मनाचे अभंग
रूपेश पाटकर
बोलता बोलता बोलणे का बिनसते? ‘अरे’ ला ‘कारे’ का केले जाते? खेळीमेळीत व्हायला हवा, असा संवाद मध्येच उद्रेकाकडे वळत असेल तर त्यामागे एकच कारण असते, क्रॉस कनेक्शन. कसे होते क्रॉस कनेक्शन हे नीट समजून घेतले तर सुसंवादाचा विसंवाद होणार नाही.
यांना राग खूप येतो,” अशी तक्रार करत श्रीमती नाईक श्रीयुत नाईक यांना घेऊन आमच्या ओपीडीत आल्या.
गंमत म्हणजे ते दोघे मुद्दाम आमच्या ओपीडीत आले नव्हते. ते आले होते ऑर्थोपेडिक ओपीडीत, मिस्टर नाईकांच्या आईच्या कंबरदुखीसाठी. तिथे त्यांचा नंबर यायला अजून वेळ होता आणि ऑर्थो ओपीडीच्या बाजूलाच आमची सायकियॅट्रीची ओपीडी होती आणि आमच्या ओपीडीत फारसे पेशंट त्यादिवशी नव्हते. म्हणून मिसेस नाईक त्यांना सहज घेऊन आल्या होत्या.
“मी उगाच नाही चिडत,” श्रीयुत नाईक म्हणाले.
“कालचीच गोष्ट. क्षुल्लक निमित्त झालं आणि काल दिवसभर हे उपाशी राहिले,” श्रीमती नाईक म्हणाल्या. ती दोघं बोलत असतानाच नाईकांच्या आई म्हणाल्या, “याचा स्वभाव थोडा तापटच आहे, त्याच्या वडिलांसारखा!” “डॉक्टर, मी कारणाशिवाय चिडत नाही. मी कधी उगीचच चिडलो आहे का, ते विचारा त्यांना,” श्रीयुत नाईक म्हणाले.
“राग येण्याच्या किंवा चिडण्याच्या अनेक कारणांपैकी ‘अयोग्य संवाद’ हे एक महत्त्वाचे कारण आहे. संवादात थोडे सावध राहून विसंवाद टाळता येऊ शकेल. दोन माणसांमध्ये वितुष्ट येण्याचे कारण काय याचा विचार करा. संवाद छेदक असेल तर विसंवाद होईल आणि पूरक असेल तर सुसंवाद राहील,” मी म्हणालो.
पण माझ्या छेदक आणि पूरक या शब्दांचा नेमका अर्थ काय हे त्यांच्या लक्षात आले नाही. ते त्यांना समजावून देण्यासाठी आणखी थोड्या स्पष्टीकरणाची गरज होती. मुळात, मी जेव्हा माझ्या पोस्टग्रॅज्युएशनच्या काळात पहिल्यांदाच ‘स्ट्रक्चरल ॲनॅलिसिस’ हे शब्द वाचले तेव्हा मला देखील ते समजले नव्हते. माझा सीनियर म्हणाला, “त्यात काही कठीण नाही. आपल्यात एक बालक असतो.”
आणि त्याने पुढ्यातल्या कागदावर एक लहान वर्तुळ काढले आणि त्याच्या आत बालक (Child) असे लिहिले. त्या वर्तुळाला लागूनच त्याच्या डोक्यावर आणखी एक वर्तुळ काढले आणि म्हणाला, “आपल्यात एक विचारी चालक देखील असतो.”
आणि त्याने त्या वरच्या वर्तुळाच्या आत लिहिले चालक (Adult). त्यानंतर त्याने त्या चालक वर्तुळाच्या डोक्यावर त्या चालक वर्तुळाला लागूनच आणखी एक वर्तुळ काढले आणि म्हणाला, “आपल्यात एक पालक देखील असतो.” त्याने त्या सर्वात वरच्या वर्तुळाच्या आत लिहिले, पालक (Parent) आणि त्या एकावर एक घागरी ठेवल्याप्रमाणे दिसणाऱ्या तीन वर्तुळांकडे पाहत तो म्हणाला, “हे तुझ्या स्वभावाचे स्ट्रक्चर! असेच स्ट्रक्चर प्रत्येक माणसात असते.”
त्याने त्या वर्तुळांच्या बाजूला थोडे अंतर ठेवून तशीच तीन वर्तुळे काढली आणि म्हणाला, “हे माझ्या स्वभावाचे स्ट्रक्चर. मी तुला एक प्रश्न विचारतो- किती वाजले?” आणि हा प्रश्न विचारात असताना त्याने कागदावरील त्याच्या चालकाच्या वर्तुळापासून माझ्या चालकाच्या वर्तुळापर्यंत एक बाण काढला.
मी घड्याळात बघितले आणि म्हणालो, “साडेसहा वाजलेत!”
माझ्या या उत्तरावर त्याने कागदावरील माझ्या चालकाच्या वर्तुळापासून त्याच्या चालकाच्या वर्तुळापर्यत दुसरा बाण काढला आणि म्हणाला, “आपला संवाद एकमेकाला पूरक झाला, म्हणून हे बाण समांतर गेले. पण समजा तू माझ्या किती वाजले? या प्रश्नावर म्हणाला असतास की, ‘भिंतीवर घड्याळ आहे. दिसत नाही का तुला?’ तर त्याचा अर्थ तुझ्यातील खाष्ट पालकाने माझ्यातील बालकाला प्रश्न विचारला आहे, असा झाला असता,” असे म्हणून त्याने कागदावरील माझ्या पालक वर्तुळापासून त्याच्या बालक वर्तुळापर्यंत बाण काढला. हा बाण त्याच्याकडून आलेल्या बाणाला छेदत होता. ते दाखवत तो म्हणाला, “आपला संवाद आता विसंवाद होईल!”
घरात किंवा ऑफिसात घडणाऱ्या छोट्यामोठ्या विसंवादाचे कारण अशा बाणांनी एकमेकांना समांतर न जाता एकमेकांना छेदणे हे असते.
हेच सर्व मी श्रीयुत आणि श्रीमती नाईकांना समजावून सांगितले.
श्रीयुत नाईक म्हणाले, “काल असेच झाले. मी कामावर निघण्याच्या घाईत होतो. मला माझा मोबाईल सापडत नव्हता. मी हिला म्हटले, ‘अगं, माझा मोबाईल कुठे?’ तर ही म्हणाली, ‘आता मोबाईल देखील हरवलात. एक गोष्ट जाग्यावर ठेवाल तर शप्पथ!’ म्हणजे माझ्यातल्या चालकाने हिच्यातल्या चालकाला प्रश्न केला. पण हिच्या चालकाने उत्तर न देता हिच्यातल्या पालकाने माझ्यातल्या बालकाला उत्तर दिले. क्रॉस कनेक्शन!”
“श्रीमती नाईक यांच्या चालकाने उत्तर दिले असते तर ते काय असते?” मी श्रीमान नाईक यांना विचारले.
“मी मिसकॉल देते म्हणजे कळेल कुठे आहे तो, असे उत्तर तिच्या चालकाकडून येऊ शकले असते!” श्रीयुत नाईक म्हणाले.
“अहो, पण मी कणीक मळत होते. गॅसवर दूध ठेवले होते. ते टाकून मी कशी जाणार?” श्रीमती नाईक म्हणाल्या.
“मग तुम्हीच सांगा, अशा परिस्थितीत तुमचा चालक काय उत्तर देईल?” मी विचारले.
“माझा चालक मी कशी कामात अडकले आहे ते सांगेल आणि त्यांचा मोबाईल कुठे असू शकतो त्याच्या जागा सुचवेल,” श्रीमती नाईक म्हणाल्या.
मी दोघांकडे पाहून गालातल्या गालात हसलो.
“पण टाळी काही एका हाताने वाजत नाही. हे परवा म्हणाले, ‘अगं, माझा रुमाल कुठे लपवून ठेवलास तो सांग.’ मी काय यांचे रुमाल लपवून ठेवते काय?” श्रीमती नाईक म्हणाल्या.
“माझा रुमाल कुठे लपवून ठेवलास? हा प्रश्न तुमच्यातल्या कोणी त्यांच्यातल्या कोणाला उद्देशून विचारला?” मी श्रीयुत नाईक यांना विचारले.
“माझ्यातल्या चालकाने तिच्यातल्या चालकाला,” श्रीयुत नाईक म्हणाले.
“वरवर हे असे वाटते खरे. पण ‘लपवून ठेवलेस’ हे शब्द तुमच्यातल्या पालकाने त्यांच्यातल्या बालकाला म्हटले आहेत,” मी म्हणालो.
“हो. मी खोचक बोललो,” नाईक म्हणाले. नाईक यांना त्यांच्या शब्दातील त्रुटी लक्षात आली आणि त्यांनी ती प्रांजळपणे व्यक्त केली. त्यांच्या अशा प्रांजळपणे व्यक्त होण्याचा परिणाम श्रीमती नाईकांवर झाला.
“डॉक्टर, माझ्याकडून देखील असे खोचक बोलले जाते कधी कधी. आता मी माझ्या बोलण्यावर लक्ष ठेवेन,” श्रीमती नाईक म्हणाल्या.
“एकदा क्रॉस कनेक्शन झाले की पुढच्या बोलण्यात मूळ विषय बाजूला पडतो आणि नको ती उणीदुणी निघतात. ती रागाच्या भरात असतात. त्यात कोण बरोबर आणि कोण चूक हे ठरवत बसण्यात काहीच उपयोग नसतो. यावर तिरकस बोलणे टाळणे हाच उपाय,” नाईक समाधान व्यक्त करत हसले.
ते तिघे ओपीडीतून बाहेर निघत असताना नाईकांच्या आई मागे वळल्या आणि म्हणाल्या, “हे आम्हालाही आमच्या तरुणपणी कळले असते तर किती बरे झाले असते!”
मनोचिकित्सक व लेखक