
येत्या 28 मे रोजी संसदेच्या नव्या इमारतीच उद्घाटन केले जाणार आहे. या कार्यक्रमावर देशभरातील लहान मोठ्या 21 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. नव्या संसदेचे उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवे होते, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. या कार्यक्रमातून राष्ट्रपतींना डावलल्याने विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्रातील शिवसेनेचाही (ठाकरे गट) समावेश आहे. ठाकरे गटाने देखील या कार्यक्रमवार बहिष्कार टाकल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे यांना कोण घेऊन जातंय, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
राष्ट्रपतींना डावलून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन होत आहे. याचा निषेध या विरोधी पक्षांनी केला आहे. तसेच देशातील 21 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी "उद्धव ठाकरे यांनी नव्या संसदेच्या उद्घाटनाला कोण घेऊन जातय. त्यांना जी जागा दिली होती, तिथे ते जात नाही. ते विधान परिषदेचे सदस्य असून दोन तासाच्या वर तिथे बसत नाही. त्यांना लोकसभेत आणि संसद भवनात कोण बोलवतंय. या सगळ्या लोकांचा लोकशाहीवर विश्वास नाही." असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
तर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवरुन ठाकरे गटाने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना पत्रकारांनी याबाबतचा प्रश्न विचारला असता, त्यांनी "देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली आहे. अजून थोडे महिने राहिले आहेत. नंतर त्यांना त्यांची जागा कळेल", अशी टीका राऊत यांनी फडणवीसांवर केली आहे.