Thane : 'लग्न करतो, परदेशात नोकरी देतो' म्हणत महिलांना लुबाडलं; ९० लाखांचा गंडा घालणारा सिरियल कॉनमॅन अटकेत

लग्न आणि परदेशात नोकरीचे आमिष दाखवून अनेक महिलांची सुमारे ९० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सिरियल कॉनमॅनला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. मॅट्रिमोनियल संकेतस्थळांच्या माध्यमातून महिलांना जाळ्यात ओढून बनावट विवाह आणि आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
Thane : 'लग्न करतो, परदेशात नोकरी देतो' म्हणत महिलांना लुबाडलं; ९० लाखांचा गंडा घालणारा सिरियल कॉनमॅन अटकेत
Thane : 'लग्न करतो, परदेशात नोकरी देतो' म्हणत महिलांना लुबाडलं; ९० लाखांचा गंडा घालणारा सिरियल कॉनमॅन अटकेतप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

लग्नाचं आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणाऱ्या आणि परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपये उकळणाऱ्या ३७ वर्षीय भामट्याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. तेलंगणाचा रहिवासी असलेला सुरेश रविंद्र याने विविध राज्यांतील अनेक महिलांची सुमारे ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

कासार वडवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरोधात लूक आऊट सर्क्युलर (LOC) जारी करण्यात आले होते. रशियाहून परतल्यानंतर नवी दिल्ली विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आले.

मॅट्रिमोनियल साइटवरून संपर्क

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ठाण्यातील एका महिलेने मे महिन्यात कासार वडवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपीने मॅट्रिमोनियल साइटच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधला होता. ओळख वाढल्यानंतर त्याने विवाहाचे आश्वासन दिले आणि मंदिरात बनावट विवाह केल्याचा आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया किंवा रशियामध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत आरोपीने तिच्याकडून ४८ लाख रुपये उकळल्याचे तक्रारीत म्हटले.

ऐशोआरामासाठी उधळले पैसे

कासार वडवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हाटकर यांनी सांगितले की, आरोपीने फसवणुकीतून मिळवलेले पैसे भारतासह फॉरेन ट्रिप, पब आणि आलिशान हॉटेलांमध्ये खर्च केले. महिलेने पैसे परत मागितल्यानंतर तिचे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली.

इतर राज्यांतील महिलांचीही फसवणूक

या प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायदा आणि हुंडाबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी तेलंगणातील अल्लापूर पोलिसांनाही हवा असल्याचे उघड झाले. तेथे त्याने एका महिलेशी विवाह करून तिची १५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. तसेच तिच्या मित्रांना युरोपमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत आणखी १८ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.

याशिवाय विशाखापट्टणममधील एका महिलेची ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी सांगितले की, आणखी एका महिलेला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्याला अटक करण्यात आली.

Thane : 'लग्न करतो, परदेशात नोकरी देतो' म्हणत महिलांना लुबाडलं; ९० लाखांचा गंडा घालणारा सिरियल कॉनमॅन अटकेत
Mumbai : भय इथले संपत नाही! हजारो लोकांचा जीव दरडीच्या छायेत; भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर भागात धोका

आणखी कोणी फसवणुकीचा बळी ठरलं आहे का?

दिल्लीतील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी १ जून रोजी आरोपीला ताब्यात घेतले होते. त्यानंतर २ जून रोजी कासार वडवली पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आरोपीकडून फसवणूक झालेल्या अन्य महिलांनी पुढे येऊन कासार वडवली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in