हाताने ते चमच्याने 
अक्षररंग

हाताने ते चमच्याने

पूर्वी जेवणं म्हणजे केवळ भूक भागवणं नव्हतं; तो एक संस्कार होता. पाच बोटांनी अन्नाचा पोत जाणून घेत, चवीचा आस्वाद घेत घेत जेवणं ही आपली सहजसुंदर परंपरा होती. आज हातात चमचा आला आणि घासाची गती वाढली; पण त्या घासातली तृप्ती कुठेतरी हरवली. नेमकं काय हरवलं, याचा मागोवा घेणारा हा लेख...

नवशक्ती Web Desk

प्रासादिक म्हणे

प्रसाद कुळकर्णी

पूर्वी जेवणं म्हणजे केवळ भूक भागवणं नव्हतं; तो एक संस्कार होता. पाच बोटांनी अन्नाचा पोत जाणून घेत, चवीचा आस्वाद घेत घेत जेवणं ही आपली सहजसुंदर परंपरा होती. आज हातात चमचा आला आणि घासाची गती वाढली; पण त्या घासातली तृप्ती कुठेतरी हरवली. नेमकं काय हरवलं, याचा मागोवा घेणारा हा लेख...

एखाद्या कार्यालयाच्या अर्ध्या भागात दोन्ही अंगांनी ओळीने अंथरलेल्या सतरंज्या समोर मांडलेली ताटं, किंवा एखाद्या कुटुंबात संपन्न झालेली पूजा किंवा मंगल विधी आणि त्यानंतर एका प्रशस्त खोलीत मांडलेल्या पाट पंगती. समोर मांडलेली हिरवीगार केळीची पानं. आमंत्रित सगळी पुरुष मंडळी स्वच्छ हात पाय धुवून पाटावर स्थानापन्न झालेली. यजमान छान सोवळं नेसून आपल्या पाटावर बसलेले. वाढप सुरू होतं. मिठापासून, चटणी कोशिंबीर, पंचामृत, भाज्या, आमटी, श्रीखंडाची वाटी, भाताची मूद त्यावर पिवळंधम्मक वरण वर तुपाची धार सोडलेली. कुणीतरी हात जोडून आरोळी देतं,‘पुंडलिक वरदा हारी विठ्ठल...’ आणि यानंतर यजमान साऱ्यांना हात जोडून आवाहन करायचे, करा सुरू जेवायला मंडळी, आणि सावकाश होऊद्या.

वाढप्यांची लगबग उडायची, भाताच्या मुदिवर गरमागरम वरण वाढलं जायचं, प्रत्येकाची पाचही बोटं वरण भात कालवू लागायची आणि बोटांनी छान मऊसूत कालवलेला वरणभात तूप पोटात जाऊ लागायचा. पहिला भात संपवून मंडळी पुऱ्यांकडे वळायची. हाताच्या आंगठा, तर्जनी आणि मध्यमा या तीन बोटांनी पुरीचे छोटे तुकडे करून श्रीखंड, भाजीसह स्वाहा होऊ लागायचे. आमटीचा, साराचा भुरका मारताना मात्र पाचही बोटं एक होऊन मुखात शिरायची, तर श्रीखंडाचा समाचार घेण्याचं, लोणच्याच्या चवीचा जिभेला आनंद देण्याचं काम तर्जनी करायची. थोडक्यात हाताने जेवणं ही एक आरोग्यदायी सवय होती. भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदानुसार, अन्नाचा आस्वाद घेण्यासाठी आणि पचन सुलभ करण्यासाठी हाताने जेवणं अधिक फायदेशीर मानतात.

अर्थात जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवायचे हा अलिखित दंडक प्रत्येक घरात असायचा. अन्न छान कालवल्यामुळे अन्नाची चव अजून वाढून, खाण्याचा आनंद वाढत असे. उपाहारगृहात गेल्यावरही डोसा म्हणा, इडली म्हणा, बटाटा वडा म्हणा यांसोबत दिलेला चमचा बाजूला ठेवून छान हाताने खाल्लं जायचं.

पूर्वी, जेवताना उष्ट ही एक महत्त्वाची गोष्ट मानली जात होती. महत्त्वाची म्हणजे म्हणजे या अर्थाने की, भाताला लावलेला हात दुधाच्या पदार्थांना लावला जात नव्हता. घराघरातल्या सगळ्यात ज्येष्ठ गृहिणीची (आजी) यावर सख्त नजर असायची. जेवताना लागणारं तूप, ताक, लोणचं, मुरांबा हे या आज्जीच्या जवळ ठेवलेलं असायचं. कुणाला हवं असेल तर ही आज्जी मंडळी उजव्या हातावर पाणी घेऊन, हात स्वच्छ पुसून मगच तो हात दुधाच्या पदार्थांना लावायच्या. आजच्या जीवनशैलीत उष्ट असं काहीच मानलं जात नाही. डाव्या उजव्या हाताने वाढून घेतलं जातं. थोडक्यात जिथे चमचा, पळी वापरायला हवी तिथे मात्र तिचा उपयोग केलाच जात नाही.

तर, कित्येक वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा, पुढे पाश्चिमात्यांच्या नको त्या गोष्टींना आपलंसं करण्याच्या आणि खोटा मोठेपणा मिरवण्याच्या नादात मागे पडू लागली. अर्थात आजही सर्वसामान्य कुटुंबात हाताने जेवण्याची प्रथा सुरू आहे म्हणा. पण सधन, मोठेपणा मिरवणाऱ्या, श्रीमंत कुटुंबांनी काट्या चमच्यांना आपलंसं केलं.

त्यातच उपाहारगृहांचं रेस्टॉरंट, फूड पॉईंटमध्ये रूपांतर झालं आणि लग्नसमारंभातील बुफे जेवणाची या साऱ्याला साथ मिळाली. काट्या चमच्यांनी जेवण्याचा कल सुरू झाला, जो पुढच्या, आजच्या आंग्लाळलेल्या उच्चशिक्षित पिढीने अगदी मनापासून उचलून धरला. हाताने जेवणं हे अकारण गावठीपणाचं किंवा खालच्या दर्जाचं लक्षण मानलं जाऊ लागलं, आणि त्यातल्या चांगल्या गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जाऊ लागलं.

बरं, तरुण पिढीने काटे चमचे संस्कृतीला आपलंसं केल्यामुळे रेस्टॉरंट, समारंभ, मंगल कार्य या सगळ्यांमध्ये होणाऱ्या जेवणावळींनीही या संस्कृतीला निरुपायाने आपलंसं केलं. वयाची पन्नाशी साठी ओलांडलेल्या, आयुष्य हाताने जेवण्यात गेलेल्या पिढीला आमटी भात चमच्याने जेवणं फारच जड जाऊ लागलं. आज आपण पहातो, रेस्टॉरंटमध्ये अगदी वडा सांबार मागवल्यावर येणाऱ्या डिशसोबत, आपल्या तोंडापेक्षा मोठा चमचा आणि भीतीदायक वाटणारा काटा समोर येतो. दोघांनाही बाजूला सारून छान हाताने आस्वाद घ्यावा असं अगदी मनापासून वाटत असतं. पण अगदी बाजूच्याच टेबलवर बसलेली तरुण मंडळी सराईतपणे काट्या चमच्यांनी खात जेवत असतात. आपण हाताने जेवलो तर कसं दिसेल हा विचार मनात येतो, आणि एका डोळ्याने बाजूच्या टेबलाकडे पहात, काटा चमचा आणि त्या पदार्थाची हातघाई सुरू होते. या झटापटीत खाल्ल्याचं समाधान मात्र मिळत नाही. लग्नसमारंभात, रेस्टॉरंटमधल्या जेवणात आज पूर्ण न शिजवलेला बासमती भात डिशमध्ये वाढलेला असतो. तो हाताने कालवूनही मऊ होत नाही, मग चमच्याची गोष्टच सोडा. त्यावर आमटी ओतून आणि शक्य तेव्हढा चमच्याने दाबून खाल्ला जातो. पोटात गेल्यावर तो न पचता तसाच उभा राहतो. सार, अळू, ताकभात, कढीभात यांचा भुरका तर कधीच विसरला गेलाय. अहो तृप्ततेचा ढेकर देणं जिथे आज वाईट शिष्टाचाराखाली गणलं जातं, तिथे भुरक्याची काय कथा...

चमच्याने अन्न फक्त पटापट पोटात जात असतं, त्यामुळे मेंदूलाही पोट तृप्त झाल्याची सूचना उशिरानेच मिळते. याउलट हाताने जेवताना बोटांच्या स्पर्शामुळे, पोटाला अन्नाची पूर्वसूचना मिळत होती, छान कालवलेलं अन्न मुखात गेल्यावर त्यात व्यवस्थित लाळ मिसळत होती.

चमच्याने जेवणं सोयीचं, स्वच्छ आणि हायजीनिक असलं, तरी यामुळे जेवण खूप वेगाने खाल्लं जातं, ज्यामुळे पचनक्रिया मंदावणं, अति खाणं आणि अन्नाचं तापमान समजण्यात अडचण येणं यांसारखे तोटे होऊ शकतात.

थोडक्यात भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदानुसार, अन्नाचा आस्वाद घेण्यासाठी आणि पचन सुलभ करण्यासाठी हाताने जेवणं अधिक फायदेशीर मानलं गेलय, परंतु परिस्थिती आणि जीवनशैलीपुढे आपण हतबल होऊन जातो.

जेवताना मुखात पहिला घास घेताना देवाची आठवण (नाव) घ्या. यामुळे तुम्ही करत असलेले भोजन हे एक प्रकारचं यज्ञकर्म (हवन) बनतं, त्यासाठी वेगळे कष्ट लागत नाहीत. हे अन्न आपल्या जीवनाचा आधार आहे आणि ते पूर्णब्रह्म आहे. जेवण करणं म्हणजे केवळ पोट भरणं नसून, ती एक पवित्र यज्ञ प्रक्रिया आहे,

अन्न हे पूर्णब्रह्म: अन्न हे देवतास्वरूप मानलं जातं.

यज्ञकर्म: भोजन हा शरीरातील अग्नीला (जठराग्नी) अन्न अर्पण करण्याचा यज्ञ आहे.

पाच बोटं : पाच बोटं हे पंचप्राण किंवा पाच ज्ञानेद्रियांचे प्रतीक मानून अन्नाचा सन्मान केला जातो.

ही सुंदर संकल्पना आज वदनी कवळ घेता.....या श्लोकपुरतीच उरली आहे.

लेखक, निवेदक, कवी

kprasad1959@gmail.com

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली