डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
पावसाच्या पहिल्या सरी कोसळल्या की सह्याद्रीचे राकट रूप नव्या चैतन्याने उजळून निघते. अशाच निसर्गसोहळ्याचा मनमुराद अनुभव देणारी अणुस्कुरा घाटाची ही भटकंती.
पावसाळ्यात भटकंती करताना धबधबे बघण्यासाठी मन अगदी आतुरलेलं असतं. मुसळधार पाऊस काय पडून जातो आणि सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या अगदी जिवंत वाटू लागतात. काळ्या-ओल्या खडकावरून शुभ्र जल प्रपात ओसंडून वाहू लागतात. पठारांवरचे झरे जिवंत होऊन खळखळ वाहू लागतात. पावसाळ्यात पाण्याचे हे पाणीपण बघणं मी बिलकुल चुकवत नाही. वरुणराजाने सढळ हस्ताने दिलेलं हे अमृत वैभव जाऊन पहायला नको का !
मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात कोल्हापूरपासून साधारण ६० किमी असणाऱ्या अणुस्कुराची भटकंती केली. गोव्याकडे जायचा पर्यायी मार्ग म्हणून हा अणुस्कुरा घाट फार प्रसिद्ध झाला होता. पण या घाटाच्या आसपास बघण्यासारखी अनेक सुंदर ठिकाणं आहेत.
तिथली दोन ठिकाणं मी त्या भटकंतीत पाहिली. अणुस्कुरा घाट आणि त्याच्या आजुबाजूचा परिसर बराचसा दुर्गम आहे. राहण्याची अगदी मोजक्या ठिकाणी सोय होते. मी तिथल्या एका हॉटेलमध्ये राहिले होते. हॉटेलच्या प्रांगणातून समोर हिरव्यागार टेकड्या दिसत होत्या. त्या टेकड्यांना धुकं अगदी लागून होतं. पाहताना धुकं टेकड्यांना कुरवाळत आहे, असंच वाटत होतं. फारच मोहक दृश्य होतं. असे नजारे अणुस्कुराजवळचा भाग फिरताना दिसतातच. त्या दिवशी संध्याकाळी तिथून जवळ असणाऱ्या कुंभवडे डॅमकडे जायचं ठरवलं.
अणुस्कुरा हे ठिकाण मलकापूर रस्त्याला जोडणाऱ्या वाटेवर आहे. जाताना वाटेत दुतर्फा वाढलेली भातशेती दिसत होती. ते दृश्य पाहून गाडी थांबवली आणि शेताची तरतरी पहायला बांधावर जाऊन उभी राहिले. भात चांगलाच वाढला होता. वाऱ्याची झुळूक आली की, शेतात हिरवी लाट उमटून जायची. एकाएकी शेतातून बांगड्यांची किणकिण ऐकू आली. डोकावून पाहते तर गावातल्या काकू हातात खुरपं घेऊन शेतात वाढलेलं गवत तोडत होत्या. म्हणाल्या- भांगलणी सुरू हाय. असं म्हणून परत कामाला लागल्या. भातशेतीतून मस्त फेरफटका मारला.
या शेतापासून पाच मिनिटांवर तो डॅम होता. गाडीने डॅमजवळ पोहोचले, समोर काळ्या कुळकुळीत दगडांची उंच भिंत बांधली होती. या भिंतीत पायऱ्याही केल्या होत्या. त्या पायऱ्या चढल्या आणि धरणावर पोहोचले. पाहते तर समोर धरणात साठलेलं निळंशार पाणी अगदी लखलखत होतं. आकाशाची निळाई पाण्यात अगदी मिसळून गेली होती. पांढरे ढग या पाण्यात रूप पाहत पुढे जात होते. या डॅमच्या भवताली हिरवेगार डोंगर उभे होते. इथे उभं राहिलं की, एका बाजूला शेतीभाती असलेलं गाव दिसायचं आणि एका बाजूला निळंशार पाणी. निसर्गाचा हा सोहळा मी तिथल्या दगडावर बसून पहातच राहिले. संध्याकाळ कधी झाली ते समजलंच नाही. एकाएकी आकाशात मळभ दाटलं, पावसाचे थेंब पाण्यात पडून तरंग उमटू लागले. निघायची वेळ झालीच होती. त्यादिवशीची संध्याकाळची भटकंती अगदी सार्थकी लागली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी अणुस्कुरापासून पाच ते सात किमीवर असणाऱ्या बर्की गावात गेलो. हे गाव प्रसिद्ध आहे तिथल्या एक नाही तर दोन धबधब्यांसाठी, गावात जाताना कासारी नदीवर असणारा पूल पार केला. दोन ते तीन मिनिटांत गावातील मोकळ्या माळावर गाडी पार्क केली. तिथेही समोर धरण आहे. धबधब्याकडे जायचं असेल तर या धरणाच्या बाजूने असणाऱ्या वाटेने पायी जाता येतं किंवा धरणातून बोटीनेही जाता येतं. मी पायी जायचं ठरवलं. १५ मिनिटांची पायपीट केल्यावर समोर वनविभागाचं गेट दिसलं. तिथे प्रवेश फी देऊन ट्रेक करायला सुरुवात केली. वनविभागाने सुंदर ट्रेल केली आहे. उतरायला पायऱ्या, रॅम्प्स आहेत शिवाय रेलिंगही आहे. ही संपूर्ण वाट घनगर्द वनराईतून जाते. चढ-उतार करत, वाटेत लागणाऱ्या झऱ्यांवर असणारे पूल पार करत अर्धा ते पाऊण तास गेला असावा. मध्ये एक फाटा लागतो. एकीकडे उतरती आहे आणि दुसरीकडे सरळ वाट. उतरतीची वाट घेऊन तिकडे असणारा धबधबा बघायचं ठरवलं.. झाडाझुडपातून वाट काढत जात होते तसा धबधब्याचा जोरदार आवाज कानी पडू लागला. जसजशी धबधब्याजवळ जाऊ लागले, तसं मी त्याकडे आवासून पाहू लागले. पाच मिनिटांत मी धबधब्यापाशी पोहोचले.
