एआय निसर्गाचा नवा दोस्त! 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
अक्षररंग

एआय निसर्गाचा नवा दोस्त!

काय बच्चा कंपनी, तुम्ही एआयशी गप्पा मारल्या आहेत का? एआयला प्रश्न विचारला की, ते लगेच उत्तर देतं. पण हेच एआय झाडांशी, प्राणी-पक्ष्यांशी आणि निसर्गाशी ‘गप्पा’ मारू शकतं का? खरं तर थेट गप्पा नाही, पण त्यांच्याबद्दलची प्रचंड माहिती गोळा करून निसर्ग वाचवायला नक्कीच मदत करू शकतं! चला तर मग, एआयची ही नवी गंमत समजून घेऊया.

नवशक्ती Web Desk

नवलनगरी

सोनाली कोलारकर-सोनार

काय बच्चा कंपनी, तुम्ही एआयशी गप्पा मारल्या आहेत का? एआयला प्रश्न विचारला की, ते लगेच उत्तर देतं. पण हेच एआय झाडांशी, प्राणी-पक्ष्यांशी आणि निसर्गाशी ‘गप्पा’ मारू शकतं का? खरं तर थेट गप्पा नाही, पण त्यांच्याबद्दलची प्रचंड माहिती गोळा करून निसर्ग वाचवायला नक्कीच मदत करू शकतं! चला तर मग, एआयची ही नवी गंमत समजून घेऊया.

काय बच्चाकंपनी, एआय म्हणजेच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हे आता तुम्हाला चांगलंच पाठ झालं आहे, हो ना?

संगणकाचा जन्म झाल्यानंतर अनेक गोष्टी सोप्या होत गेल्या. एआय हा संगणक प्रोग्रॅम तर इतक्या गोष्टींत मदत करतो आहे की अनेकदा चमत्कारच वाटावा! अनेक महत्त्वाच्या गोष्टी आता या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधाराने अधिक सुलभ पद्धतीने होऊ लागल्या आहेत.

अगदी सुरुवातीला जेव्हा संगणकाचा जन्म झाला, तेव्हा म्हणे तो सत्तावीस टन इतका जडजूड होता. आश्चर्य वाटलं ना? आता तर चक्क फोनच्या स्वरूपात तो आपल्या खिशात मावतो!

आता आपल्याला माहीत झालं आहे की संगणक कार्यक्रमात (प्रोग्रॅममध्ये) काही चुका झाल्या असतील, तर त्याला ‘बग’ म्हणजे कीडा म्हणतात! पण गंमत म्हणजे अगदी पहिल्यांदा संगणकात जो पहिला ‘बग’ सापडला, तो खराखुरा कीडाच होता! एक भला मोठा ‘पतंग’ नावाचा कीडा संगणकात चिटकून बसला होता!

अशा अनेक गमती संगणकाबाबत आपल्याला आढळतात आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता तर थक्कच करते. अनेक गोष्टींत मदत करणारी ही कृत्रिम बुद्धिमत्ता सगळ्यात महत्त्वाच्या आपल्या जीवनदात्या अशा निसर्गाला वाचवायला खरंच काय मदत करत असते?

या कृत्रिम बुद्धिमत्तेला अगदी कमी वेळात खूप मोठी माहिती गोळा करता येते. सॅटेलाइटमुळे अगदी त्या वेळची नेमकी निसर्गस्थिती कळते आणि कुठे पूर येणार असेल, वादळ येणार असेल, तर त्याची माहिती एआयमुळे बरीच आधी कळू शकते. यामुळे ज्या भागात काही घडणार आहे, तिथल्या भागातील जनतेला सुरक्षित जागी हलवता येऊ शकतं आणि मोठी प्राणहानी व वित्तहानी टळू शकते.

जंगलाला आग लागणार असेल (ज्याला आपण ‘वणवा’ म्हणतो), ते पण समजू शकतं आणि प्राण्यांचा जीव तर वाचवता येऊ शकतोच; परंतु तात्काळ उपाययोजना केल्यामुळे जंगलाची व वनसंपत्तीची हानी टाळता येते.

हवामानाचा अचूक अंदाज साधता येत असल्याने शेतीसाठी देखील खूप चांगली मदत होते. कुठल्या वेळी धान्य पेरायचे, काय काळजी घ्यायची, ही सगळी माहिती आधीच मिळते.

