सिनेरंग
पूजा सामंत
एखादा कलाकार कसा असतो, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, हे सारं त्याच्या सहकलाकारांकडून अधिक कळतं. पण हा कलाकार जेव्हा धर्मेंद्र असतो, तेव्हा त्याच्या नायिकांना तो कसा वाटतो, त्यांच्यातील बंध कसे होते, हे समजून घेणं म्हणजे त्या कलाकाराचं वेगळं दर्शन असतं. शर्मिला टागोर, वहिदा रेहमान, आशा पारेख, सायरा बानू यांच्या बोलण्यातून त्यांच्या लाडक्या धरमजींच्या आठवणी कालच घडलेल्या प्रसंगासारख्या उलगडल्या आहेत. या आठवणी हेच धरमजींना केलेलं अभिवादन आहे.
ही वॉज मच मोअर... - शर्मिला टागोर
धरमजी आणि माझ्यात एक मोठा योगायोग आहे. आमच्या दोघांचा जन्मदिवस एकाच दिवशी असतो. ८ डिसेंबर. येत्या ८ डिसेंबरला काहीच दिवस उरले होते. किमान धरमजींचा नव्वदावा वाढदिवस त्यांच्या हयातीत साजरा व्हायला हवा होता! एक हसतमुख, विनम्र सहकलाकार म्हणजे धर्मेंद्र. आम्ही एकत्र केलेले सगळेच चित्रपट गाजलेत. १९६६ मध्ये आलेला ‘देवर’ हा आमचा पहिला चित्रपट. जो शूट प्रथम झाला, पण ‘अनुपमा’ आधी रिलीज झाला. मग ‘मेरे हमदम, मेरे दोस्त’, ‘सत्यकाम’ असे चित्रपट येत राहिले.
१९७१ मध्ये रिलीज झालेला ‘बदनाम फरिश्ते’ हा चित्रपट तर धरमजी यांनी पाहुणा कलाकार म्हणून केला आणि त्याचे मानधनही घेतले नाही. या सिनेमात मी आणि राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होतो. आमच्या वकिलाच्या भूमिका होत्या. ‘एक महल हो सपनों का’ हा आमचा एक इमोशनल चित्रपट होता, ज्यात आमच्या जोडीसोबत लीना चंदावरकर देखील होती. १९७५ च्या सुमारास आलेला हृषिदांचा ‘चुपके चुपके’ हा माझा आवडता चित्रपट. अतिशय साधा-घरगुती आणि कौटुंबिक वाटावा असा हा चित्रपट आणि त्यात परिमल त्रिपाठी नामक युवकाची भूमिका करणारा धर्मेंद्र. ही कसलंही वेगळं वैशिष्ट्य नसलेली भूमिका धर्मेंद्रने अतिशय प्रभावीपणे साकारली. या भूमिकेशी तो मनापासून रिलेट झाला आणि नरम, खुसखुशीत अशी ही भूमिका त्याने मस्तपैकी रंगवली. मला याचं देखील आज वाईट वाटतं. धर्मेंद्रकडे विनोदी बाजाच्या, साध्या-सरळमार्गी माणसाच्या भूमिका करण्याचं जे कसब होतं, ते फार ठळकपणे उठून दिसलं नाही. ही वॉज मच मोअर दॅन जस्ट ॲन ॲक्शन हिरो.
शूटिंगच्या वेळी अनेक निमंत्रित तिथे येत असतात. कधी निर्मात्याचे पाहुणे, कधी आणखी कुणाचे. त्या प्रत्येक ‘आम’ आणि ‘खास’ गेस्टना धर्मेंद्रजी अगदी प्रेमाने भेटत असत. कधी त्यांच्या चेहऱ्यावर उदासी, कंटाळा किंवा त्रासिक भाव दिसले नाहीत. बहुतेक स्टार्सना चाहत्यांना भेटणे त्रासिक वाटते. पण धरमजी मात्र वेगळीच वल्ली होती. इतक्या प्रेमाने आणि विनम्रतेने ते सगळ्यांशी बोलत असत की वाटावं त्यांच्या स्वत:च्या गावातीलच पाहुणे आहेत.
