अक्षररंग

दुर्गाबाईंना आठवताना

दुर्गाबाई भागवत या केवळ प्रगल्भ लेखिका नव्हत्या, तर त्या समाजाच्या सदसद्विवेकबुद्धीचा आवाज होत्या. त्यांच्या जाण्यानंतरही त्यांच्या विचारांची, धैर्याची आणि निरलस वृत्तीची ऊब आजही मनात तितकीच जिवंत आहे.

नवशक्ती Web Desk

विशेष

डॉ. मीना वैशंपायन

दुर्गाबाई भागवत या केवळ प्रगल्भ लेखिका नव्हत्या, तर त्या समाजाच्या सदसद्विवेकबुद्धीचा आवाज होत्या. त्यांच्या जाण्यानंतरही त्यांच्या विचारांची, धैर्याची आणि निरलस वृत्तीची ऊब आजही मनात तितकीच जिवंत आहे.

ल्या आठवड्यात, म्हणजे दहा फेब्रुवारीला दुर्गाबाई भागवत यांचा जन्मदिवस होता. त्या दिवशी सहज मनात आलं की, आज जर बाई असत्या तर... त्यांचं वय ११६ वर्षांचं झालं असतं की! माझं मलाच या विचाराचं हसू आलं आणि वाटलं, आज त्यांच्या जन्मदिवसाचं निमित्त कशाला, एरव्ही कितीदा तरी त्यांची आठवण मनात रुंजी घालत असते, लहान मुलासारखं निर्व्याज हसू चेहऱ्यावर असणाऱ्या बाईंनी शेवटपर्यंत-अगदी आजाराने त्रस्त झाल्यावरही-आपलं बालसुलभ कुतूहल मनाशी जपलं होतं-९०व्या वर्षीही. त्यामुळे त्या जाऊन २५ वर्षे झाली तरी त्यांचं नसणं मनाला पटत नाही. फोन करावा असं मनात येतं, पण लगेच कठोर वास्तवाची जाणीव होते.

मला काही काळ बाईंचा प्रत्यक्ष सहवास मिळाला हा अचानक आलेला भाग्ययोग! त्यांच्या लेखनाचा धांडोळा घेता-घेता, त्यांच्याशी घट्ट स्नेहबंधच जुळला. त्यांचं चित्रशैलीतील अभिजात असं ललित लेखन, इतर प्रकारांतील लेखन कालातीत आहे, हे आपण जाणतोच, पण मला कायम वाटत आलंय की, केवळ लिहिण्या-वाचण्यापुरतं नाही, तर ते त्यांच्या मूल्यनिष्ठ व्यक्तित्त्वातूनच आलेलं असल्याने ते खऱ्या अर्थाने आजही आपल्या वर्तमानाशी जोडलं गेलंय. आजूबाजूला अनेक नकोशा, मनस्ताप देणाऱ्या घटना घडत असतात आणि त्यावेळी मलाच काय, माझ्याप्रमाणे अनेकांना तीव्रतेने वाटतं, आज बाई असत्या तर..? आज या ठिकाणी बाई असत्या तर त्यांनी असे होऊ दिले नसते, निदान त्यांनी त्याविरुद्ध जोरदार आवाज उठवला असता. त्या घटनांशी संबंधित लोकांना बाईंचं म्हणणं ऐकून घ्यावं लागलं असतं, कारण बाई म्हणजे समाजातील सामान्य माणसांच्या सदसद्विवेकबुद्धीचे मूर्त रूपच!

मग ती घटना साहित्यसंमेलनाशी निगडित असो, निवडणुकांच्या नावाखाली होणारे संबंधितांचे असभ्य, किळसवाणे वर्तन असो, किंवा किरकोळ, क्षुल्लक कारणांवरून लोकलगाड्यांमध्ये होणारे वाद कुणाचा जीव घेण्यापर्यंत गेलेले असोत, बाई विलक्षण अस्वस्थ होत. या साऱ्या गोष्टी समाजविघातक आहेत, हे त्या निडरपणे सांगत. त्यावर मौन पाळणे त्यांना कधीच मान्य नसे. दरवर्षी नवरात्रीमध्ये चाललेला आवाजाचा कल्लोळ त्यांना सहन होत नसे. कायम त्या त्याविषयी वृत्तपत्रांमध्ये आवाज उठवत. आपण या बाबतीत कशाला भाग घ्यायचा, असे त्यांना वाटत नसे. त्यामुळेच अनेकांच्या मनात त्यांची आठवण आजही असते.

