अजब निसर्ग
मकरंद जोशी
निसर्गाच्या दुनियेत काही आई-बाबा असेही असतात, जे आपल्या पिल्लांना दुसऱ्यांच्याच घरी राहण्यासाठी, संगोपनासाठी पाठवतात! कोण आहेत हे अनोखे आई-बाबा? चला, त्यांच्या गमतीशीर दुनियेत डोकावूया!
माणसांच्या जगात काही मूलभूत भावनांपैकी अतिशय महत्त्वाची एक म्हणजे ‘वात्सल्य’. मात्र, निसर्गातील बरीचशी रचना ही वंशवृद्धीवर आधारित आहे. त्यामुळे वात्सल्याचं दर्शन तिथे जरा कमीच घडतं. कीटकांमधील अनेक प्रकार तर फक्त वंशवृद्धी करतात-नवीन पिढीला जन्माला घालतात आणि मरून जातात. मात्र, सस्तन प्राणी, पक्षी, जलचर यांच्यात वात्सल्य कमी-जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. बहुतेक पक्षी घरटं बांधतात ते फक्त आपली अंडी आणि पिल्लं सांभाळण्यापुरतंच. सस्तन प्राण्यांमध्ये पिल्लांची काळजी घेण्याची वृत्ती गाय, हरण अशा निरुपद्रवी प्राण्यांपासून ते वाघ-बिबट्या अशा शिकारी प्राण्यांपर्यंत सगळ्यांमध्ये पाहायला मिळते. पण निसर्गाच्या अजबखान्यात काही प्राणी, पक्षी आणि कीटक असेही पाहायला मिळतात, जे स्वतःच्या पिल्लांची काळजी घेत नाहीत, त्यांचं संगोपन करत नाहीत, तर त्यासाठी जणू ते दत्तक आई-बाबा शोधतात आणि आपल्या पिल्लांची जबाबदारी त्यांच्या डोक्यावर टाकून मोकळे होतात.
ऐकायला जरा विचित्र वाटलं ना? असे आई-बाबा कसे असतील, जे आपल्याच पिल्लांसाठी दत्तक पालक शोधतील? इतर पालकांप्रमाणे ते प्रेमाने, मेहनतीने, स्वतः कष्ट घेऊन आपल्या पिल्लांना का वाढवत नाहीत? तर याचं नेमकं उत्तर संशोधकांना आजही मिळालेलं नाही. या अशा वागण्याला शास्त्रीय परिभाषेत ‘ब्रूड पॅरासिटिझम’ म्हणतात. जे पक्षी, कीटक आणि प्राणी आपली पिल्लं वाढवण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतात, त्यांच्यामध्ये हे अनोखे पॅरासिटिझम म्हणजे परजिवीपण पाहायला मिळतं. आता काही ठराविक पक्षी किंवा कीटकच असं का वागतात? स्वतःचं घर किंवा घरटं न बनवता, दुसऱ्यांच्या घरट्यात आपली अंडी-पिल्लं का ठेवतात? तर संशोधकांच्या मते, उत्क्रांतीच्या चक्रात निर्माण झालेली ही अवस्था आहे. अशा वागण्यामुळे जे स्वतःचं घरटं तयार करत नाहीत, अंडी-पिल्लांचा सांभाळ करत नाहीत, ते त्या कामांतून मुक्त होतात आणि वंशवृद्धीसाठी अधिक वेळ देऊ शकतात. पण मग ज्या पक्ष्यांना किंवा कीटकांना असं दत्तक पालकपण, तेही जबरदस्तीने, स्वीकारावं लागतं, ते याला कशी मान्यता देतात? तर उत्क्रांतीच्या ओघात निसर्गाने आपली अंडी दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यात घालणाऱ्या पक्ष्यांची अंडी त्यांच्या दत्तक आई-बाबांच्या अंड्यांसारखीच दिसतील असं रंगरूप दिलेलं आहे. शिवाय, काही वेळा जर दत्तक आई-बाबांनी अशी जबरदस्तीने घातलेली अंडी उबवली नाहीत किंवा घालूच दिली नाहीत, तर नंतर ब्रूड पॅरासाइट पक्षी त्यांच्या घरट्यावर हल्ला करण्याची भीती असते. म्हणजे चक्क घाबरून या दत्तक पालकांना नाइलाजाने दुसऱ्यांची पिल्लं वाढवावी लागतात. निसर्ग अजब आहे, हेच खरं.
