क्रिकेट चाहत्यांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा देत मध्य रेल्वेने रविवारी (दि. २) कुर्ला ते वाशी दरम्यान नियोजित मेगा ब्लॉक रद्द करण्याची घोषणा केली आहे. बहुप्रतीक्षित महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील क्रिकेटप्रेमींचा विचार करून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मूळतः हार्बर लाईनवरील नियमित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक ठेवण्यात आला होता. मात्र, सामना पाहण्यासाठी प्रवास करणाऱ्या हजारो चाहत्यांचा विचार करून मध्य रेल्वेने विशेष सवलत दिली आहे. त्यामुळे रविवारी हार्बर मार्गावरील सर्व गाड्या त्यांच्या नेहमीच्या वेळापत्रकानुसार धावतील.
FPJ ने दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या महिला विश्वचषक अंतिम सामन्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी हार्बर लाईनवरील मेगा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसभर रेल्वे सेवा सुरळीत सुरू राहतील.”
दरम्यान, मुख्य मार्गावरील (Main Line) मेगा ब्लॉक मात्र पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच राहणार आहे. त्यामुळे त्या मार्गावरील प्रवाशांनी आपला प्रवास नियोजित करताना रेल्वेच्या अद्ययावत वेळा तपासाव्यात, असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे.
मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे रविवारी मुंबईतून, ठाण्यातून नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमकडे निघणाऱ्या हजारो क्रिकेटप्रेमींना दिलासा मिळणार आहे. सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या चाहत्यांना वाहतूक कोंडीत न अडकता सुलभतेने वेळेत स्टेडियमवर पोहचता येणार आहे.