नास्तिक म्हणजे दुर्जन ! 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
अक्षररंग

नास्तिक म्हणजे दुर्जन !

नास्तिक म्हणजे दुर्जन, स्वार्थी किंवा तत्त्वहीन व्यक्ती, हा समाजात रूढ झालेला गैरसमज आहे. मात्र नास्तिकता ही केवळ देव नाकारण्याची भूमिका नसून विवेक, बुद्धिप्रामाण्य आणि स्वतंत्र विचारांवर आधारलेला दृष्टिकोन आहे. माणसाचे चांगलेपण त्याच्या धार्मिक श्रद्धेवर नव्हे, तर त्याच्या आचरणावर ठरते. त्यामुळे नास्तिकतेकडे पूर्वग्रहाने नव्हे, तर विवेकाच्या आणि मानवतावादी दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे.

नवशक्ती Web Desk

समाजचिंतन

जगदीश काबरे

नास्तिक म्हणजे दुर्जन, स्वार्थी किंवा तत्त्वहीन व्यक्ती, हा समाजात रूढ झालेला गैरसमज आहे. मात्र नास्तिकता ही केवळ देव नाकारण्याची भूमिका नसून विवेक, बुद्धिप्रामाण्य आणि स्वतंत्र विचारांवर आधारलेला दृष्टिकोन आहे. माणसाचे चांगलेपण त्याच्या धार्मिक श्रद्धेवर नव्हे, तर त्याच्या आचरणावर ठरते. त्यामुळे नास्तिकतेकडे पूर्वग्रहाने नव्हे, तर विवेकाच्या आणि मानवतावादी दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे.

नास्तिक म्हणजे वाईट माणूस अशी ओळख सिनेमा आणि प्रसारमाध्यमातून तसेच आस्तिकांच्या साहित्यातून होत असते. त्यामुळे बरेच जण आपण नास्तिक आहोत असे सांगणे टाळतात. समाजामध्ये असे लोक देखील आहेत की जे देव आणि धर्म यांच्याशिवायही जगू इच्छितात. त्यामुळे समाजामधील नास्तिकांच्या संबंधी जे गैरसमज आहेत ते दूर करणे महत्वाचे आहे.

खरे पहाता, व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचा आणि चांगुलपणाचा धर्म आणि देव यांच्याशी काही सबंध नसतो. कारण व्यक्तीच्या देवधर्मविषयक श्रद्धावर आधारित त्याचे माणूसपण सिद्ध होत नसते. त्यामुळे कोणत्याही अर्थाने माणसाचे मूल्यमापन त्याच्या धार्मिक श्रद्धांच्या आधारे करण्यापेक्षा त्याच्या वर्तनाच्या आधारे करणेच योग्य. शहीद भगतसिंगने ईश्वराबद्दलचे मत परखडपणे तुरुंगात असताना गुरुमुखीत 'मी नास्तिक का आहे?' असा निबंध लिहून व्यक्त केले होते. मरणाच्या जवळ असतानांही त्याने ईश्वराची प्रार्थना केली नाही.

“नास्तिक असणे म्हणजे केवळ ढोंग आहे”,

“नास्तिक व्यक्ती स्वार्थी असतात”,

“जेव्हा जीवावर संकट येईल, तेव्हा त्यांना देव आठवेल”,

“नास्तिक व्यक्ती तत्त्वहीन असतात”,

अशा अनेक स्वरूपाच्या गैरसमजांना शहीद भगतसिंग यांच्या उदाहरणाने छेद जातो. शोषणाचे मूळ हे नशीब किवा अदृश्य शक्तीच्या इच्छेमध्ये नसून मानव निर्मित आहे हा त्यांच्या क्रांतिकारी तत्वज्ञानाचा गाभा आहे.

