अभिनेत्रींच्या आईची सावली 
अक्षररंग

अभिनेत्रींच्या आईची सावली

हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय अभिनेत्रींसोबत त्यांची आई ही नेहमी सावलीसारखी पाहायला मिळते. करियरच्या सुरुवातीच्या काळात हे नैसर्गिक वाटत असले तरी कालांतराने काही अभिनेत्रींच्या आईने अनेक बाबतीत हस्तक्षेप करुन डोकेदुखी निर्माण केल्याचीही असंख्य उदाहरणे आहेत.

नवशक्ती Web Desk

विशेष लेख

दिलीप ठाकूर

हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय अभिनेत्रींसोबत त्यांची आई ही नेहमी सावलीसारखी पाहायला मिळते. करियरच्या सुरुवातीच्या काळात हे नैसर्गिक वाटत असले तरी कालांतराने काही अभिनेत्रींच्या आईने अनेक बाबतीत हस्तक्षेप करुन डोकेदुखी निर्माण केल्याचीही असंख्य उदाहरणे आहेत.

धर्मेंद्र जेव्हा हेमा मालिनीसोबत अधिकाधिक चित्रपटांतून भूमिका साकाराव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याच्या दिवसांतील गोष्ट... या जोडीची भूमिका असलेल्या राजा जानी, सीता और गीता, जुगनू, शोले, आझाद इत्यादी चित्रपटातील प्रणय दृश्य छान खु्लली फुलली होती.

एका गॉसिप्स मॅगझिनमधून ही जोडी रुपेरी पडद्यावर अशी छान खुलली यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी म्हटले, एक म्हणजे अशा प्रणय दृश्यांचे रिटेक व्हावेत यासाठी धर्मेंद्रच जाणीवपूर्वक प्रयत्न करतो, दिग्दर्शकाला आपलेसे करतो. हेमा मालिनीच्या जवळ राह्यची, जायची त्याला हीच एक चांगली संधी होती, कारण कधीही पहावं तर हेमा मालिनीची आई जया चक्रवर्ती या कायम हेमा मालिनीसोबत सावलीसारख्या असत.

.....त्या काळातील हेमा मालिनीची भूमिका असलेल्या अनेक चित्रपटांचेही मुहूर्त, देश विदेशातील बाह्यचित्रीकरण स्थळे, प्रीमियर्स, फिल्मी पार्ट्या यांची छायाचित्रे पहाल तर हेमा मालिनीच्या जवळ अथवा आसपास जया चक्रवर्ती हमखास पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, जया चक्रवर्ती यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रांतही पाऊल टाकले. त्यांनी गुलशन रॉय यांच्यासोबत निर्माण केलेल्या आणि प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित ‘ ड्रीम गर्ल ‘(१९७७) या चित्रपटात धर्मेंद्र नायक आहे. त्यांनीच बासू चटर्जी दिग्दर्शित ‘ रत्नदीप’ (१९७९) या चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा आणखी एक गॉसिप जन्माला आले. त्या चित्रपटात गिरीश कर्नाड यांनी हेमा मालिनीच्या पतीची भूमिका साकारली आहे आणि गिरीश कर्नाड व हेमा मालिनी हे अधिकाधिक जवळ यावेत, त्यांचे सूर जुळावेत यासाठीच जया चक्रवर्ती यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. हे खरं की खोटं हे कधीच स्पष्ट झाले नाही... हेमा मालिनी व त्यांची आई जया चक्रवर्ती यांच्या नात्याचे हिंदी चित्रपटसृष्टी, प्रसार माध्यमे आणि चित्रपट रसिकांना कायमचं कौतुक वाटलं.

चित्रपटाच्या जगात अनेक अभिनेत्री आपल्या आईसोबत (काही अभिनेत्री आई-वडीलांसोबत) वावरत आणि ते त्यांचं खास वैशिष्ट्य ठरलं. सुरय्याने देव आनंदशी लग्न करु नये यासाठी तिच्या आईनेच खो घातला आणि सायरा बानोच्या आईने आपल्या स्टार मुलीने राजेंद्रकुमारपासून दूर रहावं यासाठी प्रयत्न केलाच आणि आपल्या लाडक्या मुलीचं लग्न दिलीपकुमारशी जुळवून आणलं.

