डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
तुळ
नोकरीच्या संधी उपलब्ध होतील
तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. आनंदित राहणे व इतरांना आनंद देणे हे तूळ राशीचे मुख्य वैशिष्ट समजले जाते. कोणतेही प्रश्न असले तरी ते सामंजस्याने सोडवणे तसेच त्याचा साधकबाधक विचार करून त्यावर उत्तर शोधणे हे सुद्धा महत्त्वाचे स्वभाव वैशिष्ट्य म्हणता येईल. शुक्र हा ईहलोकातील भौतिक सुखाचा कारक आहे. चैन विलासिता याचाही कारक आहे. सुख-समृद्धी देणारा हा ग्रह आहे. सुखाची रेलचेल करणारा ग्रह आहे. पण या सुखासाठी आपल्या बुद्धिचातुर्याने व व्यवहार कौशल्याने पैसे मिळवणे हे सुद्धा वैशिष्ट्य यामध्ये आहे. शुक्राचा गोड स्वभाव, आकर्षक वागणूक यामुळे त्यांची कामे सहज होतात. या व्यक्तींची वाणी सुद्धा गोड असते. सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती असते. या व्यक्ती कोमल व सुसंस्कृत असतात, पण पत्रिकेमध्ये चंद्र व शुक्राचे बळ कसे आहे यावर हे सर्व ठरते. त्यामुळे चंद्र व शुक्र पत्रिकेमध्ये सुस्थितीत असल्यास वरील गोड राशींच्या जातकामध्ये दिसून येतात अन्यथा त्याचे विरुद्ध गुणवैशिष्ट्य दिसतात.
शिक्षण : तुळ राशीच्या जातकांना सध्याचा कालावधी शिक्षणासाठी चांगला आहे. विशेषतः कला व क्रीडा क्षेत्रात चांगले यश प्राप्त होऊ शकते. उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी चालून येऊ शकतात, परंतु आपले परिश्रम महत्त्वाचे ठरतील. योग्य दिशेने व न कंटाळता केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. स्पर्धा परीक्षेत चांगले यश प्राप्त होईल. परदेशासंबंधीच्या शिक्षणात आपल्याला अपेक्षित यश प्राप्त होईल.
पारिवारिक : कुटुंबातील सदस्यांमध्ये आपापसात वादविवाद, लहानसहान कारणावरून निर्माण होऊन कलहसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळेस आपण पुढाकार घेणे जरुरी ठरेल. कुटुंबातील शांतता टिकण्यास मदत होईल. इतरांना समजून घेणे आपले कर्तव्य राहील. आपण त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केल्यास ते सफल होऊ शकतात. कुटुंबातील तरुण-तरुणींना नोकरी मिळू शकते. नोकरीविषयक कामे होतील. त्यामुळे कुटुंबातील वातावरण उत्साही व आनंदी राहील. एखाद्या मंगलकार्यात घटित होऊ शकते. त्याचप्रमाणे धार्मिक कार्याकडे सुद्धा ओढा राहू शकतो
नोकरी, व्यवसाय व धंदा : सदरच्या कालावधीत अनुकूलता भरलेली असेल. अपेक्षित घटना घटित होत असल्याने मन प्रसन्न राहील. त्याचप्रमाणे प्रसन्न वातावरणाचा लाभ होईल. कुटुंबात सुखद वार्ता समजल्यामुळे वातावरण उत्साही आणि आनंदी राहील तसेच मुला-मुलींच्या प्रगतीपर बातम्या समजल्याने आनंदात भर पडेल. आतापर्यंत आपल्या कार्यक्षेत्रात ज्या अडचणी अथवा समस्या येत होत्या त्या सुटून आपण ते पूर्ण करू शकाल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसेल. आपल्यासमोर आलेल्या प्रत्येक समस्या सोडवाल. आपल्या प्रयत्नांमुळे सर्वच क्षेत्रात सकारात्मक परिणाम प्राप्त होतील. बांधकाम व्यवसायिक आपले अर्धवट राहिलेले प्रकल्प पुन्हा नव्या जोमाने सुरू करतील. प्रेमात यश लाभेल, एकमेकांविषयीच्या आकर्षणात वृद्धी होईल. कुटुंबातील तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. नोकरी मिळवण्यात यश मिळेल.
