नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेतील अलीकडील प्रशासनिक व राजकीय घडामोडींवर गंभीर प्रश्न उपस्थित करत नगरसेवक किशोर अशोक पाटकर यांनी विविध स्तरांवर तक्रारी व निवेदने सादर केली आहेत. महासभांच्या इतिवृत्तांपासून ते परिवहन समितीच्या निवडणुकीतील कथित अनियमितता आणि तदर्थ समितीच्या कार्यपद्धतीपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले किशोर पाटकर यांनी महापौर सुजाता पाटील तसेच मनपा सचिवांना पत्र देऊन सन २०२५-२६ नंतर झालेल्या सर्व महासभांच्या अधिकृत इतिवृत्तांच्या प्रती तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. महासभांमध्ये घेतलेले निर्णय पारदर्शकपणे नगरसेवक व नागरिकांसमोर यावेत, ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
गुरुवारी पार पडलेल्या महासभेतही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. न्यायालयीन प्रक्रियेसाठी इतिवृत्त आवश्यक असतानाही ते मिळत नसल्याने कागदपत्रे जाणीवपूर्वक रोखली जात आहेत का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, पाटकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच नगरविकास विभागाच्या अपर सचिवांकडे पत्र पाठवून परिवहन समितीच्या निवडणुकीबाबत आक्षेप नोंदवले आहेत.
या निवडणुकीत ‘प्रमाणानुसार प्रतिनिधित्व’ या तत्त्वाचे पालन न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा हवाला देत, सर्व पक्षांना त्यांच्या संख्याबळानुसार प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र प्रत्यक्षात ‘हात वर करून’ मतदान घेण्यात आले आणि सर्व जागा एका पक्षाकडे गेल्याचा दावा त्यांनी केला. ही प्रक्रिया पारदर्शकतेच्या व कायदेशीर तत्त्वांच्या विरोधात असल्याने निवडणूक रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तदर्थ समितीवरही सवाल
याशिवाय, तदर्थ समितीच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या समितीमुळे नगरसेवकांच्या वैधानिक अधिकारांवर गदा येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडून आलेल्या प्रतिनिधींना त्यांच्या प्रभागातील कामांसाठी ठराव मांडण्याचा अधिकार असताना, त्या ठरावांची ग्राह्यता इतरांकडे देणे हे लोकशाही तत्त्वांना बाधा आणणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तदर्थ समिती बरखास्त करून नगरसेवकांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सभागृहात अरेरावीचे वातावरण
सभागृहात अरेरावीचे वातावरण आहे. ‘हम करे सो कायदा’ अशी भूमिका घेतली जात आहे. नगरसेवकांना बोलू दिले जात नाही. इतिवृत्त देणे हा आमचा अधिकार आहे, पण तो नाकारला जात आहे. परिवहन समितीत गोंधळ सुरू आहे. आयुक्तांचेही ऐकले जात नाही, अशी टीका किशोर पाटकर यांनी केली. एकूणच, नवी मुंबई महानगरपालिकेतील निर्णयप्रक्रिया, पारदर्शकता आणि कायदेशीर तत्त्वांचे पालन यावरून नव्याने वाद निर्माण झाला असून राज्य सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.