अनेक अभिनेत्रींनी आपल्या आई वडिलांना या झगमगाटी क्षेत्रापासून शक्य तितकं लांब ठेवलं. यात पालकांचा आपल्या मुलीवरचा विश्वास दिसतो तसेच त्या युवतीनीही आपल्या आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनातून आपला मार्ग काढत काढत वाटचाल केली.

मला आठवतंय, राजश्री प्रॉडक्शन निर्मित ‘अबोध ‘(१९८४) या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मरीन ड्राईव्ह येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका टी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात ‘अबोध’चे नवीन चेहरे तापस पॉल आणि माधुरी दीक्षित यांची आम्हा सिने पत्रकारांशी सदिच्छा भेट आयोजित करण्यात आली असता माधुरी दीक्षित अंधेरी पूर्व येथील जे. बी. नगर येथून आपल्या आई वडिलांसोबत आली होती. तिचा हा पहिलाच चित्रपट असल्याने तिला आपल्या आई वडिलांसोबत येणं स्वाभाविक वाटलं. पण माधुरी दीक्षित अगदी कायमच आपल्या आई वडिलांसोबत चित्रपटसृष्टीत वावरताना दिसली. मग तो नटराज स्टुडिओतील एन. चंद्रा दिग्दर्शित ‘तेजाब’(१९८८) चा मुहूर्त असो, वांद्रे येथील पाली हिलवरील राजेंद्र कुमारच्या डिंपल बंगल्यावरील संगीतम श्रीनिवास राव दिग्दर्शित ‘फूल’(१९९३) चित्रपटाची पार्टी असो.

अभिनय क्षेत्रात देशाच्या विविध भागांतून कलाकार येत असतात, त्यांना चित्रपटसृष्टीतील वातावरणाची सवय लागावी लागते, अशा वेळी आपल्यासोबत आपले आई वडील असतील तर एक प्रकारचा मानसिक भावनिक आधार मिळतो. चित्रपटसृष्टीची हीदेखील एक बाजू आहे. काही कलाकार हे स्टार सन्स असतात, त्यांचे पालकही अनेक वर्षं याच क्षेत्रात वावरत असतात, त्यांना चित्रपटाचं पडद्यामागचे जग कसं आहे याची साधारण कल्पना असते.

दिग्दर्शक यश चोप्रा यांनी ‘चांदनी’ (१९८९) या शीर्षक भूमिकेसाठी श्रीदेवीला चेन्नईत (तेव्हाचे मद्रास) जाऊन करारबद्ध केलं. चित्रपटात श्रीदेवी शीर्षक भूमिकेत असावी, अशी त्यांची इच्छा होती. आता गंमत अशी की, श्रीदेवीच्या आईला यशजीच्या दिग्दर्शनीय मोठेपणाबद्दल काहीही घेणं-देणं नव्हतं. मानधन किती मिळणार हे महत्त्वाचं होते. श्रीदेवीच्या तारखांची डायरी तिची आई पहात होती आणि जास्त मानधन दिल्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. ‘चांदनी’ श्रीदेवीच साकारेल असं यश चोप्रा यांचं व्हिजन होतं, म्हणून त्यांनी जास्त पैसे देऊन श्रीदेवीला करारबद्ध केलं. ‘चांदनी’चं प्रत्यक्षातील चित्रीकरण सुरू झालं आणि श्रीदेवीच्या आईच्या लक्षात आलं की, आपल्या मुलीला प्रामुख्याने सफेद रंगाचे कपडे परिधान करायला दिले जात आहेत. दक्षिण भारतात हा रंग अशुभ मानला जातो. त्यापेक्षा रंगीत कपडे द्यावेत असे श्रीदेवीच्या आईला वाटत होतं. यावर यश चोप्रा यांनी समजून सांगितले की, या चित्रपटाच्या प्रेमकथेला हाच सफेद रंग अतिशय योग्य ठरेल. चित्रपट पडद्यावर आल्यावर यशजीच्या बोलण्यातील तथ्य दिसून आलं.

श्रीदेवी आपल्या आईच्या सावलीत आहे. हे आम्हा सिनेपत्रकारांना’ खुदा गवाह’, ‘गुमराह’ अशा चित्रपटांच्या शूटिंग रिपोर्टिंगसाठी सेटवर जाणं झालं तेव्हा लाईव्ह अनुभवता आलं. श्रीदेवीचं आपल्या आईसोबतचं सेटवरचं वागणं दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी ‘रंगीला’ (१९९५) मध्ये मस्त फिरकी घेत खुलवलंय.

शिल्पा शेट्टीनेही या मनोरंजन क्षेत्रात आपल्या आई-वडिलांचा हात धरूनच पाऊल टाकलं. मला आठवतंय, अंधेरीतील नटराज स्टुडिओत दिलीप नाईक दिग्दर्शित ‘गाता रहे मेरा दिल’ या नावाच्या चित्रपटाचा मुहूर्त होता. चित्रपटात रोहित रॉय आणि शिल्पा शेट्टी असे दोन नवीन चेहरे आहेत असे मुहूर्ताच्या आमंत्रण पत्रिकेवरच म्हटलं होतं. शिल्पा शेट्टीचं स्टुडिओत आगमन झालं तेच आपल्या आई- वडिलांसोबत! पहिल्याच दिवशी तिने हसत खेळत वातावरण हलकं केलं. हा चित्रपट दोन रिळाच्या चित्रीकरणानंतर कायमचा डब्यात गेला. शिल्पा शेट्टी मात्र स्टार झाली आणि अनेकदा तरी आपली आई सुनंदा शेट्टी यांच्यासोबतच चित्रपटसृष्टीत वावरु लागली. सुनंदा शेट्टी यांच्याशी छान गप्पा मारल्या की, त्या शिल्पाला सांगत, दोन दृश्यांमध्ये जसा वेळ मिळेल तशी यांना मुलाखत दे.

ऐश्वर्या ‌राय ही आपली आई वृंदा राय यांच्यासोबत चित्रपटाच्या जगात विविध इव्हेंटसमध्ये दिसणार हे जणू ठरलेलं. तरीही सलमान खान गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’ (२००२) च्या सेटवर ऐशला भेटायला जायचा. त्या चित्रपटात त्याची भूमिका नसूनही तो हे करायचा, याला वृंदा राय यांची मूकसंमती तर नव्हती ना? चित्रपटाच्या जगात काहीही घडू (बिघडू) शकतं.

मराठी चित्रपटसृष्टीतील सुपर स्टार‌ वर्षा उसगावकरही पूर्वी अनेकदा आपल्या आईसोबत असे. एकदा खुद्द वर्षा उसगावकरनेच माझी आपल्या आई-वडिलांशी आवर्जून ओळख करून दिली. कालांतराने म्हणजे या शतकाच्या सुरुवातीपासून आपल्या आई वडिलांसोबत चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणं हे कमी कमी होत गेलं. हे बदलत्या काळानुसार घडलं असावं. कदाचित आपल्या निर्णयात आपल्या आई वडिलांचा प्रभाव अथवा हस्तक्षेप नसावा अशीही त्यामागची भावना असावी... चित्रपटाच्या जगातील अभिनेत्रीची आई हादेखील एक रंजक फंडा.

ज्येष्ठ सिने पत्रकार

...तर कंत्राटी कर्मचारी नियमित नियुक्तीचा हकदार बनत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

प्रभाग समित्यांवर बिगर सरकारी प्रतिनिधी; १४ वर्षांनंतर संघटनेचे प्रतिनिधी प्रभाग समित्यांवर

Mumbai : मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान ब्लॉक

मीरा-भाईंदरमधील २५४ एकर जमीन सरकारीच; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा, जमीन बिल्डरला देण्याच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार

Pune : शरद पवार गटाच्या विकास लवांडेंवर शाईफेक