते. भारतीय सेनेने पुढे जात श्रवणच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणाही केली आहे.

त्याला भारतीय सैन्यात दाखल व्हायचंय...

श्रवणचे वडील सोना सिंग यांनी सांगितले, “पहिल्याच दिवसापासून माझ्या मुलाला सैनिकांची सेवा करण्यात आनंद मिळत होता. त्यांना थोडासा आराम मिळावा म्हणून तो जे काही करत होता, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आता त्याचे स्वप्न एकच आहे, मोठे होऊन भारतीय सैन्यात दाखल होणे.”

पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करत श्रवण म्हणाला, “मला सैनिकांची मदत करायला खूप आवडतं. मी ऑपरेशन सिंदुरच्यावेळी जवानांना खायला घेऊन जायचो. लस्सी, पाणी, चहा असं घेऊन जायचो. त्यांनी मला भेटवस्तू दिल्या, माझ्यासोबत जेवण केलं आणि मला आईस्क्रीमही दिलं. मी मोठा झाल्यावर सैनिक बनून देशाची सेवा करणार आहे. हा पुरस्कार मिळेल असं मला स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं, मला खूप छान वाटतंय,” अशा भावना श्रवणने व्यक्त केल्या.

प्रधानमंत्री बाल पुरस्कार हा देशातील मुलांसाठीचा सर्वोच्च सन्मान मानला जातो. समाजासाठी असामान्य योगदान, शौर्य आणि प्रतिभा दाखवणाऱ्या बालकांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. श्रवण सिंगची ही कामगिरी देशातील प्रत्येक मुलासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

logo
marathi.freepressjournal.in