अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्याचा ११ वर्षीय मुलीवर हल्ला; किंचाळण्याचा आवाज ऐकून नागरिक धावले, मुलगी जखमी

अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्याने ११ वर्षीय मुलीवर अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भावासोबत घरी जात असताना झालेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्याचा ११ वर्षीय मुलीवर हल्ला; किंचाळण्याचा आवाज ऐकून नागरिक धावले, मुलगी जखमी
Published on

अंबरनाथमधील एका चाळ परिसरात भटक्या कुत्र्याने ११ वर्षीय मुलीवर अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रस्त्यावर चालताना अचानक हल्ला

माहितीनुसार, वंशिका नावाची ही मुलगी आपल्या सहा वर्षांच्या भावासोबत घरी जात होती. तेव्हा रस्त्यावर उभ्या असलेल्या भटक्या कुत्र्याने अचानक तिच्यावर झडप घातली. घाबरलेल्या मुलीने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र कुत्र्याने तिला पकडून ठेवलं.

या वेळी मुलगी वेदनेने ओरडत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येते. तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तत्काळ मदतीसाठी धावले. नागरिक जवळ येताच कुत्रा पळून गेला, मात्र मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ

प्रशासनाची कारवाई

घटनेनंतर महापालिका प्रशासनाने १८ भटक्या कुत्र्यांना पकडल्याची माहिती आहे. मात्र हल्ला करणारा कुत्रा अद्यापही सापडलेला नाही, यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

वाढती भीती; रेबिजच्या घटनेचीही पार्श्वभूमी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यातील ९ वर्षीय कशिश नावाच्या मुलीचा रेबिजमुळे मृत्यू झाला होता. सहा महिन्यांपूर्वी तिला भटक्या कुत्र्याने ओरखडा दिला होता. सुरुवातीला उपचार अपूर्ण राहिल्याने नंतर तिची प्रकृती बिघडली आणि अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्याचा ११ वर्षीय मुलीवर हल्ला; किंचाळण्याचा आवाज ऐकून नागरिक धावले, मुलगी जखमी
Mumbai : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; २५ हजारांवर कुत्र्यांचे निर्बीजीकरण; तरीही त्रास सुरूच

या पार्श्वभूमीवर अंबरनाथमधील ताज्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले असून भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in