

Thane : उल्हासनगरमधील वाहतूककोंडीवर उपाय; पाच महत्त्वाच्या रस्त्यांवर २४ तास नो-पार्किंग नियम लागू
उल्हासनगरमधील वाढत्या वाहतूककोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विठ्ठलवाडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीतील पाच महत्त्वाच्या रस्त्यांवर २४ तास नो-पार्किंग नियम लागू करण्यात आला असून, हा निर्णय सुरुवातीला ३० दिवसांच्या चाचणी तत्त्वावर राबवण्यात येणार आहे.
वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उल्हासनगर पूर्व परिसरातील काही प्रमुख रस्त्यांवर अनधिकृत वाहनतळामुळे सातत्याने वाहतूककोंडी निर्माण होत होती. या रस्त्यांवर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या अव्यवस्थित पार्किंगमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
कोणत्या रस्त्यांवर लागू होणार नो-पार्किंग?
वाहतूक विभागाने मोटार वाहन कायद्याच्या कलम ११५ आणि ११६(१)(अ)(ब) अंतर्गत खालील रस्ते २४ तास नो-पार्किंग क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत.
उल्हासनगर-४ मधील भीम कॉलनी परिसरात गुलशन ज्यूस सेंटर आणि सत्कार बार अँड रेस्टॉरंटसमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे २०० मीटर अंतरापर्यंत पार्किंग बंद राहील.
कृभाना डेअरी ते पांडुरंग बॅंण्ड पार्क आणि पुढे सक्सर चर्चपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे ३०० मीटर अंतरावर पार्किंगला बंदी घालण्यात आली आहे.
बालाजी ताडी माडी सेंटर ते सत्यम सुपर मार्केट दुकानापर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना सुमारे ५० मीटर अंतरापर्यंत नो-पार्किंग नियम लागू असेल.
चंद्रमणी बुद्ध विहारसमोरील कामेश्वर महादेव मंदिर ते उल्हासनगर पूर्व रेल्वे स्थानकादरम्यानच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना सुमारे ३०० मीटर परिसरात पार्किंग करता येणार नाही. या मार्गावर स्कायवॉकचे खांब असल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली असून वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
चंद्रमणी बुद्ध विहार ते मद्रासी पाडा आणि पुढे जरी मरी माता मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना सुमारे १०० मीटर परिसरात नो-पार्किंग नियम लागू राहणार आहे.
३० दिवस चाचणी तत्त्वावर अंमलबजावणी
वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले की, ही व्यवस्था अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवस चाचणी तत्त्वावर लागू राहील. या कालावधीत नागरिकांना हरकती किंवा सूचना लेखी स्वरूपात उप-पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा, तीन हात नाका, एल.बी.एस. मार्ग, ठाणे येथे सादर करता येतील.
चाचणी कालावधीत कोणतीही हरकत किंवा सूचना प्राप्त न झाल्यास ही वाहतूक व्यवस्था पुढील आदेशापर्यंत कायमस्वरूपी लागू केली जाईल.
अत्यावश्यक सेवांना सूट
पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ऑक्सिजन वाहतूक करणारी वाहने तसेच अन्य अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.