आपल्या ज्येष्ठतेची, लेखनकर्तृत्वाची किंवा संशोधन, व्यासंग यांची झूल त्यांनी आपल्या अंगावर कधीच मिरवली नाही. अगदी सामान्य व्यक्तीला त्यांच्यापर्यंत पोहचून बोलणे शक्य असे. त्या सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेत. एशियाटिकमध्ये रोज जात असत तेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला वा इतर लहान-मोठ्यांनाही, आपल्या डब्यात आणलेल्या घासातला घास त्या देत. आणीबाणीत बाईंना अटक झाली तेव्हा त्या एशियाटिकमध्येच आपलं काम करत बसलेल्या होत्या. पोलिसांनाही त्यांना घेऊन जाणे कठीण वाटत होते. पण त्या अगदी हसत, सगळ्यांचा निरोप घेऊन गेल्या होत्या, कारण स्वातंत्र्य या मूल्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे असं त्यांना वाटत होतं.

१९७५च्या आणीबाणीचा विषय निघाला की, बाईंचे नाव घेतले जातेच. कारण त्यावेळी सर्व साहित्यिकांमध्ये बाईंसारखे धैर्य दाखवून तुरुंगवास स्वीकारणारे साहित्यिक हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेही नसावेत. त्यावेळी एका ज्येष्ठ नेत्याने काढलेले उद्गार अजून लक्षात आहेत. ते म्हणाले होते की, ‘या काळात बाईंनी दाखवलेलं धैर्य अतुलनीय होतं. सगळ्यांचे आवाज बंद झालेले असताना ज्या थोडक्या लोकांनी आवाज उठवला त्यात दुर्गाबाई ठसठशीतपणे लक्षात राहिल्या. एका बाईमाणसाने एवढं धैर्य दाखवावं हे विशेष!’

ते ऐकताना माझ्या मनात आलं होतं की, दुर्गाबाईंच्या दृष्टीने हे असं बाईमाणूस असणं कधीच अडचणीचं नव्हतं किंवा फायदे उठवणारंही नव्हतं. स्त्रीशक्तीची, तिच्या सामर्थ्याची पूर्ण जाणीव त्यांच्या मनात कायमच असे. केवळ स्त्री म्हणून, बाईपणाची कीव करत कोणी स्त्रियांना काही द्यावे हे त्यांना मान्य नव्हते. त्याचमुळे १९९०मध्ये महापालिकेत स्त्रियांसाठी ३३% आरक्षण जाहीर झाले त्यावेळी बाईंनी त्याला कडाडून विरोध केला होता. वर्तमान स्थितीत स्त्रियांसाठी दिल्या गेलेल्या सवलती आणि इतर काही काही देणग्या पाहताना मला सारखी बाईंची आठवण येत होती.

आणखी एक त्यांचा स्वभावविशेष सांगायला हवा. स्त्रियांच्या म्हणून ज्या काही कलाकुसरीच्या, स्वयंपाकाच्या वा इतर बाबी मानल्या जातात, त्यांची साधारणपणे खिल्ली उडवली जाते किंवा तुच्छता दाखवली जाते, त्या साऱ्या गोष्टी बाईंना उत्तम येत असत. एवढंच नाही तर त्यांचा त्यांना अभिमान वाटे. त्या म्हणत- आपली संस्कृती स्त्रियांमुळेच टिकली आहे. स्त्री ही संस्कृतीची वाहक असते. तिची हेटाळणी करू नका. हे त्यांचं केवळ मतच होतं असं नाही तर त्यांच्या मनात शिक्षित-अशिक्षित, धनवान-दरिद्री, स्वभाषा-परभाषा यामध्ये जसं द्वंद्व नव्हतं, तसंच स्त्री-पुरुष यातही द्वंद्व नव्हतं.

एक प्रसंग आठवतोय, प्रसिद्ध चित्रकार द. ग. गोडसे यांच्या कलाविचारावर कोकणातल्या देवरूखच्या कॉलेजात चर्चासत्र होते. बाई तिथे गोडशांच्या कलामीमांसेवर बोलणार होत्या. त्या संशोधनाधारित भाषणानंतर आपले कौतुक ऐकत तिथे न घोटाळता त्या कुणाला तरी बरोबर घेऊन काही शोधत निघाल्या. नंतर कळलं की विशेष कौशल्यपूर्ण अशी बारा घड्यांची पोळी करणारा कुणी तिथे आहे असं त्यांना कळलं आणि त्या माणसाच्या शोधात बाई निघाल्या होत्या.

