डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
कोकणातील वेंगुर्ला जवळ वसलेले आसोली हे छोटेसे गाव माघ–फाल्गुन या दोन महिन्यात सुरंगीच्या सुगंधात हरवून जाते.. मोत्यासारख्या फुलांनी आणि त्यांच्या मोहक सुगंधाने नटलेले हे गाव केवळ निसर्गरम्य नाही, तर स्त्रियांच्या आयुष्यात आणि स्थानिक अर्थकारणातही महत्त्वाचे स्थान राखून आहे.
उन्हाळ्यात मागच्या वर्षी मी गेले होते सुगंधात मुग्ध झालेल्या गावी. या गावात अत्तर, साबण असे कोणी बनवत नाही; तर एक नैसर्गिक सुगंध माघ फाल्गुन महिन्यात इथे दरवळत असतो. हे सुगंधित गाव कुठे लांबच्या देशात नाही, आपल्याच जवळ कोकणात आहे. वेंगुर्ल्याच्या रमणीय भूमीत विसावलेले आहे. हे सुगंधित गाव आहे आसोली. महाराष्ट्र गोवा सीमेच्या जवळ हे गाव वसले आहे. इथे सुगंध दरवळतो मोत्यासारख्या फुलांचा अर्थात सुरंगीचा.
हे गाव तसे अगदी आडवाटेवर आहे. वेंगुर्ल्याकडून शिरोड्याकडे जाताना डाव्या बाजूला एक चिंचोळा रस्ता आसोली गावाकडे जातो. आपण योग्य रस्त्यावर आहोत हे गुगल मॅप दाखवेलच. ही झाली निर्जीव खूण. पण वाटेवरच्या झाडांखाली रंगीबेरंगी साड्या अंथरलेल्या दिसल्या, सुरंगीची फुले खुडताना स्त्रिया दिसल्या आणि वाट गंधित झालेली असली की, ओळखायचे आपण योग्य मार्गाने जात आहोत. ही झाली गाव ओळखायची चालतीबोलती खूण.
अशा सुगंधित वाटेने जात मी आसोली गावात पोहोचले आणि पाहताक्षणी या गावाच्या प्रेमातच पडले!! एखाद्या गोष्टीतील निसर्गरम्य गाव प्रकट व्हावे इतके सुंदर हे गाव आहे. या गावाला हिरव्यागार टेकड्यांनी कवेत घेतले आहे. येणारा वारा या टेकड्यांच्या बेचक्यात घोळत राहतो आणि मार्च एप्रिलच्या तळपत्या उन्हातसुद्धा गाव मग थंडगार राहते. टेकड्यांच्या कुशीत असलेल्या या गावात वायंगणी पद्धतीने भाताची लांबलचक शेतीही केली जाते. मी गेले होते तेव्हा भात कापणीला आले होता. या भातशेतीतून फिरायला काय मौज वाटली माहितीये..! याच भातशेतीच्या जवळ असणाऱ्या शेतवाडा इको फार्मस्टेमध्ये माझा मुक्काम होता. यांच्या खळ्यातच सुरंगीचे झाड आहे. होमस्टेचे मालक तुकाराम दादा आणि ओवी वहिनी अत्यंत गोड व्यक्तिमत्वे आहेत. त्यामुळे माझा इथला मुक्काम आनंददायी झाला होता..
तिथे पोहोचल्यावर संध्याकाळी गावाची भटकंती सुरू केली. देवगड किंवा पावस बाजूला गेलात की, आंब्याची झाडे कशी पुष्कळ दिसतात तशी इथे टेकड्यांवर, घरांच्या अंगणात, वाटेवर सुरंगीच्या फुलांची झाडेच झाडे दिसतात. तुम्हाला वाटेल की, आंब्याच्या झाडांप्रमाणे ही झाडे मोजता येतील. तर नाही. इथे सुरंगीची असंख्य झाडे आहेत आणि या झाडांची कुणी लागवड केलेली नाही, ही झाडे स्वतःच उगवून आली आहेत. ही झाडे डेरेदार वाढतात. असे सुरंगीचे जंगलच या गावाला लाभलेले आहे.
ही फुले जवळून न्याहाळण्यासाठी मी झाडांच्या जवळ गेले. पाहते तर झाडाच्या फांदीला चिकटून ही फुले आलेली दिसली. फुले इवलुशी, मोतिया रंगाची होती. आपले सोनेरी पराग खुलून दाखवत होती. या फुलांचा गंध एखाद्या अत्तरासारखाच असतो. प्रकर्षाने सोनेरी दिसणाऱ्या रंगामुळे आणि मोहक गंधामुळे या फुलांना कोकणचे सुगंधी सोने असे म्हणावे वाटले. यांच्या कळ्या पाहिल्या तर झाडाला मोती लागलेत की काय असा भास होतो. मार्च, एप्रिल म्हणजे मराठी महिन्यातील माघ-फाल्गुन महिन्याच्या काही काळापुरतीच ही सुरंगीची फुले भरभरून फुलतात. सुरंगीचा उमलण्याचा उत्सव सुरू असतो.
