IPL 2026 : चेपॉकवर चुकीला माफी नाही! स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी मुंबईला चेन्नईविरुद्ध विजय अनिवार्य

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणारा मुंबई इंडियन्स संघ सध्या पराभवाच्या गर्तेत सापडला आहे.
IPL 2026 : चेपॉकवर चुकीला माफी नाही! स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी मुंबईला चेन्नईविरुद्ध विजय अनिवार्य
Published on

चेन्नई : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणारा मुंबई इंडियन्स संघ सध्या पराभवाच्या गर्तेत सापडला आहे. आठपैकी तब्बल सहा लढती गमावणाऱ्या मुंबईला यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) आव्हान कायम राखण्यासाठी आता जवळपास प्रत्येक लढत जिंकावी लागणार आहे. मात्र हे कार्य सोपे नसेल. कारण शनिवारी त्यांची चेपॉक स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जशी गाठ पडणार आहे. उभय संघांतील फिरकीपटूंचे द्वंद्वही या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना पाहायला मिळेल.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे.

दरम्यान, पाच वेळच्या विजेत्या मुंबईला यंदाच्या हंगामात आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कोलकाताविरुद्ध सलामीची लढत जिंकल्यावर मुंबईने सलग चार सामने गमावले. मग गुजरातला त्यांच्याच मैदानात धूळ चारून मुंबईने परतण्याचे संकेत दिले. परंतु वानखेडे स्टेडियमवर चेन्नई व हैदराबादकडून मुंबईला पुन्हा दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सध्या मुंबईचा संघ गुणतालिकेत फक्त ४ गुणांसह नवव्या स्थानी आहे. मुंबईला उर्वरित सहा लढती जिंकूनही जर-तरवर अ‌वलंबून रहावे लागणार आहे.

रोहित शर्मा पायाच्या दुखापतीमुळे या लढतीसही मुकण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत रायन रिकल्टन व विल जॅक्स यांची जोडी सलामीला येईल. रिकल्टनने गेल्याच लढतीत शतक साकारले. त्यामुळे क्विंटन डीकॉक तंदुरुस्त झाल्यास त्याला वगळणार का, याकडे लक्ष असेल. सूर्यकुमार यादवचे अपयश मुंबईला सातत्याने महागात पडत आहे. तसेच तिलक वर्माच्या कामगिरीत सातत्याचा अभाव जाणवत आहे. हार्दिक स्वत:ही फलंदाज म्हणून छाप पाडू शकलेला नाही. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा संघर्ष करत आहे. एकूणच मुंबईला सांघिक कामगिरी उंचवावी लागणार आहे. फिरकीपटू अल्लाह गझनफर निर्णायक ठरेल.

दुसरीकडे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईने ८ पैकी ३ सामने जिंकले आहेत. चेन्नईचा संघसुद्धा विजयी सातत्य राखू शकलेला नाही. गेल्या लढतीत ते गुजरातविरुद्ध पराभूत झाले. संजू सॅमसनवर हा संघ प्रामुख्याने अवलंबून आहे. ऋतुराजला सूर गवसला आहे. मात्र आयुष म्हात्रे आणि महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत सर्फराझ खान, शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस यांनी अधिक जबाबदारी घेणे गरजेचे आहे. अकील होसेन व नूर अहमद यांची फिरकी जोडी चेन्नईची ताकद आहे. त्यांनी वानखेडेवरील लढतीत चेन्नईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे यावेळी चेन्नई घरच्या मैदानातही बाजी मारणार की मुंबई वानखेडेवरील पराभवाचा वचपा घेणार, हे पाहणे रंजक ठरेल.

उभय संघांत आतापर्यंत ४० सामने झाले आहेत. त्यांपैकी मुंबईने २१, तर चेन्नईने १९ लढती जिंकल्या आहेत. आकडेवारीनुसार दोन्ही संघांत फारसा फरक नाही. त्यामुळे शनिवारी चेपॉकवरसुद्धा मुंबई-चेन्नईत अटीतटीची लढत अपेक्षित आहे.

खेळपट्टीचा अंदाज

चेपॉकच्या खेळपट्टी क्रमांक पाचवर ही लढत होणार आहे. येथे पंजाबने याच हंगामात २१० धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असेल यात शंका नाही. मात्र वेगवान गोलंदाजही सुरुवातीच्या काही षटकांत येथे प्रभाव पाडू शकतात.

प्रतिस्पर्धी संघ

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, संजू सॅमसन, अकील होसेन, अमन खान, अंशुल कंबोज, डेवाल्ड ब्रेविस, गुर्जापनित सिंग, जेमी ओव्हर्टन, कार्तिक शर्मा, मॅट हेन्री, मॅथ्यू शॉर्ट, मुकेश चौधरी, नूर अहमद, प्रशांत वीर, राहुल चहर, रामकृष्ण घोष, सर्फराझ खान, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, उर्विल पटेल, झॅक फोल्क्स, आकाश मढवाल, स्पेन्सर जॉन्सन.

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, कॉर्बिन बोश, दानिश मलेवार, दीपक चहर, मयांक मार्कंडे, मयांक रावत, मोहम्मद इझार, नमन धीर, क्विंटन डीकॉक, रघू शर्मा, राज बावा, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, शार्दूल ठाकूर, शर्फेन रुदरफोर्ड, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, क्रिश भगत, केशव महाराज.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in