डॉ. सविता महाडिक ज्योतिष भूषण
मिथुन रास
सतत यशाची परंपरा राहील
मिथुन रास ही बुधाची रास आहे. त्याचप्रमाणे ती वायुतत्त्वाची रास आहे. विषम रास आहे. मिथुन राशी ही द्विस्वभाव राशी आहे. बोलण्यात व कृतीत मेळ नसतो. धरसोडवृत्ती आढळते. स्वतःच्या मतांमध्ये व निर्णयांमध्ये वारंवार बदल करू शकतात. कोणत्याही विषयाचे सखोल ज्ञान नसते. अर्धवट अध्ययन, दुटप्पी वर्तन, मनात एक आणि बाहेर एक असे असण्याची दाट शक्यता असते, वायुतत्त्वाची रास असल्याने बुद्धिमत्ता हा ठळक गुण या राशीमध्ये असतो, म्हणूनच मिथुन राशी भौतिक रास आहे. बुध व गुरू हे ग्रह वायुतत्त्वाच्या राशीमध्ये बलवान होत असतात.
शिक्षण :- शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेमध्ये अपेक्षित यश साध्य करण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील. त्याचप्रमाणे इतरांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे कष्ट घेणे गरजेचे ठरेल. अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असेल. अभ्यासाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्ये आपले चित्त धाव घेऊ शकते हे लक्षात ठेवून जाणीवपूर्वक अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करणे, अपेक्षित यश मिळवण्यासाठी आवश्यक ठरणार आहे. कला व क्रीडा क्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळेल. स्पर्धापरीक्षेत जास्त प्रयत्न करावे लागतील. गुरुजनांचे मार्गदर्शन तसेच मदत मिळू शकते. प्रयत्न कमी पडून देऊ नका. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न थोड्याफार प्रयत्नांनी साध्य होईल. कुटुंबातून मदत मिळू शकते.
पारिवारिक :- आपल्या कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्य एकमेकांना समजून घेण्याचे प्रयत्न करताना दिसून येतील. आपल्याला कुटुंबातील सदस्यांकडून वाढते सहकार्य लाभेल. आपले उत्पन्न पुरेसे असेल, परंतु घरातील खर्चामध्येही वाढ होईल. त्यामुळे खर्चाचे नियोजन आवश्यक ठरेल. आवश्यक तेवढाच खर्च करणे हितावह ठरेल. घरातील सदस्यांसाठी किंवा घरासाठी जास्तीचा खर्च होण्याची शक्यता आहे. जमीन खरेदी होऊ शकते. एकंदरीत कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही, समाधानी राहील.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- महिन्याच्या सुरुवातीला थोड्या प्रतिकूलतेला सामोरे जावे लागेल. कोणतेही लहान-मोठे निर्णय घेताना मानसिक संतुलन बिघडून देऊ नका. शांतपणे व पूर्ण विचारांती घेतलेले निर्णय योग्य ठरू शकतात हे लक्षात ठेवा. आपल्या कार्यक्षेत्रात, नोकरीत तसेच व्यवसाय-धंद्यात अनपेक्षितपणे काही अडचणी अथवा समस्या उभ्या राहू शकतात. अनपेक्षित घटनांतून त्रास होऊ शकतो. विशेषतः सरकारी कामांच्या बाबतीत विलंब लागणे वगैरे गोष्टी होऊ शकतात. काही वेळेस व्यवसाय-धंद्यात स्पर्धक प्रबळ होतील. त्याचप्रमाणे हितशत्रूंचा त्रासही होऊ शकतो. व्यवसाय-धंद्यात कामगारपीडा जाणू शकते. कायद्याच्या चौकटीत राहून आपली कामे पूर्ण करा. उत्तरार्धात मात्र सतत यशाची परंपरा अनुभवण्यास मिळेल. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करू शकाल. व्यवसाय-धंद्यात काही फायद्याचे सौदे हाती येतील. त्याचप्रमाणे समाजातील मान्यवर व्यक्तींची मदत मिळू शकते.