आणीबाणीनंतर बाईंनी सरकारी माध्यमे, सर्व प्रकारचे पुरस्कार नाकारले ते शेवटपर्यंत. असे पुरस्कार घेऊन मिंधेपणा येतो असे त्यांचे म्हणणे होते. त्याचसाठी त्यांनी कोणतेही पुरस्कार घेतले नाहीत. एक प्रसंग आठवतोय- १९९३ साली बाईंना दादरच्या वनिता समाजातर्फे एक विशेष साहित्य पुरस्कार जाहीर झाला होता. बाईंची त्या पुरस्कारासाठी झालेली निवड अर्थातच अतिशय योग्य होती. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे बाईंनी कार्यक्रमाला जाऊन भाषण केले, पण त्याचवेळी हा पुरस्कार नाकारण्यामागची आपली भूमिका सांगितली. तो पुरस्कार त्याच ठिकाणी त्यांनी अँक्वर्थ लेप्रसी होमच्या अधिकाऱ्यांना समोर बोलावून त्यांच्याकडे सुपूर्द करायला सांगितला. समाजातील गरजूंसाठी त्यांनी हे दिले. समाजऋण फेडणे ही त्यांची त्यामागची भूमिका. तेव्हाचे त्यांचे भाषण, निरलस वृत्ती या सगळ्याचा जमलेल्या सर्वांच्या मनावर कायमचा ठसा राहिला.

दुर्गाबाईंचे ललित लेखन, त्यांची शैली हा मराठी भाषेच्या अंगावरील अतिशय मौल्यवान असा दागिना आहे. त्यांच्या लेखनातील संदर्भसंपन्नता व कालातीत विषय म्हणजे वाचकाला निरंतर समृद्ध करणारा भाग आहे. आपला देश, संस्कृती, लोकसाहित्य यांचे आपल्याशी घट्ट नाते आहे आणि ते आपण सांभाळले पाहिजे याची त्यांना असोशी होती. अतिशय नादमय, लयबद्ध भाषेतील त्यांचे लेखन चिंतनाची डूब घेऊन येते, विचार करायला लावते. आज सभोवार दिसणारा भवताल इतका भेसूर, हिडीस आणि विकृतीमय झाला आहे की त्या गदारोळाने विषण्ण होणारे मन, मनावरची कृष्ण छाया बाईंच्या चार वाक्यांनीही दूर होते. आठवतं की, एकदा अशाच उन्हाळ्याच्या आरंभी मी बाईंशी बोलत एशियाटिकच्या बाहेर पडत होते. समोर हॉर्निमन सर्कलचा परिसर. उकाडा नकोसा झालेला. तेवढ्यात बाई म्हणाल्या, ‘अग, तो बघ समोर बहावा. केवढा फुललाय आणि तो गुलमोहोरही फुलायलाच लागला की. आता उद्या ही खाली पडतील. चैत्रातलं हळदीकुंकू आहे की ग!’

त्या क्षणी बाईंच्या चेहऱ्यावर दिसणारा लहान मुलीसारखा आनंद आजही विसरता येत नाही. निसर्गाचं आणि आपलं असं ऐक्य सतत पाहणाऱ्या, साऱ्यांना आपल्या आनंदात सहभागी करून घेणाऱ्या कशा विस्मरणात जातील?

ज्येष्ठ साहित्यिक

meenaulhas@gmail.com

राज्यात १ मेपासून परवानाधारक रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्यांचे परवाने रद्द करणार - सरनाईक

३६ तासांच्या 'बंद'नंतरही ठाण्यात कमी दाबानेच पाणी; ऐन उन्हाळ्यात पाणीबंदीने नागरिक हैराण

रुग्णालयच आता होणार अर्जदार! अर्जमंजुरीची प्रक्रिया ८ तासांत; सीएम सहाय्यता निधीची नवीन प्रणाली

'व्हायरल'च्या नादात मर्यादा ओलांडल्या! भररस्त्यात तरुणीशी गैरवर्तन; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची धडाकेबाज कारवाई

रांजणगाव महागणपती मंदिर डागडुजीसाठी तीन महिने बंद