

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात सोमवारी (दि. १३) सकाळी झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, हा अपघात गोवेली गावाजवळील रायते पुलावर सकाळी सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडला.
कल्याणहून मुरबाडकडे जाणारी इको व्हॅन समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की व्हॅनचा चक्काचूर झाला आणि त्यातील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जखमींवर उल्हासनगरमध्ये उपचार
या अपघातात जखमी झालेल्या दोन जणांना उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी सहा जणांची ओळख पटली असून इतरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्थानिकांनी बचावकार्य केले
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढत तातडीने रुग्णालयात हलवले. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, मात्र नंतर ती पुन्हा सुरळीत करण्यात आली.
अपघाताचे नेमके कारण...
प्राथमिक माहितीनुसार, समोरासमोर झालेल्या धडकेत हा अपघात घडला असावा. दरम्यान, या मार्गावर सध्या रस्ते रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून, वाढलेला वेग आणि नियंत्रण सुटणे हे अपघातामागील कारण असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.