राशीभविष्य

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे सप्टेंबर महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

धनु

कायदेशीर प्रश्न संपतील

धनु राशीचा राशी स्वामी गु‌रू हा ग्रह आहे. गुरू ग्रह हा सर्वात जास्त चांगला शुभ ग्रह मानतात. हा किंचित स्वयंप्रकाशी आहे. पिवळसर रंगाचा आहे. सत्वगुणी असून देवांचा देव आहे. यामुळे या राशीच्या व्यक्ती बहुदा सद्गुणी व कर्तव्यदक्ष असतात. यांच्यामध्ये अभ्यासू वृत्ती, शौर्य, कीर्ती मिळविण्याची क्षमता असते. दुसऱ्यास मदत करण्याची वृत्ती असते. त्याचप्रमाणे यांच्या स्वभावात धार्मिकता असते. निस्पृहता असते. द्वीपक्षपातीपणा असतो तसेच त्यांच्यावर राजकृपा असते. समाजामध्ये मानसन्मानाचे प्रमाण वाढते असते. सुखी व शांत जीवन असते. त्याचप्रमाणे तर्कशास्त्र व ज्योतिष ज्ञान असल्यामुळे विद्येत प्राविण्य मिळवता येते. दुसऱ्याचे मनोगत जाणू शकतात. या प्रकारचे गुणवैशिष्ट्य धनु राशीच्या जातींमध्ये आढळतात. चंद्र व गुरू हे दोन्ही ग्रह पत्रिकेमध्ये सुस्थितीत असल्यास वरील सर्व गुण त्या जातकांमध्ये आढळतात अन्यथा याच्या विरुद्ध गुण व्यक्तीमध्ये असतात.

शिक्षण : कला व क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले यश संपादित करू शकाल. अन्य क्षेत्रात मात्र जास्त परिश्रम घ्यायची तयारी ठेवणे गरजेचे ठरेल. योग्य दिशेने अधिक प्रयत्न केल्याने आपण यश मिळवू शकाल. विशेषतः भाषेच्या शिक्षणातही चांगले यश मिळेल. टेक्निकल विषयांमध्ये जास्त प्रयत्नांची आवश्यकता राहील. परदेशासंबंधीच्या शिक्षणात चांगले यश मिळणार आहे. यामध्ये आपल्याला कुटुंबीयांची अथवा गुरुजनांची मदत अथवा मार्गदर्शन मिळेल. स्पर्धा परीक्षेत सुद्धा अपेक्षित यश प्राप्त करता येईल.

पारिवारिक : या कालावधीच्या सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातून परिस्थितीजन्य लाभ मिळू शकतात. त्याचप्रमाणे राहत्या घराविषयी जर काही समस्या असतील अथवा प्रश्न असतील तर ते या सदरच्या कालावधीमध्ये सुटतील, मात्र या कालावधीच्या उत्तरार्धात ग्रहमान बदलल्यामुळे थोडे सावध राहणे गरजेचे राहणार आहे. कौटुंबिक पार्श्वभूमीवर वातावरण बिघडू शकते. वादविवादांची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबातील शांतता टिकण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता राहील. मुख्यतः आपल्या जीवनसाथीबरोबर वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. वैवाहिक जीवनातील वातावरण जपणे आवश्यक ठरेल. समज, गैरसमज टाळणे हिताचे राहील.

नोकरी, व्यवसाय व धंदा : मागील काही काळात आपल्यासमोर ज्या अडचणी येत होत्या त्या या कालावधीमध्ये संपुष्टात येतील. भाग्य आपल्याबरोबर आहे हे आपल्याला जाणवेल. रोजच्या जीवनात भाग्याबाबत काही घडामोडी घडतील. नोकरीत अपेक्षित घटना घटित होतील. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. जमीनजुमला, स्थायी संपत्ती इत्यादी क्षेत्रातील कामे होतील. अर्थमान उंचावेल. त्यामुळे आपल्या मनात उत्साह आणि आनंद भरून राहील. नव्या उमेदीने नवीन कार्य हाती घ्याल. आत्मविश्वासात वृद्धी होईल. परंतु अतिआत्मविश्वास नुकसानीस निमंत्रण देऊ शकतो हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे ठरेल. कोणताही निर्णय पूर्ण विचारांती, शांतपणे घेणे हितकारक ठरेल.