शुभ दिनांक : २,५,१९,२०,२१,२३,२४,२५,२८
अशुभ दिनांक : १,३,९,१०,११,१५,३०
वृश्चिक
सरकारी माध्यमातून लाभ
वृश्चिक रास ही मंगळ या ग्रहाची रास आहे. अथवा मंगळाचे कार्यकर्ते या राशीवर असते. या राशीचा संबंध स्थानाशी असल्याने आपल्या कामांमध्ये गुप्तता वृषभ राशीचे जातक बाळगताना आढळतात अथवा आपले कार्य गुप्तपणे करणे याला ते जास्त प्राधान्य देणारे असतात. समोरासमोर लढण्यापेक्षा गनिमीकाव्याने लढणे हे यांच्या स्वभावामध्ये असते. तरीही रास मंगळाची असल्याकारणाने धैर्य व धाडस या राशीच्या जातकांमध्ये दिसून येते. सर्वसाधारणतः वृश्चिक रास असलेले जातक सहजासहजी इतरांचे ऐकत नाहीत. स्वतःच्या म्हणण्यालाच धरून ठेवतात व स्वतःला योग्य वाटते ते करतात. स्वतंत्र वृत्त व महत्त्वाकांक्षी असतात. या व्यक्ती उत्तम चिकित्सक असतात. त्यामुळे गुप्तहेर खाते, डॉक्टर, केमिस्ट अशा प्रकारचे व्यवसाय करू शकतात. विचारशक्तीपेक्षा आकलन शक्ती जास्त असते. हे सर्व गुण पत्रिकेमध्ये अथवा कुंडलीमध्ये चंद्र व मंगळ दोन्ही शुभ संबंधित असता त्या जातकांमध्ये आढळतात अन्यथा याच्या विरुद्ध गुण दिसून येतात.
शिक्षण : काही वेळेस वृश्चिक राशीच्या जातकांना सदरच्या कालावधीमध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. निरनिराळे अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर मात करायला आपले परिश्रम व कष्ट उपयोगी पडू शकतात. त्याचप्रमाणे कुसंगतीपासून अलिप्त राहणे महत्त्वाचे ठरेल. इतरत्र वेळ दवडता कामा नये. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरेल. योग्य दिशेने प्रयत्न झाल्यास आपल्याला उज्ज्वल यश प्राप्त होऊ शकते. कला व क्रीडा क्षेत्रामध्ये मनासारखे यश मिळण्यासाठी अजून काही काळ वाट बघावी लागेल. परंतु आपल्या सरावांमध्ये थंडपणा नको. सराव चालू ठेवणे महत्त्वाचे ठरेल, भाग्याची साथ मिळेल, पण ती कर्मांवर अवलंबून आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना यश मिळेल, ग्रहणशक्ती सुद्धा चांगली असू शकते. परदेशासंबंधीच्या शिक्षणात योग्य प्रयत्नाद्वारे यश प्राप्त करू शकाल.
पारिवारिक : कुटुंबामध्ये काही वेळेस वातावरण जरा विचित्र राहू शकते. बोलण्यावर तसेच वर्तणुकीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. समज-गैरसमज होऊन नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. क्रिया-प्रतिक्रिया सांभाळणे हिताचे ठरेल. कुटुंबातील समस्येवर चर्चेद्वारे तोडगा काढू शकाल तसेच कुटुंबातील महिला सदस्यांनी आपल्या आरोग्याला जपणे महत्त्वाचे ठरेल. विशेषतः गर्भवती स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. या कालावधीच्या उत्तरार्धामध्ये मात्र ग्रहमानाची चांगली साथ मिळेल.
नोकरी, व्यवसाय व धंदा : व्यावसायिक दृष्टिकोनातून हा कालावधी अनुकूल राहील. स्वतंत्र व्यावसायिकांना आपल्या उत्पन्नात वाढ झालेली अनुभवण्यास मिळेल. नवीन जोडधंदा सुरू करू शकाल. व्यवसाय-धंद्यातील उधारी वसूल होईल. आपल्या कार्यात अल्प प्रयत्नांनी यश मिळत असल्याचे अनुभव आल्यामुळे आश्चर्य वाटेल.
शुभ दिनांक : ४, ५, १२, १३, १९, २०, २१, २३, २४, २५, २८
अशुभ दिनांक : १,३,९,१०,११,१५,३०