कथा
संजय सागडे
एका हुशार शेतकऱ्याने चोरांना पळवून लावण्यासाठी एक कल्पना राबवली त्याबद्दलची ही एक भन्नाट विनोदी कथा!
दादा आज सुद्धा कलिंगड चोरीला गेली, काल मी मोजून आलो होतो, आज पाहतो तो सारी गायब..’ तुका तात्याचा बाळू तावातावाने तुका तात्याला सांगत होता. गेल्या काही दिवसांपासून तुका तात्याच्या कलिंगड मळ्यात कोणीतरी रात्रीच्या वेळी डल्ला मारत होते. रात्रीचा दिवस करून, डोळ्यांत तेल घालून तात्या राखण करत होते, मात्र चोर अतिचलाख होता. आता या कलिंगडांची राखण कशी करावी या विवंचनेत तात्याची झोप उडाली होती.
अलीकडे गावात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते, कोणाची घराबाहेर ठेवलेली घमेली जाऊ लागली. कोणाच्या दारातली गुरांची वैरण जाऊ लागली. कोणाचे सरपण, तर कोणाच्या मंदिराबाहेरच्या नव्या चपलांना पाय फुटू लागले. अशा प्रकारांनी लोक वैतागून गेले होते.
अतिशय मेहनतीने तुका तात्याने शेती फुलवली होती. फळं मोठी होऊ लागली आणि हा प्रकार सुरू झाला. गावात असणाऱ्या वाघोबादेवाला सुद्धा साकडं घालून झालं. पूर्वी कधी काळी लुटारूंच्या टोळीवर जंगलातील वाघांनी हल्ला करून गावावरचं संकट परतून लावलं होतं. देव आपल्यासाठी वाघरूपात आला, अशी त्यावेळच्या लोकांची श्रद्धा होती. याच धारणेतून गावात वाघोबाचं मंदिर बांधलं होतं. वाघोबा गावचं ग्रामदैवत होता. तुका तात्या मनाशी म्हणायचे की, देवा वाघोबा पूर्वी लुटारूंना पळवून लावलं. मग आता तुझ्या हद्दीत चोरी होतेच कशी? मी नियमित तुझ्या दर्शनाला येतो. निवद नारळ तुला देतो. मग माझ्यावर अशी अवकृपा का बरं?
तुका तात्याच्या शेतात होणाऱ्या चोरीच्या आणि गावातील भुरट्या चोऱ्यांच्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी गावबैठक बोलावण्यात आली होती. जो तो आपले विचार मांडत होता. मात्र या बैठकीत काहीच ठोस उपाय निघाला नाही.
आता गावकरी काही करू शकत नाहीत, हे पाहून तुका तात्याने वाघोबा देवालाच साकडं घातलं. ‘देवा तूच आता कहीतरी मार्ग काढ, अशी विनवणी केली. तात्याचा मुलगा बाळू म्हणाला, काटेरी कुंपण घालू, मग बघू कसा चोर येतोय. अरे पण हे वाटतं तितकं सोपं नाही. त्याचा खर्च कलिंगडापेक्षा जास्त येईल, याआधी असं कधी घडलं नव्हतं म्हणून कुंपण करण्याची वेळ आली नव्हती.
त्या दिवशी मंदिरात भजन सुरू होतं, भजन रंगल्यामुळे रात्रीचे बरा वाजून गेल्याचं मंडळींच्या लक्षातही आलं नाही आणि अचानक गावातील दोन तरुण, एक सदा मुसळे आणि दुसरा नाना टेलर घाम पुसतच धावत मंदिरात आले. त्यांची भीतीने बोबडी वळली होती. अंग थरथरत होतं.
‘वाघ...वाघ..’ नाना टेलर बरळू लागला.
‘लय मोठा..दांडगा पिवळ्याधमक रंगाचा, काळे पट्टे हायती अंगावर..’ लटपटत सदा म्हणाला.
मंडळींनी भजन थांबवलं.
‘काय म्हणताय रे पोरांनो?’ विठ्ठल आबा म्हणाले.
‘वाघ पाहिला आम्ही, तुका तात्याच्या कलिंगडांच्या शेतात’ नाना टेलर म्हणाला.
‘तुका तात्याच्या शेतात?’
तसे दोघं चाचपडू लागले, ततपप करू लागले. ‘नाही, आम्ही जत्रला गेलो होतो. येताना उशीर झाला. त्यावेळी तुका तात्याच्या शेताजवळून येत असताना आम्ही पाटावरून उडी मारून वाघ पळालेला पाहिला’. सदाने कशीतरी बाजू सावरली. वाव-दीड वाव जनवार हाय,’ नाना म्हणाला.
आणि दुसऱ्या दिवशी रामप्रहरी साऱ्या गावात, शिवारात वाघ आल्याची बातमी पसरली. शेतात जाणारी मंडळी घाबरून घरीच थांबली. तशी आता फारशी कामं न्हवती म्हणा.. वडाच्या झाडाखाली तातडीची ग्रामसभा बोलावण्यात आली. अनंता पैलवान, दौलुनाना सुभेदार, कारभारी बापुपाटील, सारं गाव गोळा झालं. आता वाघाचा बंदोबस्त कसा करावा यावर विचारमंथन सुरू झालं.
दौलुनाना तुमच्याकडे दोन नळ्याची बंदूक आहे ती घ्या आणि चला की त्या वाघाच्या मागावर, अति उत्साही बाळकोबा म्हणाला.
‘मी येतो बंदूक घेऊन.. आणि वाघ शिरू द्या मागच्या दारानी आमच्या घरात.’
‘वन खात्याला फोन करा. ते लावतील पिंजरा’. अनंता पैलवान म्हणाला.
पिंजऱ्यात आमिष म्हणून शेळी ठेवावी लागते. ती वर्गणी करून आणावी लागेल. बापुपाटील म्हणाले.
‘अरेरे! शेळी विनाकारण बळी जाणार.’ कोणीतरी चुकचुकले.
‘असे केले तर आपण पिंजऱ्यात शेळीऐवजी केळी ठेवली तर?’ भजन करणारे विठ्ठल आबा म्हणाले.
‘आबा, उपवासाला केळी खायला तो वाघोबा काय तुमच्यासारखा माळकरी हाय का?’ तो आमच्यासारखा हड्डी फोडणारा आहे. अनंता पैलवान म्हणाला.
‘मग होऊ द्या की दोन हात वाघाबरोबर, चांगला उचलून आपटा आन करा की चीतपट.’ बापू म्हणाले.
गावचं दैवत वाघोबा आहे, गावात चोऱ्या वाढू लागल्यामुळे तो आपल्या मूळ रूपात आलाय, तुका तात्या त्याचा निस्सीम भक्त आहे. भक्ताची कलिंगड भररात्री चोरीला जात्यात म्हणल्यावर, तो देव तरी कुठवर देवळात बसून निवद खात राहणार. बाळू टेलरने वाघ गावात येण्याचा कार्यकारणभाव उलगडण्याचा प्रयत्न केला.
वाघ येण्यामुळे कलिंगडाच्या चोऱ्या होईनात. उगाचच कोणी कोणाच्या बांधावरून पाला मोडत जाईना. घरातील, घराबाहेरील, शेतातील, वस्तू आहे तिथेच पडून राहू लागल्या. त्यांना कोणी हात लावेना. गावातील चोऱ्या बंद झाल्या.
तुका तात्याचा कलिंगडाचा हंगाम संपला, शेवटचा तोडा केला. शेलक्या पाच पाच कलिंगडाच्या दोन गोण्या भरल्या, एक गोणी सदा मुसळेच्या व दुसरी नाना टेलरच्या घरी रवाना झाली. यांनीच पहिल्यांदा वाघ पाहिला होता.
खरं घडलं होतं असं. तुका तात्याने या दोघांच्या मदतीने गावात वाघ आल्याची अफवा पसरवली होती. त्यामुळे चोऱ्या बंद झाल्या होत्या. कलिंगडाचेही चांगले पैसे आले होते.
एक कलिंगड आणि दोन पोळ्याचा नैवेद्य वाघोबा देवा समोर ठेवून, आपल्याला ही कल्पना सुचवल्याबद्दल डोळे मिटून तुका तात्याने वाघोबा देवाचे आभार मानले. तो मूर्तीमधला वाघोबा मात्र त्या कलिंगड आणि पोळीच्या नैवेद्याकडे पाहत मिशीतल्या मिशीत, मिश्किलपणे हसत होता.
sanjaysagade72@gamial.com