‘मेरे हमदम मेरे दोस्त’ या सिनेमाचं शूटिंग लांबलं होतं. ‘छलकाए जाम, आपके नाम’ या गीताचं शूटिंग करायचं बाकी होतं. धर्मेंद्र यांचं चित्रण होऊन गेलं होतं. पण मध्ये काही शॉट्स हवे होते, मला हे गीत रात्रभर थांबून पूर्ण करायचं होतं. पहाटे सहापर्यंत शूटिंग सुरू होतं. खरं तर, धर्मेंद्र यांचं काम झालेलं होतं. पण तरीही ते माझ्यासोबत पूर्ण रात्रभर थांबले. सहकार्य करण्यात धरमजींचा हात कोणी धरू शकणार नाही. त्यावेळी सलग १८ तास धरमजी झोपले नव्हते. नंतर लाईटिंग होत असताना सेटवर खुर्चीतच ते झोप काढत होते. हे चित्रण कारदार स्टुडिओ (लोअर परेल) इथे चालू होतं. आज हा स्टुडिओ अस्तित्वात नाही आणि आमचे प्रिय सहकलाकार धर्मेंद्र देखील नाहीत. आता त्या भागातून जाताना देखील धर्मेंद्र यांची आठवण मला व्यथित करून जाईल. खूप गोड माणूस होता..अगदी निरागस!
अलविदा दोस्त - आशा पारेख
धरमजींनी माझ्यासोबत ‘आये दिन बहार के’, ‘आया सावन झूम के’, ‘शिकार’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘समाधी’ असे जवळ जवळ सात-आठ चित्रपट केले आहेत. हे सगळेच चित्रपट हिट ठरले आणि आमची जोडी गाजली. या सर्व चित्रपटांतील गाण्यांनी यश मिळवले जे आजपर्यंत एफएम रेडिओवर गाजताहेत. तुम्हाला माहीत नसलेली एक गोष्ट सांगते. धरमजींना डान्स करणे आवडत नसे. डान्स करताना ते कम्फर्टेबल नसत. त्यामुळे अशा डान्सच्या सिच्युएशन्स टाळण्याकडे त्यांचा आणि त्यांच्या दिग्दर्शकाचा कल असे. कधी तरी गमतीने धरम मला म्हणत, “मुझे तुमसे डान्स सिखना चाहिये..” मी हसून म्हणत असे, “ट्युशन कब से शुरू करेंगे बताएं..” आणि आम्ही हसत असू.
बॉक्स ऑफिसवर काय चालतं आणि काय नाही चालत, याची त्यांना जबरदस्त जाण होती. चित्रपटामध्ये तब्बल ६५ वर्षं काम करूनही ह्या गुणी आणि अनुभवी अभिनेत्याने कधीही चित्रपट का दिग्दर्शित केले नाहीत, याचं मला आश्चर्य वाटतं. देव आनंद आणि शम्मी कपूर यांच्यासह मी ज्या ज्या नायकांसोबत काम केलं त्या सगळ्यांमध्ये धरम हा सर्वात देखणा नायक होता.
धर्मेंद्र यांच्याशी नंतरच्या काळात संपर्क न ठेवल्याबद्दल मला फार पश्चात्ताप होतोय. पण आता हळहळ व्यक्त करणं व्यर्थ आहे. चूक झालीये खरी. मैत्रीण हेमा (मालिनी) हिच्या संपर्कात मी होते, पण माझा फिल्म हिरो धर्मेंद्र आणि हेमाचा पती असे दुहेरी नाते होते आमचे, पण मी त्याच्याशी संपर्क ठेवला नाही, याचा मला कायम खेद वाटत राहील.
एक एक करून माझे सर्व सहकलाकार गेले. आता धरमजीही गेले. आज माझे हृदय सनी आणि बॉबी, ईशा आणि आहानाकडे धावत आहे. धरम सगळ्यांचा आधारस्तंभ होते. मी धरमजींसोबत हृषिदांचा ‘चुपके चुपके’ करणार होते, पण पुढे काय झाले ते मला माहीत नाही. ‘चुपके चुपके’ हा चित्रपट शर्मिलाला मिळाला. लेकीन जो भी फिल्मे हमने की उनके साथ बहुत मजा आया. त्यांच्या जीवनातील चढउतारांचा त्यांच्यावर परिणाम झालेला कधीही जाणवले नाही. एक स्वच्छ, निकोप मनाचा माणूस होते ते. त्यांची नेहमी आठवण येत राहील.
अलविदा, धर्मेंद्र!
दिलीपसाहबचा भक्त, माझा भाऊ गेला... - सायरा बानो
प्यारे भाई धर्मेंद्र यांचा विचार मी स्टार अभिनेता म्हणून कधी केला नाही. मेरे लिये वो हमेशा भाई की हैसियत से थे. मला धरमजी बहिणीची माया देत. धरमजी दिलीप साहेबांचे अतिशय प्रिय भक्त म्हणावेत, असे होते.
धर्मेंद्र दिलीपकुमार यांना आपला आदर्श मानत असत. शाळेत असल्यापासून ते दिलीप साहेबांचे चित्रपट वेड्यासारखे पाहत. त्याच नादात आपणही असाच अभिनय करायचा म्हणून तो आपलं नशीब अजमावून पाहण्यासाठी मुंबईत आला आणि यथावकाश बॉलिवूडमध्ये सुपर स्टार झाला. दिलीपकुमार यांना देखील धर्मेंद्रचा अल्पावधीतच लळा लागला.
दिलीपसाहब आणि धर्मेंद्र यांच्या स्नेहातील दुवा मी होते. दिलीपकुमार जेव्हा स्टार होते, त्या काळात धर्मेंद्र संघर्षशील होता. धर्मेंद्र लुधियानाहून पळून मुंबईत प्रथम आला ते दिलीपकुमार यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी. दिलीपकुमार म्हणजे हिंदी इंडस्ट्रीतील सर्वोत्तम स्टार. धर्मेंद्रचा अभिनयातला आदर्श. म्हणून पंजाबहून थेट मुंबईत धडकला तो निव्वळ दिलीपकुमार यांना पाहण्यासाठी. अनेकांना विचारत धर्मेंद्र आमच्या पाली हिलच्या बंगल्यात शिरला. कसं कोण जाणे, पण धर्मेंद्रला सुरक्षारक्षकाने देखील रोखलं नाही. धर्मेंद्रची नजर दिलीप कुमार यांच्यावर गेली तेव्हा ते सोफ्यावर आराम करत होते. “..आदाब अर्ज है दिलीप साहब”, असे शब्द एका अपरिचित युवकाकडून अचानक ऐकल्यावर दिलीप कुमार दचकले. त्यांनी सुरक्षारक्षकांना हाक मारली. धर्मेंद्र गडबडला आणि त्याने त्वरेने बंगल्याबाहेर धाव घेतली.
त्या घटनेनंतर सहा वर्षांनी धर्मेंद्र मुंबईत आला ते ‘फिल्मफेअर टॅलेंट कॉन्टेस्ट’मध्ये भाग घेण्यासाठी. आता मात्र धर्मेंद्रने दिलीपकुमार यांची बहीण फरिदाशी ओळख करून घेतली आणि तिच्यामार्फत तो दिलीपकुमारना पुन्हा भेटला. दिलीपसाहबनी धर्मेंद्रची अभिनयाविषयी असलेली आसक्ती, प्रेम, तळमळ..हे सारं शांतपणे ऐकून घेतलं आणि मोठ्या भावाप्रमाणे त्याला धीर दिला. धर्मेंद्र आणि दिलीपकुमार यांची ती भेट लांबली. धर्मेंद्रच्या अंगात तेव्हा एक पातळसा शर्ट होता, बंगल्यातून निघेपर्यंत त्याला रात्र झाली आणि थंडीचा कडाका वाढला, तेव्हा दिलीपसाहबनी स्वतःचे स्वेटर त्याच्या अंगावर चढवले आणि मग त्याला रवाना केले. त्या प्रेमाच्या भेटीने धर्मेंद्रची दिलीपसाहब यांच्यावरची श्रद्धा अधिकच वाढली. धरममधला भाबडेपणा, निष्पाप चेहरा मी पाहत होते.
धर्मेंद्र तेव्हापासून कधीही घरी येऊन दिलीपसाहबना भेटू लागला. त्यांना मोठ्या भावाप्रमाणे मानू लागला. मार्गदर्शन घेतानाच आपल्या व्यथा, अडचणी तो आपल्या या भावाला सांगू लागला. आपलं करिअर कसं मॅनेज करावं, पैसे कसे-कुठे गुंतवावेत हे त्याला कळत नसे. दिलीपसाहब त्याला यातले बारकावे सांगत असत. मात्र एक खरं. धर्मेंद्र त्याच्या अभिनयाबरोबरच त्याची मेहनत आणि संघर्ष याच्या जोरावर स्टार झाला. नंतर धर्मेंद्र त्याचा मुलगा अजय उर्फ सनी देओल याला ‘बेताब’ चित्रपटातून लाँच करणार होता. मध्यरात्री आमच्या बंगल्याचा दरवाजा कुणी वाजवला म्हणून आम्ही विचार करत होतो की कोण असेल, तर दारात भांबावलेला धर्मेंद्र होता. इतक्या रात्री धर्मेंद्र का बरं आला असावा? असा विचार आम्ही करेपर्यंत धर्मेंद्र थेट वर आला. बंगल्यातील जिने देखील तो लगबगीनेच चढला. धर्मेंद्रकडे सनीचे बरेच फोटो होते. ते दाखवत तो दिलीपसाहबना सांगू लागला, “..हा माझा मुलगा..सनी. याला मी ‘बेताब’ या फिल्ममधून लाँच करतोय. त्याची नायिका आहे अमृता सिंग..” अमृता ही दिलीपकुमार यांची बहीण बेगम पारा यांची पुतणी आहे. त्यामुळे दिलीपसाहबनी धर्मेंद्र आणि सनी देओल या दोघांना अधिकच प्रेम दिलं आणि त्यांना फिल्मसाठी सर्वतोपरी सहाय्य केलं.
जेव्हा धरम घरी येत असे तेव्हा त्याच्या आवडीची बिर्याणी घरी बनत असे. मनसोक्त बिर्याणी खाऊन झाल्यावर धरमसोबत त्याच्या घरीही बिर्याणी पाठवण्यात येई. धरम आणि दिलीपसाहब त्यांना वेळ असेल तेव्हा एखाद्या रविवारी टेबल टेनिस किंवा बॅडमिंटन खेळत असत. धरम आणि दिलीपकुमार यांच्यात खास आणि भावनिक नातं निर्माण झालं ते उर्दू भाषेच्या प्रेमामुळे. दिलीपसाहब यांचं उर्दूवरचं प्रेम तसं स्वाभाविक होतं, पण माझ्या भावाचंही (धर्मेंद्र) उर्दूवर प्रभुत्व होतं. त्यामुळेच धरम आला की काहीसा शेरोशायरीचा माहोल तयार होत असे आमच्या घरी. धरम अतिशय जिंदादिल होता. तो आजूबाजूला असला की तिथून उदासीचे ढग पळून जात असत.
या दोघांमधला स्नेहाचा धागा दिलीपसाहब हयात असेपर्यंत कायम होता. दिलीपसाहबना शिंक आली तरी धरम चिंतेत असे. असं नि:स्वार्थी प्रेम फार दुर्मिळ आहे या जगात, जे धरमकडून आम्हा उभयतांना नेहमीच लाभलं. दिलीपसाहब गेले तेव्हा मी एकटी पडले, त्यांच्या आठवणींवर जगत आले. आता भावासमान धरमही नाही या जगात. पण त्यांनी आम्हाला दिलेलं प्रेम मी असेपर्यंत कायम राहील..
त्याच्यासोबत मी अनेक चित्रपट केलेत. त्याच्यासोबत काम करणं मी एन्जॉय केलं, कारण तो माझ्या कुटुंबाचा हिस्सा होता.
निरागस, कोमल ही मॅन - वहिदा रहमान
ही सहकलाकार विशेषतः पुरुष सहकलाकार असे असतात की, त्यांना पडद्यावरचे आमचे म्हणजेच ‘नायिकांचे हिरो’ असं म्हटलं जातं. धर्मेंद्र असेच होते. धर्मेंद्र यांनी माझी जवळची मैत्रीण आशा (पारेख)सोबत बरेच चित्रपट केलेत. कधी तरी गप्पांच्या ओघात जर धरमचा विषय निघाला, तर आशा म्हणे - अगदी निरागस आहे तो. त्याच्यासोबत काम करणं आश्वासक वाटतं. काहीसा शर्मिला, संकोची-मितभाषी म्हणावा असा होता तो आणि मलाही तसंच जाणवलं. तो नेहमीच मला पंजाबमधील एका गावातील तरुण भासला, जो अभिनेता होण्यासाठी मुंबईत आला होता. शरीराने तो मुंबईत असला तरी मनाने तो पंजाबला असे. मुंबईत मी फक्त अभिनयासाठी आलोय, ही माझी कर्मभूमी आहे, जन्मभूमी पंजाब - ही भावना त्याच्यात कायम जाणवली. अंगापिंडाने तो दणकट असला तरी मनाने कोमल होता.
आम्ही एकत्र जास्त चित्रपट केले नाहीत आणि आम्ही जे केले ते फारसे संस्मरणीयही नव्हते, याचं मला वैषम्य वाटतं. धरमला आणखी विविधांगी भूमिका मिळायला हव्या होत्या. राजिंदर सिंग बेदींचा ‘फागून’ हा चित्रपट आम्ही जेव्हा केला तेव्हा त्यात एक सीन होता - ज्यात नायिका म्हणजे मी माहेरच्यांनी दिलेली भरजरी साडी नसते आणि पती (धरम)चे उत्पन्न अल्प असते. रंगपंचमीचा खेळ सर्वत्र रंगात आलेला असतो आणि नायिका ‘फागुन आयो रे’ या गीतावर नृत्य करते. पती पत्नीच्या अंगावर रंग उधळतो, साडी खराब होते, नायिका नाराज होते, माहेरच्यांनी दिलेली किमती साडी खराब झाली म्हणते. तिचे हे शब्द त्याला अपमानित करतात आणि पती ते घर सोडून जातो! या एका प्रसंगाने कथेला कलाटणी मिळते. दोन-तीन रिटेकनंतर सीन ओके झाला. पण या प्रसंगानंतर धरमच्या डोळ्यातून आसवं आलेली मी पाहिली. गरिबी आणि कड्या संघर्षातून शिखरावर गेला होता तो. त्याला त्याचे कष्टाचे दिवस आठवले असावेत. इतका भावूक होता हा ‘ही मॅन’.
‘खामोशी’ चित्रपटात मी, राजेश खन्ना आणि धर्मेंद्र असे तिघे होतो. पण चित्रपटात त्याचा चेहराही दिसत नव्हता. त्याने कॅमेऱ्याकडे पाठ करून अभिनय केला आणि तरीही त्याची एक चांगली छाप पाडली. त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव होतं ‘पेशंट नंबर २४ देव कुमार’.
मला मी केलेला स्पाय थ्रिलर ‘बाजी’ आठवतो. तो असा काळ होता जेव्हा मी माझी घरगुती प्रतिमा बदलण्यासाठी ग्लॅमरस भूमिका करण्याचा प्रयत्न केला. खरं तर राजेंद्र कुमार यांनीच मला ग्लॅमरस भूमिका करण्याचा सल्ला दिला होता. मला त्या टप्प्याचा फारसा अभिमान नाही. कधी कधी एखाद्याच्या कारकीर्दीत चुका होतात. चांगले चित्रपट सोडून कमी दर्जाचे चित्रपट बनवले जातात. धर्मेंद्रजींसोबत मी चांगले चित्रपट केले असते तर बरं झालं असतं. म्हणूनच ती खंत मला कायम राहील. उमद्या मनाचा आणि लोभस चेहऱ्याचा धर्मेंद्र इतका देखणा अन्य कलावंत नसेल कुणी!
ज्येष्ठ सिनेपत्रकार