संध्याकाळच्या वेळी कळी फुटून फूल उमलते. मग या सुरंगीचा दरवळ झाडीतून वाट काढत कौलारू घरात शिरतो, माडाच्या झाडाभोवती फिरतो आणि हवेवर स्वार होत हा सुगंध सबंध गावाचा ताबा घेतो. काही स्त्रिया या फुलांचा वळेसर म्हणजेच गजरा करण्यात गुंग झालेल्या असतात. सुरंगीच्या सुगंधाने गंधित झालेल्या या गावाला ‘सुरंगीचे गाव’ म्हणतात.
या गावाचे अर्थार्जन याच सुरंगीवर चालते. झाडावर चढून सुरंगीच्या कळ्या, फुले काढली जातात. ही फुले गोळा करायला म्हणून झाडांखाली साड्या अंथरलेल्या असतात. टेकडीचा सगळा उतार हा साड्यांनी रंगीबेरंगी झालेला होता. काही फुले गळून साड्यांवर पडतात. ही फुले आणि कळ्या गोळा करून खळ्यात आणतात. ती मोठ्या चाळणीत घेऊन साफ करतात, जेणेकरून त्यातील कचरा वेगळा होईल आणि फक्त फुले राहतील. नंतर आपण धान्य कसे सुकत घालतो तशीच इथे सुरंगी सुकत घालतात. तीन उन्हे दिली की, ही फुले आणि कळ्या चांगल्या सुकतात आणि मग ही सुकलेली फुले मुंबईत मार्केटमध्ये पाठवतात. तिकडे याचा वापर परफ्यूम, सुगंधी द्रव्ये तयार करण्यासाठी होतो अशी माहिती मिळाली. या दोन तीन महिन्यात सगळे गाव या सुरंगीच्या कामात दंग झालेले असते. मी गेले होते तेव्हा गावातल्या अगदी छोट्या मोठ्या घरांच्या अंगणात, परसात सुरंगी सुकत घातलेली दिसत होती.
ही गोष्ट झाली अर्थार्जनाची पण या फुलाला कोकणातल्या स्त्रियांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. या सुरंगीची भूल कोकणातल्या प्रत्येक स्त्रीला असते. वेंगुर्ल्यातून जाताना एक समारंभ दिसला. तिथे प्रत्येकीने आंबाड्यात सुरंगीचा वळेसर माळला होता. वेंगुर्ला मार्केटमध्येही स्त्रिया हा वळेसर विकायला बसल्या होत्या. हा वळेसर करायची क्रियाही वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. मी जिथे राहिले होते तिथेच सुरंगीच झाड होतं आणि ओवीवाहिनीलाही वळेसर करता यायचा, त्यामुळे ही क्रिया मी अगदी जवळून पाहता आली.
सकाळी सूर्य वर येण्याच्या आधीच तिने सुरंगीच्या कळ्या काढल्या. या सुरंगीच्या कळ्या मोतीसारख्या गोलाकार असतात. त्या फुटल्या की कळीच्या वरचे दोन दल विलग होतात. केवळ अशाच कळ्या वळेसरासाठी काढतात. ओवीवहिनीने या फुटलेल्या कळ्यांचे दोन दल मुडपून निगुतीने धाग्यात विणले. हे काम कुशलतेने करावे लागते असे ती सांगत होती. नाहीतर फुले काळी पडतात. वळेसर झाल्यावर तो तिने टोपलीत ठेवला आणि टोपली घराच्या बाहेरच ठेवली. बाहेर कशासाठी ठेवायचा असे मी तिला विचारले. तिने सांगितले की, “या वळेसरावर दव पडावं लागतं. दवाचा ओला थंडगार स्पर्श कळ्यांना झाला की, फुले उमलू लागतात.” म्हणजे हा वळेसर हातातल्या कलेने आणि निसर्गाच्या जादूने तयार होतो हे समजले. मी सकाळी अगदी कुतूहलाने घरच्या बाहेर गेले; बघते तर टोपलीत कळ्या खुलून त्याची फुले झालेली होती. सोनेरी पराग खुलवून दाखवणारा, मोतिया रंगाचा वळेसर तयार झाला होता. तिथल्या मुलींनी मग माझ्या केसाचा अंबाडा घातला आणि केसात वळेसर माळलाही. आणि खरेच हा वळेसर माळला की, स्त्रियांचे रूप खुलून दिसते. इथल्या स्त्रियांना या फुलांचे अप्रूप तर आहेच शिवाय इथल्या देवालाही आहे. या मोसमात आरवलीच्या वेतोबा देवाचे वस्त्र म्हणजे देवाचा सदराच सुरंगीच्या फुलांपासून तयार केलेला असतो.
केवळ दोन महिने चालणाऱ्या सुरंगीच्या या सोहळ्यात स्त्रिया हा विशेष गंध परिधान करण्याची हौस पुरी करून घेतात आणि पुढच्या मोसमाची वाट पाहतात. मी सुद्धा या सुरंगीच्या गावात जाऊन सुगंधात हरवून गेले होते. तिथून माझा पाय निघत नव्हता. पुढच्या वर्षी पुन्हा येईन असे सांगितले होते. आता सुरंगीचा मोसम सुरू झाला आहे आणि माझे मन आसोलीकडे धावत आहे. लवकरात लवकर प्लॅन जमवेनच. तुम्हीसुद्धा हा अनुभव नक्की घ्या.
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com