विशेष
ह.भ.प. देवदत्त परुळेकर
आषाढातील वारी आणि पालखी हे समूहभक्तीचं अनोखं उदाहरण आहे. वर्तमानात पंढरीच्या दिशेने एकत्रित चालणाऱ्या या पावलांना एक इतिहास आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक मन या इतिहासातून व्यक्त होतं. औरंगजेब दक्षिणेत उतरलेला असतानाच्या प्रतिकूल काळातही पंढरीच्या दिशेने जाणारी पावलं थांबलेली नव्हती.
पंढरी हे महाराष्ट्राचं हृदय आहे.’ - साने गुरुजी
ही ओळ म्हणजे फक्त एक भावना नाही; ती आहे संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या हृदयात धडधडणारी जाणीव. पंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही; ते आहे लाखो भक्तांचं माहेर आणि या माहेरी जाण्याचा साक्षात रस्ता म्हणजे आषाढीचा पालखी सोहळा आणि वारी.
वारी म्हणजे भावनांची उधळण, भक्तीची सजीवता आणि सामूहिकतेच्या ओढीचा अनुभव. वर्षभरात चार वाऱ्या पंढरीला जातात. माघी, चैत्री, आषाढी, कार्तिकी. यापैकी आषाढामधली वारी ही सर्वात मोठी मानली जाते. तिला ऐतिहासिक परंपराही आहे. कारण आषाढीच्या या वारीत संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघतात.
वारी ही कुणा एका घराची, कुणा एका जातीची नाही. ती सर्वसामान्यांची आहे. ती अन्नदाता शेतकऱ्याची आहे. ती ढोल, टाळ, मृदंग, पखवाज, झांज, चिपळ्यांची आहे. ती आत्म्याची आहे.
तुकोबांच्या अभंगातून वारीची ही ओढ उमटलेली आहे.
“संपदा सोहळा नावडे मनाला|
लागला टकळा पंढरीचा||
जावे पंढरीसी आवडी मनासी|
कधी एकादशी आषाढी ये|
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी|
त्याची चक्रपाणी वाट पाहे||”
वारी ही भावनेची तीव्रता आहे. ‘कधी आषाढी येतेय’ याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भक्तांच्या अंतःकरणात खुद्द विठोबा वाट पाहत उभा असतो. ही आहे या परंपरेची महानता.
ज्ञानोबा-तुकोबांची अविरत परंपरा सांगताना बहिणाबाई म्हणतात,
“ज्ञानदेवे रचला पाया,
तुका झालासे कळस..”
पंढरपूरच्या वारीला नेमकी सुरुवात कधी झाली याची निश्चित माहिती आज उपलब्ध नसली तरी ज्ञानेश्वर माऊलींचे आजोबा पंढरपूरच्या वारीला जात होते, याचे संदर्भ सापडतात. एकूण पंढरपूरच्या वारीला हजार-बाराशे वर्षांचा तरी इतिहास आहे. तुकोबांच्या काळातही ही वारी अव्याहत सुरू होती.
तुकोबांच्या काळात त्यांच्या सोबत १४०० टाळकऱ्यांची दिंडी पंढरपूरला निघत असे. त्यांच्या अवतारकार्याची सांगता १६५० मध्ये झाली. त्यांचे बंधू कान्होबा महाराज आणि नंतर तुकोबांचे पुत्र नारायण महाराज, यांनी ही परंपरा पुढे नेली. त्यांनीच पालखीचीही परंपरा सुरू केली.
पालखी सोहळ्याची सुरुवात
पालखी म्हणजे केवळ एक मिरवणूक नाही, ती एक सजीव श्रद्धा आहे. १६८५ मध्ये नारायण महाराज देहूकर यांनी तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन आळंदी गाठली. तिथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका त्याच पालखीत ठेवल्या. मग ‘ज्ञानबा-तुकाराम’ या एकतान भजनात आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान केले. ही पालखी म्हणजे संतांची साक्षात उपस्थिती.
राम वनवासात गेले, तेव्हा भरताने त्यांचं प्रतिनिधित्व स्वीकारून त्यांच्या पादुका गादीवर ठेवल्या. त्या पादुकांना रामस्वरूप मानून राज्य चालवलं. त्याच भावनेने नारायण महाराजांनीही पालखीला ‘संतस्वरूप’ मानलं.
तत्कालीन राजकीय पार्श्वभूमी
१६८० मध्ये शिवाजी महाराज कालवश झाले. औरंगजेब दक्षिणेत उतरला होता. अशा अस्थिर वातावरणात पालखी सुरू करणं म्हणजे केवळ भक्ती नाही, तर धाडसही होतं.
नारायण महाराजांनी संभाजीराजांकडून पालखी सोहळ्याला संरक्षण आणि मान्यता मिळवली. त्यामुळे वारीत आजही एक लष्करी शिस्त जाणवते. फडानुसार मिरवणूक, प्रत्येक दिंडीची ठरावीक जागा, गस्त, शिस्तबद्ध मार्ग आदी.
पालखी परंपरेत फूट
१८३५ मध्ये तुकोबांच्या वंशजांमध्ये मतभेद झाले आणि पालखी निघणार की नाही, यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं.
त्यावेळी ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांचे एक सरदार हैबतबुवा आरफळकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींची स्वतंत्र पालखी काढली. त्यांच्यासोबत अंकलीचे शितोळे सरकार होते. त्यांनी पालखीच्या तंबू, पूजा, नैवेद्याची व्यवस्था केली. दोन मानाचे घोडेही दिले.
आजही माऊलींच्या पालखीत दोन मानाचे घोडे असतात. एकावर कोणी बसत नाही. तो माऊलींचा घोडा. दुसऱ्यावर ध्वज घेऊन बसलेला वारकरी असतो. हे घोडे आजही रिंगण सोहळ्यात भाग घेतात.
यानंतर पुन्हा तुकोबांची पालखी देहू वरून निघून स्वतंत्र मार्गाने पंढरपूरकडे जाऊ लागली.
रिंगण : नादब्रह्माचा सोहळा
रिंगण म्हणजे वारीतील एक अद्भुत दृश्य. हजारो टाळकरी, पखवाजवादक, ढोल-ताशे वाजवत एकाच सुरात गात असतात, “ ग्यानबा-तुकाराम!”
घोडे त्या रिंगणात गोल फिरतात. भजन-कीर्तन चालतं. इथं भक्त आणि भगवंत यांच्यातली सीमारेषा विरते. वारकरी म्हणतात, हे नादब्रह्म आहे.
फड, दिंडी आणि भक्तीची रचना
पालख्यांबरोबर शेकडो दिंड्या असतात. प्रत्येक दिंडी म्हणजे एक गाव, समाज किंवा संस्थेचा प्रतिनिधी समूह. फड ही या दिंड्यांची एकत्र रचना असते. एका फडात अनेक दिंड्या असतात. वासकर, टेंबूकर, सातारकर, आजरेकर अशा शेकडो फडांनी ही परंपरा आजवर जपली आहे.
ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यात पालखी रथापुढे २७ दिंड्या आणि साधारण ४०० दिंड्या मागे असतात. सुमारे तीन लाखांहून अधिक वारकरी माऊलींबरोबर चालतात. तुकोबांच्या पालखीसोबत दीड लाखांहून अधिक वारकरी असतात. इतर संतांच्या दिंड्या स्वतंत्रपणे येतात. सर्व संतांच्या पालखी सोहळ्यांची रचना साधारणपणे अशीच असते.
वारी म्हणजे भक्ती, परंपरा आणि आत्मभान
वारी म्हणजे केवळ चालणं नाही. ती साधना आहे, प्रबोधन आहे, सामूहिकतेतून उगम पावलेलं भक्तीचं सामर्थ्य आहे. ती माहेरी जाण्याची भावना आहे.
नारायण महाराजांनी पालखी सोहळा सुरू केला म्हणजे नेमकं काय केलं याचं वर्णन सुप्रसिद्ध साहित्यिक दि. पु. चित्रे यांनी केला आहे. ते असं - “नारायण महाराजांनी जेव्हा देहूपासून पंढरीपर्यंत तुकोबांची पालखी दर आषाढीला न्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना हेच कळून आले होते की, आपल्या सर्वांचा हा बाप एका व्यापक भानाच्या रूपाने कायम अस्तित्वात आहे. पालखी आणि पादुका ही केवळ त्यांची प्रतीके आणि चिन्हे आहेत. ‘वारी’ हा कालचक्रात राहून कालबंधनापासून मुक्त होण्याचा अनुभव आहे. जीवनाची पीकपेरणी आणि कापणी समजून आल्याचा तो उत्सव आहे. ‘झाकूनिया मढें पेरणी म्यां केंली’ म्हणणारी, सर्व दुःखं पचवून, सर्व कष्ट विसरून पंढरीला ‘माहेरी’ जाणारी लाखो माणसं ‘काव्यशास्त्र’ जाणोत वा न जाणोत, त्यांना ‘ग्यानबा-तुकाराम’ हे सूत्र सापडलेले आहे आणि मराठी संस्कृतीचे आत्मभान त्यात व्यक्त झालेले आहे.”
मराठी संस्कृतीचं हे आत्मभान दरवर्षी वारीच्या रूपाने व्यक्त होत असते.
वारकरी परंपरेचे अभ्यासक.