सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध, अर्ज भरताना महायुतीचे नेते गैरहजर

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध, अर्ज भरताना महायुतीचे नेते गैरहजर
Published on

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवारचा शेवटचा दिवस होता. त्यांच्या विरोधात एकाही उमेदवाराने अर्ज न भरल्याने सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरताना महायुतीचा एकही नेता उपस्थित नव्हता.

बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभव झालेल्या सुनेत्रा पवारांनी आता संसदेत मागच्या दरवाजाने एंट्री घेतली आहे. राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवार अर्ज दाखल केला. मात्र, त्यांच्या विरोधात एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार हे जवळपास आधीच निश्चित झाले होते. गुरुवारी विधानभवनात जाऊन सुनेत्रा पवारांनी अर्ज भरला. यावेळी अजित पवार उपस्थित होते. शिवाय सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळही उपस्थित होते. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी छगन भुजबळ, प्रफुल पटेलही इच्छुक होते, मात्र उमेदवारीची माळ सुनेत्रा पवारांच्या गळ्यात पडली आहे.

छगन भुजबळ नाराज?

बुधवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता आणि आपली भूमिका मांडण्यास सांगितली होती. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी प्रफुल्ल पटेलांच्या प्रस्तावाचे समर्थन केले. मात्र, राष्ट्रवादीचे वरिष्ठ मंत्री छगन भुजबन यांनी या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली. मी आणि परांजपे या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भुजबळ राज्यसभेसाठी इच्छुक होते, मात्र त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली नव्हती, यामुळे भुजबळ नाराज होते. मी राज्यसभेच्या जागेसाठी इच्छुक होतो. पण पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतला आहे. पार्टीत वरिष्ठ निर्णय घेतात. पक्षाने घेतलेला निर्णय मान्य करावा लागेल, असे म्हणत भुजबळांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.

नक्की काय घडले?

प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याविषयी कमालीची उत्सुकता होती, ती उत्सुकता आता संपली, अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्यसभेवर जातील. मागच्या दोन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर कोण जाणार याविषयी मोठ्या चर्चा होत होत्या. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक जणांची नावे चर्चेत होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची काल रात्री उशिरापर्यंत अजित पवारांच्या निवासस्थानी देवगिरीवर महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी हे सर्वजण इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, महायुतीतील मतांची विभागणी टाळण्याकरिता सुनेत्रा परावांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in