अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक : मतदानाच्या दिवशी अंबरनाथमध्ये गोंधळ; २०८ महिला भिवंडीतून आणल्याचा दावा, पोलिसांचा हस्तक्षेप

अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीदरम्यान बोगस मतदार आल्याचा आरोप करण्यात आला असून मतदानाच्यादिवशी कोहोजगाव परिसरात गोंधळ उडाला.
अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक : मतदानाच्या दिवशी अंबरनाथमध्ये गोंधळ; २०८ महिला भिवंडीतून आणल्याचा दावा, पोलिसांचा हस्तक्षेप
अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक : मतदानाच्या दिवशी अंबरनाथमध्ये गोंधळ; २०८ महिला भिवंडीतून आणल्याचा दावा, पोलिसांचा हस्तक्षेप
Published on

राज्यभरातील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील १४३ सदस्य पदांसाठी शनिवारी (२० डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून ही प्रक्रिया सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अशातच, अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान बोगस मतदार आल्याचा आरोप झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे.

कोहोजगावात संशयास्पद जमाव; गोंधळाचे वातावरण

अंबरनाथच्या कोहोजगाव परिसरात पहाटेच्या सुमारास एका सभागृहात मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष एकत्र जमल्याचे निदर्शनास आले. हे सर्व मतदार बोगस मतदानासाठी आणले गेले असल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत सभागृहातील महिलांना बाहेर काढले.

२०८ महिला व तरुण भिवंडीतून आणल्याची प्राथमिक माहिती

अंबरनाथ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “तक्रार प्राप्त झाल्यानंतर खातरजमा व पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. सभागृहात उपस्थित असलेल्या महिला व तरुण स्थानिक नसून, एकूण २०८ महिला आणि मुलं भिवंडी येथून आणल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. फिरते भरारी पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.” या महिला नेमक्या कुठून आल्या, त्यांना बोगस मतदानासाठीच आणण्यात आले होते का, याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मतदानासाठी कडक पोलीस बंदोबस्त

अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी तसेच रविवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८०० पोलीस कर्मचारी, ११० पोलीस अधिकारी, राज्य राखीव दलाच्या २ तुकड्या आणि ४५० होमगार्ड शहरात तैनात करण्यात आले आहेत. पूर्व आणि पश्चिम भागातील प्रत्येकी ७ असे एकूण १४ प्रभागांत स्वतंत्र पोलीस पथक तैनात आहे.

अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक : मतदानाच्या दिवशी अंबरनाथमध्ये गोंधळ; २०८ महिला भिवंडीतून आणल्याचा दावा, पोलिसांचा हस्तक्षेप
अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज

१० वर्षांनंतर मतदान; मतदारांमध्ये उत्साह

अंबरनाथ शहरात तब्बल १० वर्षांनंतर नगरपरिषद निवडणूक होत असून मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. विना अडथळा मतदान प्रक्रिया पार पडावी आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.

मतदारसंख्या व मतदान केंद्रांची माहिती

  • एकूण मतदार : २,५४,४७८

    • महिला मतदार : १,१९,२९२

    • पुरुष मतदार : १,३५,१६४

  • मतदान केंद्रे : २७६

  • ईव्हीएम मशीन : २७६

    • राखीव ईव्हीएम : ४९

पॅनल पद्धत आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी एका मतदाराला तीन मते द्यावी लागणार असल्याने प्रत्येक मतदाराला सुमारे ९० सेकंदांचा वेळ लागू शकतो, असा अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in