आदिमांचे जग। समजेना कुणा। 
अक्षररंग

आदिमांचे जग। समजेना कुणा।

दंडकारण्यातील आदिवासींच्या वेदना, संघर्ष आणि लोकशाहीच्या मुकी वास्तवाची ज्वलंत मांडणी करणाऱ्या अविनाश पोईनकर यांच्या 'दंडकारुण्य' या कवितासंग्रहाचा संवेदनशील वेध घेणारा हा लेख.

नवशक्ती Web Desk

महेश्वरी

डॉ. महेश केळुसकर

दंडकारण्यातील आदिवासींच्या वेदना, संघर्ष आणि लोकशाहीच्या मुकी वास्तवाची ज्वलंत मांडणी करणाऱ्या अविनाश पोईनकर यांच्या 'दंडकारुण्य' या कवितासंग्रहाचा संवेदनशील वेध घेणारा हा लेख.

धाक बंदुकीचा। दंडकारण्यात।

कोणत्या युद्धात। कोण आहे।

कधीही कुणाला। बोलू नये काही।

मुकी लोकशाही। चिरडते।

आदिमांचे जग। समजेना कुणा।

अन्यायाने माना। चिरडल्या।

चंद्रपूरच्या जंगलात आदिवासीबहुल नक्षलप्रभावित जिल्ह्यात काम करणाऱ्या ३५ वर्षांच्या तरुणाच्या अभंगातल्या या निवडक ओळी आहेत. अविनाश पोईनकर त्याचं नाव. 'दंडकारुण्य' या त्याच्या नव्या काव्य संग्राहस्तला त्याचा हा अभंग वाचून मला कितीतरी वर्षांपूर्वी संत चोखामेळा यांनी विठ्ठलाला विचारलेला आर्त प्रश्न पुनार आठवला-

घाव घाली विठू आता।

चालू नको मंद।

बडवे मज मारिती ऐसा।

काही तरी अपराध ?

बडवे म्हणजे देव आणि भक्त यांच्यामधले तत्कालीन दलाल, देवावर सत्ता त्यांची आणि चोखामेळा तर बहिष्कृत जातीतला. त्यानं पंढरीच्या दारात सुद्धा वायचं नाही. देवळाच्या आत पाऊल टाकणं तर दूरच राहिलं. त्या बडव्यांना कळेना की विठ्ठलाच्या गळ्यातला हार चोखोबाच्या गळ्यात कसा आला आणि त्यांनी त्याला वडवायला सुरुवात केली. बडवून बडवून चोखोबाचं अंग इतके सुजलं, वेदना ठणकायला लागल्या की विठ्ठलाने आता वायला थोडा जरी उशीर केला तरी त्याचा प्राण जाईल म्हणून तो म्हणतो,

विठोबा आता हळूहळू मंद चालू नकोस धाव मार आणि माझं रक्षण कर

लोकशाहीत असलेल्या सत्तेच्या ठेकेदारांना अविनाश पोईनकर सुद्धा 'दंडकारुण्य' या आपल्या कवितासंग्रहामधून तेच सांगताहेत की, तुम्ही आमच्याकडे नुसतं शाब्दिक लक्ष देऊ नका- भाषणबाजी खूप झाली-आता प्रत्यक्ष कृती करा आणि जल, जंगल, जमीन संघर्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आदिवासींना बंदुकीचा धाक दाखवणं सोडा, विकासाच्या निर्णयप्रक्रियेत आदिवासींचाही सहभाग असायला पाहिजे. तेवकाच खऱ्या अर्थान सहकार्यावर आधारित संस्कृती जपता देईल. तुमच्या लोकशाहीत समता, ममता, प्रेम, विश्वास नसेल तर तिला काही अर्थ नाही. शोषण, दमन, वर्चस्व, विषमता आणि सामाजिक भेदभाव करणारी क्रूर, जुनाट व्यवस्था आणि आदिवासींना जबरदस्तीने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेचे डावपेच वापरणारे हुशार नवे बडवे, आदिवासींचं जीवन उद्ध्वस्त करत आहेत.

अविनाश पोईनकर कवी-लेखक-मुक्त पत्रकार आणि आदिवासी ग्रामीण विकास क्षेत्रात कार्य करणारे युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. जागृती या सामाजिक संस्थेची स्थापना अविनाशने केली आहे. त्याद्वारे महाराष्ट्रातील आदिम कोलाम व माडिया समुदायासोबत त्यांचे हक्क, अधिकार, कायदे आणि धोरणांची अंमलबजावणी करण्यात तसंच संविधानिक मूल्यांची जाणीव जागृतीसह रुजवणूक व्हावी या हेतूनं संशोधक कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या 'मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलो' अंतर्गत ग्राम परिवर्तक म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील घाटकोळ हे गाव राज्यात आदर्श आणि स्मार्ट गाव म्हणून प्रत्यक्ष कार्य कर्तृत्ववानं पोईनकर यांनी पुढे आणलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित युरोपीय देशातील इनलैक्स शिवदासांनी सामाजिक फेलोशिप, साधना साप्ताहिक संयोजित तांबे रायमाने अभ्यासवृत्ती, या पुणे विद्यापीठ अभ्यासवृत्ती, नॅशनल फाऊंडेशन फॉर इंडियाची पत्रकारिता फेलोशिप, कोरो इंडियाची समता फेलोशिप इत्यादी फेलोशिपचे ते मानकरी आहेत. 'उजेड मागणारी आसवे' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झालेला आहे. 'सुरजागड : विकास की विस्थापन ?' हे सामाजिक संशोधनपर पुस्तक तसंच 'विमल गाडेकर : व्यक्ती आणि वांग्मय' या ग्रंथाचं संपादन पोईनकर यांनी केलेलं आहे.

ज्या दंडकारण्य प्रदेशातील आदिवासींच्या संबंधी या कविता आहेत तो प्रदेश नेमका कुठे आहे ? याबाबत बऱ्याच जणांना माहिती नाही. नक्षलवाद्यांचा खात्मा केला किंवा अमुकतमुक नक्षलवादी शरण आला, अशा बातम्या अधूनमधून वाचण्यापुरताच आपला या प्रदेशाशी संबंध. त्यामुळे मराठी साहित्याच्या परिप्रेक्ष्यातून गडचिरोली, चंद्रपूर हे प्रदेश अजूनही वेशीबाहेरच आहेत, हे वास्तव आहे.

मध्य भारतातील दक्षिण भागात दंडकारण्य भूभाग अस्तित्वात आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओदिशा राज्यातील सीमावर्ती भागातील घनदाट अरण्यास 'दंडकारण्य' असं म्हणतात. रामायण काळात या क्षेत्रात दंडक नावाच्या राक्षसाचा वावर होता. याच राक्षसाच्या नावावरून या अरण्यास दंडकारण्य असं म्हटलं गेल्याची आख्यायिका आहे. या भागात उच्च प्रतीचं खनिज आणि नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. भारतातलं सर्वाधिक जंगल याच भागात असून या दंडकारण्याचं क्षेत्रफळ सुमारे ९२ हजार वर्ग किलोमीटर विस्तारलेलं आहे, म्हणजे केरळ राज्यापेक्षा हा प्रदेश विस्ताराने मोठा आहे. भारतातलं अॅमेझॉन जंगल म्हणजे दंडकारण्य असं म्हणायला हरकत नाही. या भागात जल, जंगल आणि जमिनीवर उपजीविका करणाऱ्या शेकडो वनजाती अधिवास करतात. आदिम माडिया-मुरिया जनजाती शेकडो वर्षांपासून प्रगत समाजापासून कोसो मैल दूर राहून जंगल आधारित जगत आहेत. या समुदायाच्या स्वतंत्र भाषा, संस्कृती, पारंपरिक धारणा आहेत. जे जंगल सोडून इतरत्र ठिकाणी राहू, जगू शकत नाहीत. मात्र चालू काळात या समृद्ध भूमीला खनिजांसाठी उद्ध्वस्त करण्याचं काम भांडवलदारी व्यवस्था करत आहे. इथल्या आदिम आदिवासी समुदायांना वनाधिकार, जैवविविधता, पेसा यांसारख्या कायद्यांनी बळ दिलं असलं, तरी जल-जंगल-जमिनीचं जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्याचे अधिकार दिलेले असले तरीही या कायद्यांची अंमलबजावणी करण्यात यंत्रणा कमी पडत असल्याचं आढळलं आहे, असं पोईनकरांचं म्हणणं आहे. फक्त कविता लिहून हा कवी थांबलेला नाही. तो त्या भागात आज कितीतरी वर्ष प्रत्यक्ष काम करतो आहे आणि आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आदिवासींच्या शोषणाविरुद्ध लढाई देतो आहे. "जेव्हा जेव्हा समाजावर काळोखाच्या सावल्या पडू लागतात तेव्हा त्याला वेळीच जागवण्याचं, आरसा दाखवण्याचं काम नीडरपणे साहित्यिकांनी करायला हवं. खरं तर ही त्यांची नैतिक जबाबदारीच असते", असं पोईनकरांचं म्हणणं आहे.

ज्येष्ठ कवी आणि लेखक

maheshkeluskar@gmail.com

Pune : प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला? दरीत ढकलून अपघाताचा बनाव; तपासात समोर आले धक्कादायक खुलासे

केंद्राच्या तात्पुरत्या बंदीनंतर प्ले स्टोअरवर Telegram पुन्हा सुरू; पण ॲप स्टोअरवरून अजूनही गायब

Delhi Crime : फुटपाथवर झोपलेल्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण; लैंगिक अत्याचारानंतर हत्या, कॅब चालक जेरबंद!

Mumbai : ‘ओसी’ नसलेल्या इमारतींना दिलासा; ८०० चौरस फुटांपर्यंत सदनिका असलेल्या इमारतींना मिळणार OC, राज्य सरकारची मंजुरी

Lucknow Fire : लग्नाचं स्वप्न झालं भस्मसात! जिथे प्रेम फुललं, तिथेच जोडप्याचा अंत, लखनऊ अग्निकांडमधील मन सुन्न करणारी घटना