नास्तिकता हा शब्द भारतीय तत्वज्ञानात विविध अर्थांनी प्रचलीत आहे. याचा एक दार्शनिक अर्थ म्हणजे वेदप्रामाण्य नाकारणारे. दुसरा रुढार्थ देव किवा कुठलेही ईश्वरी अस्तित्व नाकारणारे. तिसरा व्यावहारिक अर्थ म्हणजे भौतिक विश्वाच्या पलीकडले गृहीत धरलेले जीवन नाकारणारे. आणि चौथा अगदी अर्वाचीन अर्थ म्हणजे बुध्दीप्रामण्य स्वीकारणारे. वेगवेगळ्या कालखंडात नास्तिक या शब्दांची व्याख्या बदललेली आढळते. आज सर्व सामान्यपणे देव नाकारणारा अशी नास्तिक शब्दाची ओळख आहे. परंतु धार्मिक कर्मकांड न मानणाऱ्या व्यक्तीना देखील तो नास्तिक आहे असे म्हटले जाते. विश्वाची निर्मिती करणाऱ्या आणि मानवासहित सर्व विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या सर्वशक्तिमान अलौकिक शक्तीचे अस्तित्व नाकारणाऱ्यांना निरीश्वरवादी म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.

मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला असता असे दिसते की, विकासाच्या एका टप्प्यात ईश्वराची संकल्पना निर्माण झाली. अगदी प्राथमिक अवस्थेतील मनाला जाणवलेल्या पंचमहाभूतांच्या भयग्रस्त स्वरूपापासून प्रारंभ झालेला हा ईश्वरी शोधाचा प्रवास मानवाच्या स्वत:च्या विकासाबरोबर विश्वचैतन्याच्या कल्पनेपाशी येऊन थांबतो. पण जनसामान्यांचा ईश्वर मात्र नवसाला पावणारा, भक़्तीला जागणारा, असतो. अशा ईश्वराचे स्वरूप गृहीत धरल्यावर त्या सर्वच देवता पराक्रमी असणे हे ओघाने आलेच. थोडक्यात, मानवी सद्गुणाच्या कल्पनांनी ईश्वराला मढवले. ईश्वर हा विश्वाचा नियंता आहे, हा विचार संस्काराने दृढ केलेला असतो. पण ईश्वाराच्या गृहीतकामुळे समाजातील कुठलीही अनैतिकता कमी झालेली दिसत नाही. उलट चित्र असे दिसते की, सर्व प्रकारच्या गैरव्यवहारासाठी फार मोठा आधार ईश्वराच्या नावावर धर्माचा, धर्म संस्थेचा व धर्माचार्यांकडून घेतला जातो. (आठवा राम मंदिर दानपेटी घोटाळा) ही एक अंतर्मुख करणारी बाब आहे. तसेच दयाघन म्हणून गृहीत धरलेला, संकटात हाकेला ‘ओ’ देणारा हा ईश्वर कधीही कुणाचेही प्रश्न सोडवण्यास अवतरेल ही समजूत मानवाला फसवा आधार देत असते. परिणामी माणूस पलायनवादी होतो.

सहाजिकच समाजातील हे वास्तव सजग विचारी माणसांना नास्तिकतेकडेच नेणारे आहे. खरे तर, मानवाचे कुठलेही प्रश्न हे केवळ त्याच्या आपापसातल्या प्रामणिक भावनेतून, एकमेकांच्या सहकार्यातूनच सुटणार असतात, हे उघड आहे. नास्तिकता ही बुध्दीप्रामण्यावर आधारलेली असल्यामुळे ते एक जीवनमूल्य आहे. अंगीकारलेला नास्तिकतेचा विचार हा विवेकनिष्ठ दृष्टीकोन असतो. या भूमिकेमुळे नास्तिक हा पाखंडी नसून समाजातील विवेकाचा तसेच धर्मनिरपेक्ष नैतिक मूल्यांचा प्रसार करणारा असतो. तो स्वत: जबाबदारीने तर वागतोच, पण समाजालाही जबाबदारीने वागण्यास प्रवृत्त करतो. कदाचित हे आदर्शचित्र वास्तवात येणे आज दुरापास्त दिसत असेल; परंतू किमान आज धर्माच्या नावाखाली जे अस्मितावादी अध:पतन होतांना दिसते आहे, ते कमी होण्यास या विचाराची नक्कीच मदत होईल.

