चिमुकल्या हातांची ताकद 
अक्षररंग

चिमुकल्या हातांची ताकद

बाळू आणि त्याचे मित्रमंडळ रविवारी सुट्टीच्या दिवशी बरोबर सकाळी आठ वाजता सुभाषनगर मैदानावर जमले.

नवशक्ती Web Desk

कथा

एकनाथ आव्हाड

बाळू आणि त्याचे मित्रमंडळ रविवारी सुट्टीच्या दिवशी बरोबर सकाळी आठ वाजता सुभाषनगर मैदानावर जमले. आज ते आठ ते दहा वाजेपर्यंत म्हणजे चांगले दोन तास मनसोक्त क्रिकेट खेळणार होते. बाळू त्यांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार होता. मैदानाच्या मध्यभागी असलेल्या खेळपट्टीच्या दोन्ही टोकांना तीन-तीन लाकडी यष्टी त्यांनी आधी चांगले ठोकून घेतले. बाळूने मग मुलांचे दोन संघ तयार केले. टाॅस टाकून बाळूच्या संघाने फलंदाजी निवडली आणि प्रतिस्पर्धी संघाने गोलंदाजी निवडून क्षेत्ररक्षण करण्याचे ठरविले. एकदाचा खेळ सुरू झाला.

हळूहळू खेळ चांगला रंगात येत होता. तेवढ्यात अमर मित्र मंडळाची क्रिकेटची टीम बॅट, बॉल आणि स्टम्स घेऊन त्याचवेळी तेथे खेळण्यासाठी आली. त्यांच्यातला एक जण लगेच म्हणाला, "ये, बस झालं तुमचं खेळणं. आम्हाला खेळायचंय आता इथं. चला फुटा."

बाळू समजवण्याच्या स्वरात म्हणाला, "आमची मॅच संपली की खुशाल खेळा तुम्ही. पण आम्ही अर्धवट खेळ सोडणार नाही. तुमच्याआधी आलोय आम्ही इथं खेळायला."

"ए, आधी नंतरवाल्या, आम्हाला ते काय माहीत नाही. बऱ्याबोलाने तुम्ही चला निघा इथून. ये पोरांनो, उखडा रे त्यांचे स्टम्स आणि द्या फेकाटून," त्यांच्यातला म्होरक्या गुरगुरला.

बाळू म्हणाला, "तुम्ही स्टम्सला हात तर लावून दाखवा. मग दाखवतो तुम्हाला आमचा इंगा. चांगली अद्दल घडवतो." दोन्ही संघ हमरातुमरीवर आले आणि बाचाबाची सुरू झाली. ते हाणामारीला सुरुवात करणार तेवढ्यात नेमके बाळूचे बाबा तिथे आले. ते काही कामासाठी निघाले होते. क्रिकेट हा त्यांचा आवडीचा खेळ असल्याने मुलांना खेळताना पहावे आणि जमल्यास काही टिप्स द्याव्यात म्हणून त्यांची पावलं मैदाனாकडे वळली होती. पण इथे येऊन ते पाहतात तर काय, मुलांचा खेळ बाजूलाच राहिलाय आणि त्यांच्यात भांडण सुरू झालंय.

बाबांनी मध्यस्थी करून आधी त्यांचं भांडण थांबवलं. बाळूने घडलेली हकीकत सांगितल्यावर बाबा म्हणाले, "अरे, आधी आणि नंतर कुणी खेळायचे... यावर कसले रे भांडता तुम्ही? खेळण्यातली ताकद अशी भांडणात कुणी वाया घालवतं का? द्या बरं हा फुकटचा वाद सोडून."

बाबांनी आजूबाजूला पाहिलं आणि एका कोपऱ्यात पडलेली लांबलचक रश्शी बाळूला आणायला सांगितली. बाबांनी त्या रश्शीच्या दोन्ही बाजूंना दोन्ही गटांना पकडायला व आपापल्या दिशेने ओढायला सांगितले. दोन्ही गट जीव काढून रश्शी ओढत असल्यामुळे ती मधूनच तुटली. बाबा म्हणाले, "पाहिलंत मुलांनो, आपापसात भांडत बसलो तर काहीच हाती लागत नाही, तुटून जातं... या रश्शीसारखं. इंग्रजांनीसुद्धा 'फोडा आणि राज्य करा' करून दीडशे वर्षे आपल्यावर राज्य केले. त्यापेक्षा सगळेजण एकत्र का नाही खेळत?" बाबांचं म्हणणं सगळ्या मुलांना पटलं आणि सगळे एकत्र खेळायला तयार झाले.

या गोष्टीला आठ-दहा दिवस झाले असतील. त्यानंतर एक दिवस बाळू मैदानावरून थेट घरी आला तो चिडूनच. मैदानावर जाऊन खेळ न खेळता बाळूला घरात आलेलं पाहिल्यावर बाबांनी विचारले, "काय रे, काय झालं?"

बाळू म्हणाला, "अहो बाबा, कसं खेळणार आम्ही त्या मैदानावर? सगळं मैदान रहिवाशांनी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, चिप्सचे रॅपर, खाऊचे कागद टाकून गलिच्छ केलंय. म्हणून आम्ही मित्रमंडळींनी ठरवलंय, हे मैदान आपणच स्वच्छ करायचं. मी झाडू, खराटे, टोपली घेऊन मैदानावर जातोय."

"अरे खुश्शाल जा. रोगराई टाळायची असेल तर स्वच्छता राखलीच पाहिजे," बाबांनी दुजोरा दिला.

बाळू व मित्रांनी मैदान स्वच्छ करायचा विडा उचलला. त्यांचं काम पाहून एक गृहस्थ म्हणाला, "अरे कशाला हा नसता उद्योग करता? मुनिसिपालिटीवाले येतील, तुम्ही आपले खेळा आणि घरी पळा." पण मुलांनी त्या गृहस्थाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही.

घरी आल्यावर बाळूने घडलेला किस्सा सांगितला. बाबा आनंदाने म्हणाले, "हाती घेतलेली मोहीम फत्ते झाली पाहिजे बाळू! अरे, त्या गृहस्थानी विचार केला नाही की चिमुकल्या हातांतही खूप मोठी ताकद असते. मंगेश पाडगावकरांची कविता आहे ना— गवताचं पातं, वाऱ्यावर डोलतं... ही नाजूक पाती जब हातात हात घालून एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यापासून मजबूत दोरखंड वळता येतो आणि याच दोरखंडाने उन्मत्त हत्तीलाही बांधता येते. एकजुटीच्या सामर्थ्याचं दर्शन खूप मनोहर असतं. ही मैदान स्वच्छताच काय पण दुसरी एखादी मोठी गोष्टसुद्धा तुम्ही सगळे मिळून खूप छान करू शकता."

बाळू म्हणाला, "बाबा नक्कीच. म्हणतात ना, मित्र असतील सोबतीस तर नाही कसली खंत. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ."

साहित्य अकादमी बालसाहित्य

पुरस्कारप्राप्त लेखक

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान

Mumbai : सहा धरणांच्या सुरक्षेचे ऑडिट; तज्ज्ञ समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार, पालिका ४५ लाख ९० हजार रुपये खर्च करणार

Mumbai : पालिकेचा 'हॅलो ए वॉर्ड' उपक्रम; व्हॉट्सअ‍ॅपवर एआय-संचलित तक्रार निवारण सेवा सुरू

'वारी'वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान