महेश्वरी
डॉ. महेश केळुसकर
रामचंद्रपंत अमात्य लिखित ‘आज्ञापत्र’ हा केवळ एक ऐतिहासिक दस्तावेज नसून शिवकालीन स्वराज्यनीती, प्रशासन आणि मराठी मनाचे सत्वपोषण करणारा एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शक सूत्रग्रंथ आहे.
मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, श्री शिवछत्रपतींच्या नावानं उठता-बसता राजकारण करणाऱ्या महाराष्ट्रातील तथाकथित लोकनेत्यांपैकी पाच टक्के नेत्यांनी सुद्धा ‘आज्ञापत्र’ वाचलेलं नसणार. किंबहुना असा काही ग्रंथ आहे हे त्यांच्या गावीही नसणार. अगदी थोडेच जण असतील की ज्यांना रामचंद्रपंत अमात्य प्रणित ‘आज्ञापत्र’ हा शिवप्रभूंच्या स्वराज्यनीतीवरील सूत्रग्रंथ असल्याचं माहीत आहे. शिवछत्रपतींनी भारताच्या इतिहासात जे युगांतर कार्यकर्तृत्व गाजवलं आणि स्वराज्याचा जो महान आदर्श निर्माण केला, त्याचं रहस्य ज्यात साठवलेलं आहे, असा ग्रंथ म्हणजे ‘आज्ञापत्र’. आज्ञापत्राच्या शब्दाशब्दातून शिवप्रभूंची आत्मशक्ती रामचंद्रपंत अमात्यांनी गोचर बनविली आहे.
‘आज्ञापत्र’ हा ग्रंथ म्हणजे शिवकालीन स्वातंत्र्ययुद्धाच्या महाभारतातील गीता आहे, असं म्हटलं जातं. प्रत्येक मराठी माणसानं पुन्हा पुन्हा वाचावा, असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या शब्दाशब्दात मराठी मनांचं सत्वपोषण करणारी संजीवनी आहे. महाराष्ट्र धर्म जागवण्याची, जगवण्याची आणि वर्धिष्णू बनवण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या आजच्या महाराष्ट्राला हा ग्रंथ नित्य पारायणात ठेवला पाहिजे, इतका तो महत्त्वाचा आहे.
‘आज्ञापत्रा’चे कर्ते रामचंद्रपंत अमात्य हे शिवकालीन राजकीय मुत्सद्द्यांमध्ये अग्रगण्य होते. यांचं घराणं मूळचं कल्याण-भिवंडीकडील कोळवणातील. तेथे या घराण्याकडे देशमुखी वतन होतं. यांचं उपनाव ‘बहुतकर’ असं होतं. परंतु यांच्याकडे अनेक वतनांची गावं असल्यामुळे भिवंडीकर, भादाणेकर अशा अनेक उपनामांनी सुद्धा यांचा उल्लेख इतिहासात आढळतो. पुढे बावडा जहागीर यांच्याकडे आल्यानंतर यांचं घराणं ‘पंत अमात्य बावडेकर’ या नावाने ओळखलं जाऊ लागलं. रामचंद्र पंतांचे आजोबा सोनभट यांचा प्रथम शिवप्रभूंशी संबंध आला. सोनभटांचे दोन पुत्र- आबाजी सोनदेव आणि निळकंठ सोनदेव हे दोघेही स्वराज्याच्या सेवेत होते. रायरी आणि शृंगारपूर घेण्यात निळकंठ सोनदेवांचं कर्तृत्व प्रत्ययास आल्यावर शिवप्रभूंनी त्यांना सुरनिशी दिली. पुढे तीन एप्रिल १६६२ मध्ये निळू सोनदेव शिवप्रभूंचे अमात्य झाले. ‘स्वराज्य संपादनाइतकेच स्वराज्य संरक्षणाचे आणि व्यवस्थापनाचे कार्य महत्त्वाचे आहे’ हा छत्रपतींचा आदेश शिरोधार्य मानून निळू सोनदेवांनी दहा वर्ष अमात्यपद सांभाळलं. इसवी सन १६७२ मध्ये निळो सोनदेव मृत्यू पावले आणि त्यांचं पद नारो निळकंठ आणि रामचंद्र निळकंठ या बंधुतद्वयांकडे आलं. रामचंद्र निळकंठांचा जन्म इसवी सन १६५०च्या सुमारास झाला. त्यांचे माता-पिता दोघेही समर्थ रामदासांचे अनुग्रहित होते.
आज्ञापत्र म्हणजे शासन पत्र राज्याज्ञापत्र व लिखित आज्ञा छत्रपती द्वितीय संभाजींनी अमात्यांना उद्देशून हे आज्ञापत्र लिहिलं आहे आणि या आज्ञापत्राच्या द्वारा त्यांनी अमात्यांना त्यांचे राजनैतिक विचार राजकुमाराला शिकविण्याचा आदेश दिला आहे अशी भूमिका घेऊन अमात्यांनी आपला ग्रंथ लिहिला आहे. ही भूमिका तत्कालीन ग्रंथ लेखन पद्धतीत सर्वत्र रूढ होती.
