ठाणे मनपाच्या शहर विकास विभागाला आग; महत्त्वाची कागदपत्रे खाक, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

ठाणे मनपाच्या बांधकाम परवानग्या, विकास आराखडे, विविध प्रकल्पांच्या मंजुरी तसेच महत्त्वाच्या प्रशासकीय नोंदी आणि फाइल्स असलेल्या शहर विकास विभागाला सोमवारी सकाळी आग लागल्याने संशयाचा धूर पसरला आहे.
ठाणे मनपाच्या शहर विकास विभागाला आग; महत्त्वाची कागदपत्रे खाक, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
ठाणे मनपाच्या शहर विकास विभागाला आग; महत्त्वाची कागदपत्रे खाक, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
Published on

ठाणे : ठाणे मनपाच्या बांधकाम परवानग्या, विकास आराखडे, विविध प्रकल्पांच्या मंजुरी तसेच महत्त्वाच्या प्रशासकीय नोंदी आणि फाइल्स असलेल्या शहर विकास विभागाला सोमवारी सकाळी आग लागल्याने संशयाचा धूर पसरला आहे.

महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ८.०७ वाजण्याच्या सुमारास आग लागली. विभागातील युपीएस, पंखा आणि काही कागदपत्रांना आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, सुरक्षारक्षक आणि विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्या मार्गदर्शनाखाली आग विझविण्याचे काम हाती घेण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करत सुमारे ८.३५ वाजता आग आटोक्यात आणली.

शहर विकास विभागात अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनशील फाइल्स असतात. त्यामुळे आग लागल्यानंतर या फाइल्सच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र प्राथमिक माहितीनुसार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसल्याचे सांगितले जात आहे. तरीही आगीमुळे नेमके किती नुकसान झाले आणि कोणती कागदपत्रे बाधित झाली याची पडताळणी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. या आगीत संगणकाचा यूपीएस, काही संगणक तसेच काही कागदपत्रांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तथापि, महापालिकेची ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित असल्याने बहुतांश कागदपत्रे पुन्हा मिळतील.

आगीचे कारण आणि नेमके किती नुकसान झाले याबाबत तपास सुरू असून संबंधित माहिती संकलित करण्यात येत आहे. दरम्यान, आग नियंत्रणात आल्यानंतर परिसराची स्वच्छता करून शहर विकास विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आले आहे.

ठाणे मनपाच्या शहर विकास विभागाला आग; महत्त्वाची कागदपत्रे खाक, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
दिल्लीतील हॉटेल आगीप्रकरणी आचारी अटकेत; निष्काळजीपणामुळे आग लागल्याचा आरोप

पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; राजकीय वाद पेटला

ठाणे : ठाणे महापालिका मुख्यालयात शहर विकास विभाग हा महत्त्वाचा विभाग मानला जातो. परंतु याच विभागात नेमकी आग लागते कशी, असा सवाल आता राजकीय पक्षांनी व्यक्त केला आहे. कारण शहर विकास विभाग हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. येथे शहरातील इमारतीबाबतच्या महत्त्वाच्या फाइल्स, नोंदी ठेवलेल्या असतात.

यापूर्वी जुन २०२० मध्ये याच विभागाला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा जुनमध्ये पुन्हा आग लागल्याची घटना घडली आहे. यावरुन आता भाजप, उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पालिका प्रशासनावर शंका व्यक्त केली आहे.

ठाणे मनपाच्या शहर विकास विभागाला आग; महत्त्वाची कागदपत्रे खाक, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
साकेत-राबोडी कांदळवनप्रकरणी चार प्राधिकरणांना नोटीस; ठाणे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेचा समावेश

शहर विकास विभागातील टीडीआर मंजुरीसह विविध फाइलसंदर्भात सीबीआय, लाचलुचपत विभाग, उच्च न्यायालयात चौकशी सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी आगीची भीती व्यक्त केल्यानंतरही महापालिकेने कोणतीही सतर्कता घेतली नव्हती, असा आरोप करीत भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी आगीत जळालेल्या व गायब झालेल्या प्रत्येक फाइलचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत काही फाइल्स व संगणक भस्मसात झाले. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहर विकास विभागाचे फायर ऑडिट झाले होते का? वीजवाहिन्या निकृष्ट दर्जाच्या होत्या का? तसेच कार्यालयातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आगीची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

ही आग संशयास्पद आहे. ती अपघाती होती की काही महत्त्वाचे पुरावे अथवा भ्रष्टाचाराशी संबंधित फाइल्स नष्ट करण्याचा प्रयत्न होता, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. प्रशासनाने घाईघाईत शॉर्टसर्किटचे कारण पुढे करून प्रकरणावर पडदा टाकू नये.

केदार दिघे, ठाणे जिल्हा प्रमुख, उध्दव सेना

शहर विकास विभागाला लागलेली आग खरंच लागली होती की लावली होती? २६ एप्रिल २०२६ रोजी मुंब्रा येथील जुन्या प्रभाग समितीला लागलेल्या आगीत जुने दस्तावेज खाक झाले होते, आता पुन्हा आग लागली आहे. ही आग लागली होती की लावली होती, हा संशय निर्माण होत आहे. त्यामुळे या आगीची त्रयस्थांमार्फत चौकशी करावी; ज्या फाइल्स जळाल्या आहेत, त्यांचे ऑडिट करण्यात यावे.

मनोज प्रधान, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार)

logo
marathi.freepressjournal.in