शुभ दिनांक : 2,5,12,13,19,20,21,23,28

अशुभ दिनांक : 1,3,9,10,11,15,30

मकर

संमिश्र फळे प्रतिपादित होतील

मकर राशीचे स्वामी शनी महाराज आहेत. शनी महाराज हे कर्माचे कारक आहेत तसेच ते न्यायाधीशही आहेत. आपल्या कर्मांचा हिशोब त्यांच्याकडे असतो. त्यामुळे जसे कर्म तसे फळ असा नियम असतो. मकर राशीच्या व्यक्ती स्वतःच्या कार्याला प्राधान्य देणाऱ्या असतात. सातत्याने कार्यमुक्त राहणे हा त्यांचा स्वभाव असतो. या व्यक्तींमध्ये न्यायप्रियता स्वार्थ, त्याग व व्यवहार चातुर्य असते. जबाबदारी स्वीकारणारे वैराग्यकारक अतिशय शिस्तबद्ध तसेच नम्र, इंद्रियांवर पूर्ण ताबा ठेवणारे, परंतु कष्टप्रद आयुष्य व्यतीत करणारे जातक असतात. कोणत्याही कार्याच्या अगोदर सर्व बाजूंनी विचार करून नंतर आपल्या कार्यभागाचा मार्ग आखतात. राजकारणी, लोकशाहीवादी हे स्वतःला मानतात तसेच हे मानवतावादी असे जातक असतात. चंद्र व शनी हे दोन्हीही ग्रह पत्रिकेत अथवा कुंडलीमध्ये शुभ स्थितीत असल्यास वरीलप्रमाणे मकर राशीचे जातक आढळतात अथवा त्यांचा स्वभाव त्याप्रमाणे असतो अन्यथा या गुणांविरुद्ध गुण मकर राशीच्या जातकांमध्ये आढळतात.

शिक्षण : शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण घेण्यासाठी योग्य कालावधी आहे. आपल्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल, परंतु आपले प्रयत्न घेण्याची तयारी असली पाहिजे. कला व क्रीडा क्षेत्रात अपेक्षित यश प्राप्त करू शकाल. चांगल्या संधी प्राप्त होतील. भाषा क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षेतही स्पर्धात्मक यश मिळू शकते. परदेशासंबंधीच्या शिक्षणात अडचणी येऊ शकतात, परंतु त्या अडचणी सोडविण्यासाठी कुटुंबातून अथवा गुरुजनांकडून अथवा अन्य ओळखीच्या माध्यमातून सहाय्य मिळून या अडचणींवर आपण यशस्वीरीत्या मात करू शकाल.

पारिवारिक : सदरच्या कालावधीमधील ग्रहमान अंदाज चुकवणारे असू शकते, म्हणजेच काही वेळा आपले निर्णय चुकतील. त्यामुळे आपल्या कार्यावर परिणाम होऊ शकतो, परंतु लगेच निराश होण्याचे कारण नाही. विचित्र ग्रहमानामुळे अशी परिस्थिती उद्भवू शकते. काही वेळेस अकल्पित समस्या आपल्या कार्यक्षेत्रात अथवा परिवारात उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे परिस्थितीचे भान ठेवणे क्रमप्राप्त ठरेल, तसेच आपल्या कार्यक्षेत्रात अथवा व्यवसाय-धंद्यात विचित्र नुकसानीचे प्रसंग घटित होऊ शकतात. त्यामुळे सावध राहणे व सतर्क राहून आपले कार्य पूर्ण करणे महत्त्वाचे ठरेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मताला उचित प्राधान्य देणे हितकारक तसेच फायद्याचे ठरेल. जमेची बाजू म्हणजे कोर्ट प्रविष्ट जर काही प्रकरणे असतील तर त्याचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. त्यामुळे परिवारातील वातावरण शांत राहण्यास व समाधानी राहण्यास कारणीभूत ठरेल.

नोकरी, व्यवसाय व धंदा : कोणतेही लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगणे जरुरी राहील. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका तसेच कोणाच्याही बोलण्याला बळी पडू नका. नुकसानीची शक्यता, त्याचप्रमाणे जुगारसदृश व्यवहार नको.

शुभ दिनांक : 2,4,19,20,24,25,28

अशुभ दिनांक : 1,3,9,10,11,15,30

शिक्षक : समाजमन घडवणारे शिल्पकार

आजचे राशिभविष्य, ५ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

भांड्यांवर चिकटलेला तेलकटपणा सहज होईल साफ; ॲल्युमिनियम फॉइलचा 'हा' उपाय जाणून घ्या

तुकाराम मुंढेंच्या FDA ची आता महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यामधील अन्न गुणवत्तेवर करडी नजर; 'स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स' लागू

ठाण्यात उद्या ‘थर’थराट; दहीहंडीनिमित्त ठाण्यात कडेकोट बंदोबस्त, २३०७ पोलीस तैनात