आज्ञापत्राचे अंतरंग म्हणजे शिवकार्याचे हृद्गत शिवप्रभूंनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा अर्थ लावण्यासाठी आज्ञापत्राची निर्मिती झाली आहे. शिवप्रभूंच्या स्वराज्यनीतीचं हे निबंधीकरण करताना समकालीन विपरीत स्थितीविषयीची खंतच अमात्यांना लेखन प्रवृत्त करीत आहे, हे आज्ञापत्राच्या उपन्यासावरून आणि पुढे स्वराज्यविषयक अनेक गोष्टींचं त्यांनी जे जिव्हाळ्यानं वर्णन केलं आहे आणि नव्या पिढीला जे सूक्ष्म मार्गदर्शन केलं आहे त्यावरून स्पष्ट होतं. ज्या राज्यातील नीती, बुद्धी व मर्यादा सर्वांनी शिकून जाव्या असा ज्याचा आदर्श, ज्या राज्याने औरंगजेबासारख्या शत्रूला स्वप्रताप सागरी निमग्न केलं आणि प्रजेला अभय दिलं त्या राज्याची पुढे जी विपरीत स्थिती झाली, त्याचं अधिष्ठान ढासळलेले पाहण्याचा जो दुःखद प्रसंग प्राप्त झाला, त्याने रामचंद्रपंत अमात्यांसारख्या स्वराज्यनिष्ठ शिव सहकाऱ्याचं हृदय विव्हल झाल्याशिवाय कसं राहील! अठराव्या शतकाच्या प्रारंभी स्वराज्यात यादवी माजली. संधीसाधूपणा वाढला. हे एक राज्य, या राज्याची एक मर्यादा हा भाव अगदी उडून गेला आणि यवनाक्रांत राज्य आक्रमावेण, अवनीमंडल निर्यवन करावे, ही आकांशाही लुप्त झाली. त्यामुळेच अमात्य अस्वस्थ झाले आणि शिवप्रभूंच्या मृत्युंजयी आत्म्याला साक्षी ठेवून त्यांनी मराठ्यांची मनं पुन्हा सचेत करण्यासाठी, त्यांच्या हृदयात पुन्हा शिवनीतीचा उदय घडविण्यासाठी ‘आज्ञापत्र’ लिहिलं. आज्ञापत्राच्या निर्मितीची ही पार्श्वभूमी इतकी विलक्षण उदात्त आहे की त्या पार्श्वभूमीवर आज्ञापत्रातील आशयाला आगळेपण प्राप्त होतं.
आज्ञापत्राच्या निर्मिती प्रेरणा वाङ्मयीन नसून राजकीय आहेत. समकालीन समाजाला शिवनीतीचं संस्मरण करून देणं, राज्याच्या अधिष्ठानाविषयी, संरक्षणाविषयी आणि व्यवस्थेविषयी काही विचार, काही विधिनिषेध, काही पथ्यापथ्ये सांगणे हा आज्ञापत्रकारांचा हेतू आहे. परंतु आज्ञापत्रकार हे राजकीय क्षेत्रातील एक प्रतिभासंपन्न द्रष्टे असल्यामुळे आणि शिवप्रेणीत स्वराज्य मूल्यांविषयी त्यांची निष्ठा असाधारण असल्यामुळे त्यांच्या विचार प्रकटीकरणात एक आवेग आला आहे. गीताटीकेच्या निमित्ताने साक्षात्काराचे शास्त्र सांगणारे श्री ज्ञानेश्वर किंवा सामाजिक दुःखांनी व्यथित होऊन त्या दुःखांची तिडीकेने मीमांसा करणारे आगरकर हे ज्या कारणांनी साहित्यिक आहेत, त्याच कारणांनी आज्ञापत्रकारही साहित्यिक आहेत.
पंडित त्याऐवजी प्रतीती आणि अलंकारण ऐवजी आत्मियता यांचा अवलंब केल्यामुळे रामचंद्र पंत अमात्यांच्या या आज्ञापत्रात सहज सौंदर्याचा सुगंध दरवळलेला आहे. आज्ञापत्रातील प्रत्येक शब्दाला स्वानुभवाचा स्पर्श आहे जे प्रत्यक्ष पाहिलं गेलं आणि अनुभवलं ते अत्यंत सत्वसंपन्न आहे अशी जाणीव असल्यामुळे अमात्यांनी ते अनुभव भांडार आपल्या हृदयात साठवलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील एका गंभीर क्षणी भावी पिढ्यांच्या मार्गदर्शनासाठी शब्दबद्ध केलं. हे आज्ञापत्र आजच्या काळातही अत्यंत उपयुक्त आणि राज्यकर्त्यांनी अनुसरण्याजोगे आहे.
ज्येष्ठ कवी आणि लेखक
maheshkeluskar@gmail.com