ग्रीन गॉसिप्स
सांबारवडी- भाग्यश्री पटवर्धन
एप्रिल-मे महिन्यात रस्त्यावरून चालताना अचानक तुमच्या डोळ्यांसमोर सोन्याचा वर्षाव झाल्याचा भास झाला, तर समजा तुमच्या भेटीला निसर्गाचा ‘राजवृक्ष’ म्हणजेच ‘बहावा’ आला आहे!
मुलांनो, सध्या एप्रिल-मे महिना सुरू झाला आहे. बाहेर कडक ऊन पडत आहे, पण याच उन्हाळ्यात आपल्या आजूबाजूच्या निसर्गात एक विलक्षण जादू घडताना दिसते. रस्त्याच्या कडेला, मोठ्या बागांमध्ये किंवा कोणाच्या तरी अंगणात नजर टाकलीत, तर तुम्हाला अचानक एक चमचमणारा, डोळे दिपवणारा पिवळा रंग दिसायला लागेल. लांबून पाहिलं तर असं वाटतं की, जणू साक्षात आकाशातून सोन्याचा पाऊस धरतीवर पडला आहे! हे अतिशय सुंदर आणि लक्षवेधक झाड म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपला लाडका ‘बहावा’ आहे. या झाडाचं सौंदर्य इतकं मोहक असतं की ते पाहिल्यावर मनात आपोआप आनंदाचे तरंग उमटतात आणि तोंडातून शब्द फुटतात— “वाहवा! काय हे सुंदर झाड!”आणि कदाचित म्हणूनच याला मराठीत ‘बहावा’ हे नाव पडलं असावं.
बहावा हा केवळ दिसायलाच सुंदर नाही, तर तो आपल्या देशातील अतिशय खास आणि प्राचीन वृक्ष मानला जातो. आपल्या संस्कृत साहित्यात तर याचं वर्णन खूप गौरवान्वित केलं आहे. संस्कृतमध्ये याला ‘आरग्वध’ असं म्हटलं जातं. प्रसिद्ध ‘अमरकोषात’ या वृक्षाला ‘राजवृक्ष’ आणि ‘सुवर्णक’ अशी अतिशय रॉयल नावं दिली आहेत. ‘सुवर्णक’ म्हणजे सोन्यासारखा तेजस्वी दिसणारा वृक्ष! आणि खरंच, जेव्हा बहावा पूर्णपणे फुलतो, तेव्हा तो सोन्याच्या वर्षावासारखाच भासतो. याला ‘कर्णीकार’ असंही एक नाव आहे, ज्याचा अर्थ होतो कानात घालण्यासारखा अतिशय सुंदर अलंकार. तर ‘कृतमाला’ म्हणजे फुलांच्या लांबच लांब माळांनी सजलेला वृक्ष. इंग्रजी भाषेने सुद्धा याचं सौंदर्य ओळखून याला ‘Golden Shower Tree’ असं सार्थ नाव दिलं आहे. याशिवाय याला ‘Indian Laburnum’ आणि ‘Pudding Pipe Tree’ असंही म्हणतात. विज्ञानाच्या भाषेत याला ‘Cassia fistula’ म्हणतात. ‘फिस्टुला’ म्हणजे नळीसारख्या लांब शेंगा असलेला वृक्ष. हिंदी भाषेत आपण याला ‘अमलतास’ म्हणून ओळखतो.
बहाव्याच्या जीवनचक्राची एक गंमत आहे. हिवाळ्याच्या दिवसांत या झाडाची पानं गळून पडतात आणि झाड अगदी रिकामं दिसतं. पण एप्रिल-मे महिन्यात उन्हाच्या झळा जशा वाढतात, तसं या झाडावर लांब, झुबक्यांच्या स्वरूपात पिवळी धमक फुलं यायला सुरुवात होते. झाडावर एकही पान नसतं, फक्त पिवळ्या फुलांच्या माळा लटकत असतात. हे झाड जणू पिवळ्या रंगाच्या प्रकाशात न्हाऊन निघाल्यासारखं वाटतं. या फुलांच्या आत लांब पुंकेसर असतात आणि त्यामध्ये भरपूर गोड मधुरस भरलेला असतो. यामुळेच भुंगे, मधमाश्या आणि इतर रंगीबेरंगी कीटक या फुलांकडे आकर्षिले जातात. कीटकांसाठी तर बहावा म्हणजे उन्हाळ्यातील एक मोठी मेजवानीच असते!
उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसांत या झाडावर हिरव्या रंगाच्या, नळीसारख्या लांब शेंगा दिसायला लागतात. या शेंगांना पिकून पक्व व्हायला जवळजवळ पूर्ण एक वर्ष लागतं. जेव्हा त्या पूर्ण पिकतात, तेव्हा त्या गडद तपकिरी किंवा चॉकलेटी रंगाच्या होतात. या शेंगेच्या आत एक चिकट, गोडसर गर असतो. या गरामध्ये छोटे-छोटे कप्पे असून प्रत्येक कप्प्यात एक बी असते. विशेष म्हणजे या शेंगा इतर शेंगांसारख्या झाडावरच फुटत नाहीत, तर त्या तशाच अखंड खाली पडतात. या शेंगेतील गर औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतो. विशेषतः पोट साफ करण्यासाठी (लॅक्झेटिव) याचा आयुर्वेदामध्ये खूप वापर केला जातो. जंगलातील अस्वल, कोल्हे, माकडं आणि साळिंदर यांसारखे प्राणी हा गर आवडीने खातात. या प्राण्यांमुळेच बहाव्याच्या बिया दूरवर पसरतात आणि निसर्गात आपोआप नवीन झाडं उगवतात.
बहाव्याचं सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वही खूप मोठं आहे. केरळमध्ये जेव्हा ‘विशू’ हा नवीन वर्षाचा सण साजरा केला जातो, तेव्हा बहाव्याच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. तिथे या फुलांना ‘कणीकोणी’ म्हणतात. भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर या फुलांची अतिशय सुंदर सजावट केली जाते. इतकंच नाही, तर बहावा हे केरळ राज्याचं ‘राज्यफूल’ देखील आहे. मुलांनो, तुम्हालाही तुमच्या घरासमोर हा सोन्याचा पाऊस पाडायचा असेल, तर बहावा लावणं खूप सोपं आहे. याची लागवड बियांपासून करता येते. बिया लावण्यापूर्वी त्या रात्रभर कोमट पाण्यात भिजवून ठेवल्या की त्या लवकर अंकुरतात. या झाडाला खूप जास्त पाण्याची गरज नसते, उलट कमी पाण्यात तो अधिक चांगल्या प्रकारे फुलतो. म्हणूनच आपल्या निसर्गाने दिलेली ही सोनसळी भेट आपण सर्वांनी मिळून जपायला हवी आणि आपल्या परिसरात बहावा नक्की लावायला हवा!
bhgya2510@gmail.com