

बदायूं (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात एका अल्पभूधारक शेतकऱ्याला तब्बल १४.६६ कोटी रुपयांच्या कर नोटिसा मिळाल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या नावाचा आणि कागदपत्रांचा गैरवापर करून दिल्लीत एक बोगस कंपनी चालवली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
बदायूं जिल्ह्यातील वझीरगंज भागातील खुर्रमपूर भामोरी येथील रहिवासी भोला सिंह यांना २९ मार्च रोजी प्राप्तिकर विभागाकडून पहिली नोटीस मिळाली. यामध्ये त्यांना १.०२ कोटी रुपये थकीत कर भरण्याचे आदेश देण्यात आले होते. या धक्कादायक माहितीनंतर पाठोपाठ त्यांना जीएसटी (GST) विभागाकडून १३.६३ कोटी रुपयांच्या थकबाकीची दुसरी नोटीस बजावण्यात आली. अशा प्रकारे एकूण १४.६६ कोटी रुपयांचा कर भरण्याचे निर्देश त्यांना मिळाले आहेत.
शेतकरी भोला सिंह यांनी सांगितले की, ते कधीही दिल्लीला गेलेले नाहीत आणि त्यांनी कोणताही व्यवसाय किंवा कंपनी सुरू केलेली नाही. तपासणीत असे दिसून आले की, दिल्लीतील 'नारायणा इंडस्ट्रियल एरिया (फेज-१)' मध्ये त्यांच्या नावाने 'राम स्टोअर' नावाची फर्म चालवली जात आहे. फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने भोला सिंह यांच्या आधार आणि पॅन कार्डचा वापर करून ही कंपनी नोंदवली आणि त्याद्वारे करोडो रुपयांचे व्यवहार केले.
बदायूं जिल्हा दंडाधिकारी अवनीश राय यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी माहिती दिली कीः प्रकरणाच्या चौकशीसाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी (वित्त) आणि जीएसटी उपायुक्त यांची दोन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत या समितीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. दोषी आढळणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि थकबाकीची रक्कम त्यांच्याकडूनच वसूल केली जाईल.
अधिकाऱ्यांच्या पीडित शेतकऱ्याने आरोप केला आहे की, सल्ल्यानुसार त्यांनी वझीरगंज आणि सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार देण्यात आला. यामुळे त्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे.
सध्या जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला असून, कागदपत्रांच्या गैरवापरातून होणाऱ्या अशा मोठ्या फसवणुकीमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कुठून पैसे भरू?
'जर मी माझी सर्व जमीन आणि मालमत्ता विकली, तरीही मी इतकी मोठी रक्कम भरू शकणार नाही. मला न्याय मिळावा आणि खऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी,' अशी आर्त साद भोला सिंह यांनी प्रशासनाकडे घातली आहे.