शुभ दिनांक : ८, ११, १२, १३, १५, २१, २५, २८, २९
अशुभ दिनांक : १, ४, १०, १७, १८, १९, २०, २७, ३०, ३१
कर्क रास
ओळखी, मध्यस्थी फलद्रूप होतील
कर्क राशी चंद्राची रास आहे. त्याचप्रमाणे कर्क रास जलतत्त्वाची सम रास आहे. स्त्री राशी आहे. शांतपणा, लज्जा, नम्रता वगैरे स्त्रीमध्ये असलेले गुण या राशीमध्ये आढळतात. कर्क राशी चल राशी आहे. सौंदर्य, कोमलता, परिस्थितीप्रमाणे बदल स्वीकारण्याची तयारी घडवाल, तसे घडण्याची तयारी आचार किंवा विचारात वारंवार बदल, परिस्थितीप्रमाणे स्वभावामध्ये चढउतार, कधी कधी निर्णयात बदल, घेतलेले निर्णय बदलणे, असे साधारणतः कर्क रास असलेल्यांचा स्वभाव असतो किंवा कर्क राशीची वैशिष्ट्ये असतात.
शिक्षण :- उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होईल तसेच परदेशगमन संभवते. त्यासाठी त्या दृष्टिकोनातून प्रयत्नांची आवश्यकता आहे. यश मिळेल. या कामी आपल्याला आपल्या गुरुजनांचे मार्गदर्शन व मदत मिळेल. ओळखी, मध्यस्थी उपयोगी पडेल. स्पर्धात्मक यश मिळवू शकाल. कला व क्रीडा क्षेत्रामध्ये नवनवीन संधी चालून येतील, परंतु त्या संधीचे सोने करणे व आपले कर्तृत्व सिद्ध करणे आपल्या हाती राहील. त्यामुळे प्रयत्न करणे गरजेचे ठरेल. अपेक्षित यश संपादित करू शकाल. प्रामाणिक कष्ट घेण्याची तयारी ठेवा.
पारिवारिक :- कुटुंबात थोडे अशांततेचे वातावरण असू शकते, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्याशी संबंध बिघडू शकतात. त्यामुळे ज्या प्रसंगांमुळे वादविवादांमध्ये भर पडेल असे प्रसंग जाणीवपूर्वक टाळा. विशेषतः कुटुंबातील महिलावर्गाने आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल. रंगाचा बेरंग टाळा, कुटुंबातील सदस्यांमध्ये काही तात्त्विक मतभेद होऊ शकतात. ते आपण स्वतःच्या योग्य प्रयत्नाने दूर करू शकाल. परिवारातील सदस्यांची अतिरिक्त जबाबदारी आपल्यावर असणार आहे. आपले आर्थिक नियोजन चांगले राहिल्याने सर्वांच्या गरजा पूर्ण करू शकाल. त्यामुळे घरातील वातावरण समाधानी व उत्साही राहील. कुटुंबातील मुला-मुलींच्या समस्या सुटतील.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- आपल्या कार्यक्षेत्रातील नोकरी-धंदा-व्यवसायातील तसेच नोकरीमधील दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. नोकरीमध्ये वरिष्ठांची तसेच सहकाऱ्यांची मदत मिळेल. कुटुंबातील तरुण-तरुणींचे भाग्योदय, विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. त्यांना आपला मनापासून जोडीदार निवडता येईल. काहींचे प्रेमविवाह ठरतील, कुटुंबात मंगलकार्य घडेल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या गाठीभेटी होतील. मात्र कुटुंबात वादविवाद सांभाळा, नाहीतर रंगाचा बेरंग होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे हिताचे राहील. कुसंगत टाळणे महत्त्वाचे ठरेल. जमीनजुमला तसेच स्थायी संपत्ती इत्यादी विषयीचे दीर्घकाळ अर्धवट राहिलेले व्यवहार गतिमान होतील. या कामी ओळखी, मध्यस्थी फलद्रूप होतील. परिवारातील वृद्ध मंडळींच्या आरोग्याकडे लक्ष देणे हिताचे ठरेल. जुनाट व्याधी नव्याने डोके वर काढू शकतात. वेळेसच त्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल. जुन्या गुंतवणुकी फलदायी ठरतील.
शुभ दिनांक : २, ८, ११, १२, १३, १५, २३, २८, २९
अशुभ दिनांक : १, ४, १०, १७, १८, १९, २०, २५, ३०, ३१