यावरून असा निष्कर्ष काढता येईल की, नास्तिक माणूस हा अधिक नीतिमान असण्याचीच शक्यता जास्त असते. (म्हणूनच कारागृहात नास्तिकांची संख्या कमी असते.) कारण तो देवाधर्माच्या आणि त्यातल्या पापपुण्य संकल्पनांना घाबरून जगत नाही. नीतीने वागणे ही त्याची स्वतःची जबाबदारी आणि गरजही असते, याच्या अगदी उलट आस्तिक माणसाचे असते. देवावर प्रेम करायचे का त्याला घाबरायचे यातच तो गुरफटून जातो आणि देव नावाच्या कल्पनेची तो भौतिक सांस्कृतिक चिकित्सा करायचे विसरून जातो, तसा अवकाश देखील त्याला ठेवलेला नसतो. देव नावाच्या कल्पनेमागे चतुर आणि लबाडांचे संघटन पद्धतशीरपणे काम करीत असते, सामान्य माणूस त्याचा बळी असतो. 'नास्तिक' म्हटलं की समाज त्याच्याकडे तुच्छतेने पाहतो. कुटुंबातले पण तुमचा राग राग करू पाहतात. समाज कायम 'आमच्या भावना दुखावाण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला?' असा प्रश्न विचारून त्याला दाबात ठेवण्याचा प्रयत्न करतो. खरे तर संघटीत धर्म ही एक भयंकरच गोष्ट आहे. जगाची उत्पत्ती कशी झाली याचं उत्तर एखाद्या परीक्षेत अनिवार्य असणाऱ्या प्रश्नासारखं देव, असं देऊन मोकळं होता येईल का? तर नाही. म्हणून तर्कहीन संकल्पनांना प्रश्न विचारावेच लागतील, आस्तिकांच्या हितसंबंधांना धक्का द्यावाच लागेल. ही दैवी गुलामीची बंधनं झुगारावी लागतील. आस्तिकांचा मात्र आपले विचार लोकांवर लादण्याचा, जबरदस्तीने मान्य करवून घेण्याचा प्रयत्न असतो. खरंतर जबरदस्तीने तर्कशून्य विचार मान्य करायला लावणे ही एक प्रकारची हिंसाच असते. बऱ्याच नास्तिकांची भूमिका मात्र आपण असे का आहोत? आपण देव का मानत नाही, याबाबत संवादाची असते. भारतीय परंपरेत ती चार्वाकांपासून सुरु होते. बुद्ध असो की भगतसिंग यांनी नास्तिक विचार आग्रहाने मांडला. तशी ही झुंज सोपी नसली तरी करावी लागणारच आहे.

भारतीय राज्यघटना ही धर्माचं स्वतंत्र देते, असं लोक ढोबळपणे बोलतात; पण ते तसं नाही. ते कलम असं आहे की, व्यक्तीच्या सद्सदविवेक बुद्धीला पटेल त्या धर्माचं, श्रद्धेचं आचरण. यात कोणतीही जबरदस्ती नाही. कारण आचरणाचा निकष हा सद्सद्विवेक बुद्धी आहे, आणि माझी सद्सद्विवेक बुद्धी मला धर्म आणि देव यात गुंतून पडायची परवानगी देत नाही. म्हणून नास्तिक जगावेगळे नसतात तर ते या जगाला शांतीप्रिय बनवणारे, स्वतंत्र बुद्धी-विचारासाठी पोषक वातावरण निर्माण करणारे असतात. थोडक्यात 'नास्तिक म्हणजे दुर्जन' असे समजणे ही अस्तिकांनी स्वतःचा आस्तिकपणा शाबूत ठेवण्यासाठी काढलेली पळवाट आहे.

लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.

jetjagdish@gmail.com

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय

रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू