डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
धुक्याची चादर पांघरलेल्या मांडवीतून सुरू झालेला हा प्रवास दिवार बेटाच्या निवांत सौंदर्यातून इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत सप्तकोटेश्वर मंदिरापर्यंत पोहोचला. निसर्ग, इतिहास आणि शिवरायांच्या स्मृतींनी भारलेला हा प्रवास मनाला अंतर्मुख करून गेला.
त्या दिवशी गोव्याच्या मांडवी खाडीवर दाट धुकं पसरलं होतं. पणजी ते दिवार बेट अशी पाण्यातून होणारी फेरी बोटीची वाहतूक थांबवली होती. सकाळी ८ ते ९ दरम्यानची ती वेळ. ही मांडवी म्हणजे; आपण पणजीमध्ये प्रवेश केल्यावर पुलावरून जिचे अफाट विस्तीर्ण पात्र दिसते ती. तिला काही मांडोवी असंही म्हणतात. कर्नाटकात उगम पावणारी ही म्हादेई नदी. तिचं हे विस्तीर्ण खाडीपात्र पणजीत फिरताना दिसत राहतं. माझा जिथे मुक्काम होता, ते ठिकाण मांडवी खाडीकाठी होतं. तिथल्या टेरेसवर उभं राहिलं की, समोर खाडीचं अथांग पात्र आणि त्यात स्थित असलेली दिवार आणि चोडण बेटं दिसायची. काय काय असेल या दोन्ही बेटांवर याचं मला फार कुतूहल होतं.
त्यादिवशी मला दिवार बेट पाहून पुढे अजून एक फेरी घेऊन नार्वे गावातील सप्तकोटेश्वर मंदिराकडे जायचं होतं. अगदी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी मंदिरातील वातावरण प्रसन्न आणि विलक्षण ऊर्जेने भारलेलं असतं. त्यामुळे मला सकाळी लवकर तिथे पोहोचायचं होतं. पण धुक्यामुळे सकाळचा प्लॅन रद्द केला.
मग कलत्या दुपारी सगळे फेरीमध्ये चढले. काही वेळात मांडवीच्या लाटांवर स्वार होत फेरी निघाली. फेरीतून जाण्याचं अप्रूप काही वेगळंच असतं. तीन ते चार मिनिटांतच आम्ही दिवार बेटावर पोहोचलो. बाइक फेरीतून उतरवली आणि समोर पाहते तर ८ छोटे पिटुकले पाणथळ जागेत बसून डोकं वर उंचावून आमच्याकडे पाहत होते. ते होते पाण्यात भिजलेले otters. म्हणजे पाणमांजरं. पाणथळीत साठलेल्या पाण्यात पाणमांजरं डुबक्या मारत होती, पोहत होती. मान वर करून आमच्याकडे पाहत होती. त्यामुळे आमचं बेटावरचं स्वागत अगदी सुंदरच झालं होतं.
पुन्हा एकदा बाइकला किक मारली आणि आम्ही बेट पाहत फिरू लागलो. काही रस्ते चिंचोळे तर काही अगदी प्रशस्त असे होते. शेताचे मोठे मोठे भाग, गोवन पद्धतीची घरं डोळे टिपून घेत होते. तिथल्या वाऱ्यामध्येच गोव्याचं सुशेगादपण जाणवत होतं. एक निवांत अशी लहर तिथल्या वातावरणात होती.
आम्ही गप्पा मारत; बेटावरच्या एका टोकापासून प्रवास करून दुसऱ्या टोकाला पोहोचलो होतो. तिथे आम्हाला पाण्याचं एक भव्य असं जमिनीत खोदलेलं कुंड दिसलं. त्याच्या अगदी बाजूने मुख्य रस्ता जात होता. कडेला बाइक पार्क केली आणि चालत तिथे पोहोचलो. खरंच एक मोठं खोदलेलं पाण्याचं कुंड तिथे होतं. ते नुसतंच खोदलेलं नव्हतं, तर त्याच्या भिंतींवर अगदी सुरेख छोटी गोपुरे कोरली होती. ते केवळ साधंसं पाण्याचं कुंड नव्हतं तर पवित्र असं कोटी तीर्थ होतं. हे स्थळ पोर्णे तीर्थ म्हणून ओळखलं जातं. कुंडाच्या एका बाजूला उतरण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या होत्या आणि उर्वरित तिन्ही भिंतींवर छोटी छोटी गोपुरे साकारलेली दिसली. तिथल्या माहिती फलकावर या स्थळाची माहिती दिली होती. कदंब राजवटीचे राजदैवत असलेल्या श्री सप्तकोटेश्वराचे मुख्य मंदिर या कुंडाच्या बाजूला होते. बहमनी सत्तेने हे मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर, विजयनगर साम्राज्याचे मंत्री माधव यांनी ते पुन्हा बांधले. मात्र, १५४० मध्ये पोर्तुगीजांनी ते पुन्हा उद्ध्वस्त केले. त्यामुळे देवाच्या विटंबनेपासून रक्षण करण्यासाठी, १५५८ मध्ये ग्रामस्थांनी ही मूर्ती सध्याच्या 'नार्वे' (हिंदळे) गावात हलवली. कुंडाच्या पायऱ्यांवर बसून मी कदंबकालीन मंदिराच्या भव्यतेची कल्पना करत होते. सूर्यास्ताच्या सोनेरी किरणांनी परिसर उजळून निघाला होता, पण इतिहासाचा विचार करून माझं मन मात्र उदास होतं. त्याच मनोवस्थेत मी 'नार्वे' येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिर पाहण्यासाठी निघाले.
"आपण जात असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शिवरायांनी केला आहे," हे नवऱ्याचे शब्द ऐकताच मन उत्सुकतेने भरून आले. दिवार बेट मागे टाकून आम्ही फेरीने नार्वे गावात पोहोचलो. गावातील समृद्ध निसर्ग पाहत खाली उतरलो, तेव्हा निसर्गरम्य कुळागराच्या सान्निध्यात वसलेले श्री सप्तकोटेश्वराचे भव्य मंदिर समोर दिसले. प्रशस्त आवार, त्यात बांधलेली मोठी दीपमाळ आणि त्याच्यापुढे उतरत्या छपराचे, कौलारू भव्य मंदिर. पाहताक्षणी डोळ्यांचं पारणं फिटलं. या मंदिराच्या बाजूलाही भव्य अशी निळ्याशार पाण्याची स्वच्छ तळी आहे. ही तळीही पवित्र आहे. तिच्याही तिन्ही बाजूने माड, सुपारीच्या बागा अर्थात कुळागर आहे. पाण्यात या झाडांचं पडलेलं प्रतिबिंब खूपच मोहक दिसत होतं. इथला परिसर नेत्रसुखद, शांत आणि निसर्गरम्य आहे. तळी पाहून मंदिरात प्रवेश केला आणि ऊर अगदी अभिमानाने भरून आलं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आदेशाचा शिलालेख मंदिरात लावलेला दिसला. एका बाजूला छत्रपती शिवरायांची मूर्तीही होती. त्याक्षणी यदा यदा ही धर्मस्य हा गीतेतला श्लोक मनात उमटला होता.
मंदिर आतूनही अत्यंत देखणे आणि तेजस्वी आहे. श्री सप्तकोटेश्वराची पिंडी पाहताना डोळे पाणावले; पण दर्शनानंतर मन पूर्णपणे शांत झाले. नूतनीकरणानंतरही मंदिराची जुनी काविकला आणि पारंपरिक सौंदर्य उत्तम जपले आहे. मंदिरातील सुगंध आणि भिंतींवरील कलाकृती पाहत बाहेर आले, तेव्हा आकाशात गुलाबी संध्याकाळ पसरली होती. आल्यामार्गे दिवार बेटावरून फेरीने पणजीत परतले.
शहरात गाड्यांचा कोलाहल होता, तरी माझे मन मात्र सप्तकोटेश्वर मंदिरातच शांतपणे रुंजी घालत होते..
जवळचं बसस्थानक - पणजी
जवळचा एअरपोर्ट - मोपा
दिवार बेटावर जाण्यासाठी पणजी आणि नार्वे गावातून फेरी आहे.
नार्वे गावात पोहोचायला दोन पर्याय आहेत. दिवार बेटावरून फेरीने पोहोचता येतं. दुसरा पर्याय रस्त्याने पोहोचण्याचा. मयें मार्गे रस्त्याने पोहोचता येतं. तिथून पुढे दिवार बेटावर फेरीने जाता येतं.
भेट देण्यासाठी उत्तम काळ - सप्टेंबर ते मे.
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com