आयपीएल २०२६ च्या आधीच कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. केकेआर संघाने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला अधिकृतपणे संघातून बाहेर काढल्याची घोषणा केली आहे. हा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्या निर्देशानंतर घेतल्याचे केकेआर (KKR) कडून स्पष्ट करण्यात आले.
केकेआरने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बीसीसीआय (BCCI) च्या सूचनेनुसार आणि आवश्यक प्रक्रियेचे पालन करत मुस्तफिजुरला संघातून बाहेर काढले आहे.” तसेच आयपीएल नियमांनुसार संघाला त्याच्या जागी पर्यायी खेळाडू घेण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
याआधी बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुस्तफिजुरला संघातून बाहेर काढण्याचे निर्देश दिले होते. आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात केकेआरने मुस्तफिजुरला तब्बल ९.२० कोटी रुपयांना विकत घेतले होते, ज्यामुळे तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा बांगलादेशी खेळाडू ठरला होता.
मात्र, बांगलादेशातील राजकीय-सामाजिक परिस्थिती आणि अल्पसंख्याकांवरील कथित हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्याच्या सहभागावरून वाद निर्माण झाला होता. अखेर बीसीसीआयच्या हस्तक्षेपानंतर केकेआरने हा निर्णय घेतला असून, आता संघ दुसऱ्या गोलंदाजाच्या शोधात असल्याची शक्यता आहे.