पाहते तर माझ्या तिन्ही बाजूने एकसलग उंच कडा पसरला होता. त्याच्या पुढे मी अगदी मुंगीसमान दिसत असेन !! इतका तो उंच कडा होता. इथला परिसरही प्रशस्त, मोकळा असा. झाडे भवताली नव्हती, केवळ मोठमोठे दगड पसरले होते. प्रकाश भरपूर येत होता आणि वारा या कड्यामध्ये घुमत होता. समोरच्या कड्यावरून पाणी झोकून देत कोसळत होतं. पाणी कोसळायचं पण वाऱ्याने त्याचे तुषार अगदी ४०-५० फुटांवर यायचे. त्याचा डोहसुद्धा किती खोल असेल !! अगदी निळं-निळं पाणी दिसत होतं. एकमेकांचे संवाद ऐकू येणार नाहीद इतका त्या जलप्रपात्तचा आवाज होता. कड्यावर मधमाश्यांची असंख्य पोळी लागली होती. एकदम राकट असा तो धबधबा होता. पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे धबधबा अगदी निवांत बघता आला.
दुसरा धबधबा बघायला सरळसोट जी वाट होती तो फाटा घेऊन चालू लागले. तिथे पोहोचायला अगदी १५ मिनिटं लागली. पाहते तर इकडेही उंच कडा होता. पण आधीच्या धबधब्यासारखा पसरलेला नव्हता. पण काळ्या खडकाचा होता. त्यावर गुलाबी पाणतेरडा तर खुलून दिसत होता. हा धबधबा अगदी मोहक दिसत होता. पण अजस्त्र असाच होता. मोकळेपणाने पाणी त्या कड्यावरून कोसळत होतं. दोन्ही धबधबे अगदी मनमुराद बघितले. इथले डोह खोल असल्याने धबधब्यात भिजणं टाळलं. पण धबधबा पाहून मन अगदी प्रफुल्लित झालं होतं हे मात्र नक्की.
संध्याकाळी मात्र अणुस्कुरा घाटाकडे गेले. ढगांची धावपळ, अर्जुना डॅमवर चाललेला धुक्याचा पाठशिवणीचा खेळ बघत बसले. तिथेच मस्त गरमागरम कॉफी आणि कोळशाच्या भट्टीवर भाजलेलं, लिंबू-मीठ-चटणी लावलेलं कणीस खाण्याचा आस्वाद घेतला. अशी ही माझी अणुस्कुरा घाटाची पद्धतशीर पावसाळी भटकंती पार पडली.
जवळचे बसस्थानक - बाजारभोगाव, मलकापूर, कोल्हापूर
जवळचे रेल्वे स्टेशन – कोल्हापूर
कोल्हापूरपासून हे ठिकाण ६० किमीवर आहे. कोल्हापूर ते अणुस्कुरा अशी एक दिवसाची पावसाळी ट्रिप होऊ शकते. कोकणात किंवा गोव्यात जाण्याचा प्लॅन करत असाल तर सकाळी लवकर पोहोचून ही ठिकाणं पाहू शकता आणि पुढील प्रवासाला जाऊ शकता.
मलकापूर मार्गेही या ठिकाणी पोहोचता येईल.
बर्कीचा ट्रेक करताना जळू भरपूर लागतात. त्यामुळे शूज आवर्जून जवळ बाळगा. शिवाय जळू लागू नये यासाठी काळजी घ्या.
ट्रॅव्हल ब्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com