एआयच्या मदतीने अनेक चांगले सॉफ्टवेअर्स तयार झाले आहेत. ‘विनोव’ या कंपनीने असंच एक सॉफ्टवेअर तयार केलं, जे अन्नाची नासाडी कशी कमी करता येईल याबाबत मार्गदर्शन करतं. कॅमेरा आणि ट्रॅकिंग सिस्टीमच्या मदतीने नेमके कुठे अन्न वाया जाते आहे, याचा शोध लागतो आणि ही नासधूस थांबवता येते.

याच पद्धतीने नैसर्गिक गोष्टींचा- जसे की जंगल, खनिज साठा यांचा कोणी दुरुपयोग करत आहे का, लपून जंगलकटाई करत आहे का, की तेल, रेती, खनिज संपत्ती आणि प्राणी यांची तस्करी करत आहे का, याचा पण शोध लागतो आणि नैसर्गिक हानी वाचते.

जैवविविधता वाचवायला, त्याची संपूर्ण आणि अचूक माहिती गोळा करायला देखील मदत होते. आत्तापर्यंत जंगलात प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक अगदी झरे, डोंगर-दऱ्या यांची माहिती गोळा करताना माणसाला स्वतः जाऊन बघून कष्ट करायला लागायचे. ते कठीण काम होतं. आता उपग्रह आणि संगणक यांच्या मदतीने ही माहिती गोळा करणं सोपं होत गेलं आणि आता तर एआयमुळे त्यांची माहिती गोळा करण्यासोबतच संवर्धन करणं देखील फार सोपं झालं.

अचूक माहिती चुटकीसरशी मिळाल्यामुळे कोणते प्राणी, पशू-पक्षी व वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत ते कळू लागले, त्याची कारणे कळायला मदत झाली आणि त्यावर मग नेमकी उपाययोजना करता येऊ लागली.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाण्याची परिस्थिती आणि नियोजन करण्यासाठी आवश्यक माहिती मिळू लागल्याने पाण्याचे संवर्धन व्हायला मदत होऊ लागली. काही महत्त्वाच्या शहरांत वाहतूक नियंत्रणासाठी मदत झाल्याने ऊर्जा बचत झाली आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वायू प्रदूषण कमी व्हायला मदत झाली. हे कसे झाले? तर वाहतूक नियमन आणि नियंत्रणाने वाहनांना योग्य मार्गाने वळवल्यामुळे इंधनबचत होऊ लागली आणि वायू प्रदूषण कमी होऊ लागले.

आहे ना गंमत? शेतीपासून जैवविविधतेचे संवर्धन करण्यापर्यंत तर नैसर्गिक संसाधनांची बचत करण्यापर्यंत हा संगणक मदत करू लागला आहे.

आता नाण्याला दोन बाजू असतात, तसेच एआयचे आहे. नैसर्गिक संसाधनं वाचवायला जशी ही मदत करते, तशीच निसर्गातून अधिकाधिक खनिज संपत्ती कुठे आहे, ती ओढून तिचा साठा कसा करता येईल, याची माहितीदेखील ही एआयच देते बरं का! आहे ना धक्कादायक! म्हणजे दुधारी शस्त्र!

पण म्हणूनच आपण माणसांनी अणुबॉम्बचा वापर हा वीजनिर्मितीसाठी करायचा ठरवला, तर माणसांना मारायला त्याचा वापर होणारच नाही! ही कृत्रिम बुद्धिमत्ता कशी चांगल्या पद्धतीने वापरायची, यासाठी आपल्याला ‘जिवंत आणि खरी’ बुद्धिमत्ता दिलेली आहे! तिचाच वापर आपण करायचा आणि सद्वुद्धीने निसर्ग वाचवायचा; कारण सरतेशेवटी एआय कोणी तयार केले आहे? आपणच ना?

मग द्या टाळी! निसर्ग वाचवून स्वतःला तर नक्कीच आपण वाचवूच! हे स्वतः कृत्रिम बुद्धिमत्ता पण सांगते!

कृत्रिम बुद्धिमत्तेला लगाम घालायला ही सोय पण हळूहळू होतेच आहे. आपण जर एआयला काही चुकीची गोष्ट करायला सांगितली, तर एआय आजकाल नकार द्यायला पण शिकते आहे; आहे ना मस्त गोष्ट?

चला तर मग, गणपती बाप्पाचे आगमन झाल्याच्या आनंदात त्याला सुबुद्धी मागूया आणि जपून कृत्रिम बुद्धिमत्ता वापरूया!

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@gmail.com

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली