डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
गर्दीपासून दूर विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि घनदाट कांदळवनांचा खजिना आचरा गावात दडला आहे. या निसर्गरम्य गावाची ही एक सफर...
देवगड आणि मालवण या दोन तालुक्यांच्या सीमेवर एक नितांत सुंदर गाव वसलंय. या गावाला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा तर लाभला आहेच शिवाय ऐसपैस पसरलेलं निळंशार खाडीचं पात्र लाभलं आहे. खाडीमध्ये खारफुटीचे मोठाले जंगल आहे. तसेच बेटही आहे. जिथे राहताही येतं. या रमणीय गावाचे मालक आहेत इनामदार श्री देव रामेश्वर. साक्षात देवाची कृपादृष्टी असणारं, हे निसर्गरम्य गाव आहे आचरा.
या गावाची भटकंती करताना मी तिथल्या बेटावर राहणं पसंत केलं. या बेटावर आचऱ्यातील एक वाडीच वसली आहे. ६० ते ६५ घरं बेटावर आहेत पण त्यापेक्षा कैक पटीने जास्त माडाची झाडं आहेत. हे बेट आहे जामडूल. जाम म्हणजे घट्ट आणि डूल म्हणजे गोलाकार. खाडीतील माती घट्ट बसून तयार झालेलं हे गोलाकार बेट आहे. समुद्राला भरती लागली की बेटाच्या चारही बाजूने निळंशार पाणी असतं. या बेटावर जायला एकमेव पूल आहे जो साधारण १९८६ मध्ये बांधला गेला. त्या आधी लाकडी बोटीनेच ग्रामस्थांची ये जा सुरू असायची. अशा या बेटावर जामडूल रिसॉर्ट आहे तिथे मुक्काम केला होता. छान ऐसपैस प्रशस्त खोल्या होत्या. बाग, झोपाळे, माडाची झाडं असा रमणीय परिसर आहे. भरती असली की, रूमच्या खिडकीतून खाडीचे निळंशार पात्र दिसायचं. राहण्याची, जेवणाची अगदी उत्तम सोय झाली होती.
मी ज्या खाडीचा उल्लेख करत आहे ती आहे आचऱ्याची खाडी. या खाडीत कांदळवन सफारी, कायाकिंग करता येतं. त्यासाठी मी बेटावरच असणाऱ्या वाडेकर काकांकडे गेले होते. त्यांना कांदळवनाविषयी अफाट ज्ञान आहे. खाडीच्या काठावर त्यांचे टुमदार घर आहे, तिथेच खाडीपात्रात त्यांनी बोटी लावल्या होत्या. सफारीच्या आधी काकांनी लाईफजॅकेट आणि पांढरी टोपी घालण्यासाठी दिली. बोटीत बसून कांदळवन सफरीला सुरुवात झाली. आम्ही समुद्राला पाठ करत खाडीचे पात्र कापत कांदळवन म्हणजे खारफुटी जंगलाच्या दिशेने जात होतो. या आचारा खाडीत हिरव्यागार खारफुटीची बेटं तयार झालेली दिसत होती. आधारामुळे पसरून ही झाडं वडाच्या झाडासारखी पाण्यात अगदी डौलदार उभी आहेत. यांना शेंगासारखा प्रकार असतो तो जमिनीत असा पडतो की त्याचा टोकदार भाग चिखलात रुतून बसतो आणि काही दिवसात त्यापासून झाड वाढत जातं. निसर्गाने यांची अशी रचना केली आहे की, आपली आपणच ही झाडे वाढतात. आधारमुळांच्या आधारावर ही झाडे वाढतात. यांच्या मुळांची गुंतागुंत अशी असते की पायात पाय अडकून ती उभी राहिलेत असं वाटतं. आणि या मुळांच्या जवळ अनेक मासे अंडी घालतात. कित्येक माशांचे हे जंगल जन्मस्थान आहे. विविध प्रजातींचे पक्षी इथे खाद्य टिपायला येतात. असं हे परिपूर्ण अधिवास असणारं खारफुटीचं जंगल क्षार असलेल्या पाण्यात वाढते. ही जंगलं कोकणच्या ऑक्सिजनचा स्रोत आहेत. कांदळवनांची ही हिरवीगार भिंत वादळ, त्सुनामी यापासून कोकणचे रक्षणही करत आहे. वाडेकर काका या कांदळवनांची इतक्या रंजक पद्धतीने माहिती देतात की लहान मुलंही कान देऊन ऐकतात. आपण या कांदळवनांपासून तयार झालेल्या कॅनॉलमधून, कधी गुहेतून जात असतो. तेव्हा अगदी वेगळ्या दुनियेत आलोय असं वाटतं. इथे मस्त कायाकिंग ही करता येतं. स्वतःच्या हाताने कायाकिंग वल्हवत हे जंगल जवळून बघणं एक सुंदर अनुभव आहे.
दुसऱ्या दिवशी मी गेले आचऱ्यातील पुरातन मंदिरात. एखादा जुन्या काळातील राजवाडा असावा असं मंदिर आहे. हे मंदिर आहे श्री देव रामेश्वरचं. छत्रपती शाहू महाराजांनी १७२०मध्ये देव रामेश्वरास आचरा, मजरे गाऊडवाडी आणि बाग जामडूल असा प्रदेश इनाम दिला होता. देव रामेश्वर या संपूर्ण गावचे मालकच आहेत, अशी माहिती मिळाली. मंदिराचे नावही इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान असे आहे. अशी समृद्ध पार्श्वभूमी असलेल्या मंदिरात जाण्यासाठी भलंमोठं प्रवेशद्वार आहे. त्यातून आत गेल्यावर मंदिराचं प्रांगण आहे. कौलारू, प्रशस्त मंदिर अगदी दिमाखात उभं आहे. लाकडी सभामंडपातून गाभाऱ्याकडे गेले. आतील पाषाणातील गर्भगृहात रामेश्वरांची स्वयंभू पिंडी आहे. समोर नंदी विराजमान आहे. मनोभावे दर्शन घेतलं. तिथल्या खांबावरची शिल्प तर अत्यंत सुरेख आहेत.
मंदिराच्या प्रांगणात असणाऱ्या दीपमाळाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. काळ्या दगडातील आहेत. मंदिराच्या आवारात असणारी खोल विहीर पाहिली.
या मंदिराच्या जवळच नाश्ता जेवणासाठी एक सुंदर कोकणी घरासारखा असणारा कॅफे आहे. सुरंगी कॅफे असं नाव आहे. तिथे पिझ्झा बर्गर, वडापाव, मिसळपाव नव्हे तर अस्सल पारंपरिक कोकणी पदार्थ मिळतात. फक्त फोनवर प्री बुकिंग करून जावं लागतं.
आत गेल्यावरच सुरंगी कॅफेचा सुंदर फलक दिसला. एका कोकणातील राहुटीमध्ये आली आहे असं वाटतं होतं. शेणाने सारवलेली जमीन, नारळाच्या झावळ्या वापरून बांधलेले छप्पर, बसण्यासाठी लाकडी टेबल्स, पाणी पिण्यासाठी मातीचे तांब्या पेले, भरपूर झाडं असे जास्तीत जास्त नैसर्गिक साहित्य वापरून सुंदर सजावट केली आहे कॅफेची. तिथल्या आराम खुर्चीत बसल्यावर निवांतच झाले. थोड्याच वेळात केळीच्या पानातून नाश्ता आलाच. तिखट आप्पे, गोडे आप्पे, रस शिरवाळे असा चविष्ट बेत होता. दुपारच्या जेवणासाठी तर काजूची उसळ, पायरी आंब्याचा घट्ट आमरस, फणसाची भाजी, वालाची भाजी, कैरीची कढी, सोलकढी, नाचणी - तांदळाच्या भाकरी, तांदळाची खीर, निरफणस, सुरण कापे, आंब्याचे रायते, बिमला रायते असा प्रचंड सुंदर मेन्यू होता. आणि एकदम स्वादिष्ट होता. या सगळ्या भाज्या त्या त्या दिवशी शेतातून आणल्या जातात किंवा बाजारातून ताज्या बघून आणल्या जातात. आणि दररोज स्वयंपाकही ताजाच केला जातो.
तिथल्या भोजनाचा मनसोक्त पोटभर आस्वाद घेऊन संध्याकाळी ट्रेक करत लाइटहाऊसकडे गेले. हे लाइटहाऊस येतं देवगड मधल्या आडबंदर या गावात. लाइटहाऊसच्या गोल गोल पायऱ्या चढत एकदम टॉपला पोहोचले आणि समोरचं दृश्य पाहून थबकले. डोळ्यात मावणार नाही इतकी समुद्राची अथांगता समोर होती. वरून आचरा गाव, समुद्रकिनारा, खाडी दिसत होती. हिरवाई, निळाई, वाळूची सोनेरी झाक अशा निसर्गाच्या रंगीत छटा दिसत होत्या. सूर्यास्त पाहून निघणार इतक्यात लाइटहाऊसमधील लाइट चमकू लागली. ही लाइट या सोलार पॅनेलवर चालते. नावाड्याना गाईड करणारी ही लाइट इतक्या जवळून पाहून मौज वाटली अगदी.
आचऱ्याची ही भटकंती अशी अगदी परिपूर्ण झाली. कधी मालवण देवगड बाजूला गेलात तर दोन दिवस वेळ काढून आचऱ्याची भटकंती आवर्जून कराच.
भेट देण्यासाठी उत्तम काळ - ऑक्टोबर ते मे
जवळील बस स्टँड - मालवण, देवगड, कणकवली
जवळील रेल्वे स्थानक - कणकवली
एअरपोर्ट - चिपी विमानतळ
स्वतःच्या गाडीने प्रवास करत असाल तर अनुस्कुरा किंवा फोंडाघाटमार्गे प्रवास करावा.
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com