आपली अंडी-पिल्लं दुसऱ्यांच्या घरात वाढण्यासाठी सोडून जाणारे, असं वर्णन वाचल्यावर चटकन कोकिळा आठवते. वसंत ऋतूत (म्हणजे साधारणतः मार्च ते मे महिन्यात) आपल्या आलापींनी परिसर दणाणून सोडणारी कोकिळा निसर्गतःच ‘आळशी पालक’ असते. मुळात आपण ज्या आवाजाचं कौतुक करतो, तो श्रीमान कोकिळांचा आवाज असतो. मादी कोकिळेचा आवाज कावळ्याच्या आवाजाशी मिळताजुळता असतो. वीणीच्या हंगामात, म्हणजे मार्च-एप्रिलपासून, नर कोकिळ आपली गायकी दाखवून मादीला आकर्षित करायला सुरुवात करतो. नंतर त्यांची जोडी जमून मिलन झालं की दोघे मिळून जवळच्या परिसरातलं योग्य स्थळ, म्हणजे कावळ्याचं घरटं, शोधू लागतात. नैसर्गिक प्रेरणेमुळेच कोकिळा ज्या गटात येते, त्या ‘कक्कू’ गटातले बहुतेक पक्षी आपलं स्वतःचं घरटं बनवत नाहीत, तर आपली अंडी दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यात सोडून देतात. भारतातील कोकिळा यासाठी साधा कावळा (हाऊस क्रो) किंवा डोम कावळा (जंगल कावळा) यांचं घरटं निवडते. बांगलादेशातील कोकिळा यासाठी लाँग-टेल्ड श्राइक, साळुंकी किंवा मैना, साधा कावळा यांपैकी एकाची निवड करते, असं आढळून आलं आहे.
बरं, आपलं पोर (म्हणजे अगदी अंड्यातलं हं!) दुसऱ्याच्या घरट्यात टाकताना कोकिळाबाई खूपच काळजी घेतात. म्हणजे ज्या घरट्यात अंडं द्यायचं आहे, त्यातलं एक अंडं आधी बाहेर ढकलून आपल्या अंड्याला जागा केली जाते. कोकिळाबाईंना अंडं घालायची संधी मिळावी म्हणून आधी कोकिळबुवा त्या घरट्यातल्या कावळा-कावळीला त्रास देऊन घरट्यापासून दूर जायला प्रवृत्त करतात. पुढेही कोकिळेच्या अंड्यातून बाहेर आलेलं पिल्लू कावळ्याच्या पिल्लापेक्षा आकाराने मोठं असतं आणि आपल्या दत्तक आई-बाबांकडून जास्तीत जास्त खाऊ मिळवून पटापट वाढतं. पुरेशी वाढ झाली की कावळ्याच्या घरट्यातून भुर्रकन उडून जातं. जगभरातल्या, म्हणजे आफ्रिकेपासून ते दक्षिण अमेरिकेपर्यंतच्या, कक्कू कुळातील सगळे पक्षी हाच कित्ता गिरवताना दिसतात.
असेच परोपजिवी आई-बाबा पूर्व आफ्रिकेतील ‘टांगानिका’ तलावातही आढळतात. या सरोवरात कक्कू कॅटफिश नावाने ओळखला जाणारा मासा आढळतो. नावाप्रमाणेच हा मासा आपली पिल्लं वाढवण्याची जबाबदारी दुसऱ्या माशाच्या गळ्यात (खरं तर तोंडात) देऊन मोकळा होतो. याच सरोवरात सिकलिड्स जातीचे मासे आहेत. हे या कक्कू कॅटफिशच्या पिल्लांचे दत्तक पालक ठरतात. सिकलिड्सची मादी आपली अंडी आधी सरोवराच्या तळावरच्या जमिनीवर घालते आणि मग सगळी अंडी आपल्या तोंडात गोळा करून घेते. कक्कू कॅटफिशची मादी चपळाई करून त्या अंड्यांमध्ये आपली अंडी मिसळते. त्यामुळे सिकलिड्सची मादी नकळत तिच्या अंड्यांबरोबर कक्कू कॅटफिशची अंडीही गोळा करते. तिच्या तोंडात दोन्ही प्रकारची अंडी सुरक्षित राहतात. मात्र, त्यातली कक्कू कॅटफिशची अंडी लवकर उबतात आणि त्यातून पिल्लंही आधी बाहेर येतात. ही बाहेर आलेली पिल्लं तोंडात सांभाळलेली सिकलिड्सची अंडी आधी खाऊन टाकतात आणि स्वतः भराभर मोठी होतात. त्यामुळे अनेकदा सिकलिड्सच्या मादीच्या तोंडातून फक्त कक्कू कॅटफिशची पिल्लंच बाहेर पडतात.
अशाच प्रकारचं वर्तन कक्कू बी नावाने ओळखल्या जाणाऱ्या माशीतही पाहायला मिळतं. ही माशी दुसऱ्या माशीने तयार केलेल्या घरट्यात आपली अंडी घालते. कीटकांच्या जीवनचक्रानुसार, पालक मुलांची काळजी घ्यायला जिवंत नसतात. त्या मूळच्या माशीने आपल्या पिल्लांसाठी त्या घरट्यात जे खाणं (अळ्या, अर्धमेली फुलपाखरं इत्यादी) भरून ठेवलेलं असतं, ते या कक्कू बीची पिल्लं पळवतात. म्हणून या माशांना ‘क्लेप्टोपॅरासाइट्स’ म्हणजे चोर-परजिवी माशा म्हणतात. निसर्गाने असे परोपजिवी आई-बाबा का निर्माण केले, याचं नेमकं उत्तर अजूनही मिळालेलं नाही.
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.com