शिक्षणगुज
युवराज माने
कधी कधी शिक्षण फळ्यावर नसतं… ते मनात लिहिलं जातं. कधी छोटंसं चिन्हही आयुष्यभराची आठवण बनतं. गुरुजी आणि लेकरांमधल्या नात्याची ऊब शब्दांपलीकडची असते. ही गोष्ट आहे-प्रेम, विश्वास आणि राष्ट्राभिमान खिशात मावलेल्या भारताची.
प्रजासत्ताक दिनाच्या अगदी पहाटे मी शाळेत पोहोचलो. आवारात पाऊल टाकताच जाणवलं, आजचा दिवस नेहमीसारखा नाही. दरवर्षीप्रमाणे एकेक करून, सजून-सवरून लेकरं शाळेत येत होती. पण आज काहीतरी वेगळंच होतं. डोक्यावर रंगीबेरंगी रिबिनी, केसांत वेगवेगळ्या पिना, हातावर नाजूक मेहंदी, नखांवर चमचमीत नेलपॉलिश, स्वच्छ शालेय गणवेश…आणि त्या गणवेशावर लहानसं, पण अभिमानानं मिरवणारं भारतीय राष्ट्रध्वजाचं चिन्ह.
मी त्यांना फक्त पाहत नव्हतो…डोळे भरून साठवत होतो. शाळेच्या आवारात देशभक्तीची गीतं, राष्ट्रप्रेम जागवणारा सूर घुमत होता. हवा जणू भारावलेली होती. रोजपेक्षा आज लेकरांच्या पावलांत जास्त उत्साह, डोळ्यांत जास्त चमक होती. पहिलीपासूनची चिमुरडी माझ्याजवळ येत होती.
“गुरुजी, मी किती सुंदर दिसते?” हात पुढे करून मेहंदी दाखवल्याशिवाय त्यांचा आनंद पूर्णच होत नव्हता. गेल्या दोन दशकांपासून मी हेच अनुभवतोय आणि तरीही प्रत्येक वेळी ते नवंच वाटतं. सातवीच्या मुली अंगणात रांगोळी काढत होत्या.
तेवढ्यात स्वाती, खुशी, ममता, पायल, ईश्वरी, शीतल, कल्याणी, साक्षी माझ्याजवळ आल्या. हातावरची मेहंदी दाखवत हसत होत्या. तेव्हाच माझं लक्ष गेलं- स्वातीच्या ड्रेसच्या खिशाला लावलेल्या भारताच्या प्रतिकृतीकडे. मी नकळत म्हणालो,
“स्वाती, हे किती सुंदर आहे! मला खूप आवडलं. मला पण दे ना एक.”
स्वाती क्षणाचाही विचार न करता म्हणाली, “गुरुजी, माझ्याकडे एकच आहे… पण थांबा, मी दुकानातून घेऊन येते.”
आणि ती धावत निघून गेली. आम्ही सगळे तिच्याकडे पाहतच राहिलो. थोड्याच वेळात ती परतली. पण यावेळी चेहऱ्यावर नाराजी, ओठ पुढे आलेले. जवळ येऊन हळूच म्हणाली,
“गुरुजी… दुकानात नाही मिळाले.”
मी सहज म्हटलं, “असू दे बेटा.”
पण स्वाती माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. क्षणभर थांबली आणि मग म्हणाली, “गुरुजी, माझे हे तुम्हीच लावा. तुम्हाला छान दिसेल.”
मी नको म्हणत होतो, पण त्या लेकराने आपला हट्ट पूर्ण केलाच. तिने आपल्या खिशातून ते चिन्ह काढलं आणि माझ्या खिशाला लावलं. त्याक्षणी माझ्या खिशावर फक्त एक चिन्ह नव्हतं… तर एका लेकराचं प्रेम, तिचा अभिमान आणि गुरुजीवरचा विश्वास झळकत होता.
बाजूला उभ्या असलेल्या ईश्वरी आणि शीतलच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकले. आम्ही सगळेच क्षणभर स्तब्ध झालो. मी काहीच बोललो नाही. फक्त त्या लेकरांच्या मनातल्या माझ्याप्रतिच्या भावना काळजाच्या कुपीत साठवत राहिलो.
दिवसभर स्वातीची ती भेट माझ्या खिशावर दिमाखात मिरवत होती. संध्याकाळी घरी आलो. कपडे काढताना पुन्हा मन थांबलं. क्षणभर वाटलं- हे चिन्ह परत करावं का? की स्वतःजवळ ठेवावं? मग जाणवलं, हे फक्त चिन्ह नाही. हा लेकराच्या हाताचा गोड स्पर्श, मनापासून दिलेली देणगी आहे. मग मी आणि प्रयासने ते प्रेमरूपी चिन्ह माझ्या आयुष्यात मिळालेल्या सर्व पारितोषिकांमध्ये आदराने विराजमान केलं आणि आश्चर्य असं की, स्वातीने दिलेलं ते लहानसं प्रेम सगळ्या पारितोषिकांपेक्षा अधिक उठून दिसू लागलं. जणू त्या सर्व पारितोषिकांची उंचीच वाढली होती…
प्रजासत्ताक दिनाची ही भेट आणि दिवसभर स्वातीची सोबत मला रात्री झोपू देईना. मनात एकच आनंदोत्सव चालू होता- लेकरं आपल्या गुरुजींवर इतका जीव लावतात, यापेक्षा मोठं पारितोषिक गुरुजीच्या आयुष्यात दुसरं कोणतं असू शकतं?
शिक्षणगूज संदेश : शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातलं ज्ञान नाही, तर मन घडवणारी प्रक्रिया आहे. प्रेम, विश्वास आणि संस्कार मिळाले तर लेकरं आयुष्य जिंकतात. गुरुजींचं खरं पारितोषिक म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोळ्यातला सन्मान. जिथे माणूस घडतो, तिथेच खरं राष्ट्र घडत असतं
लेखक, प्रयोगशील शिक्षक आहेत. ‘आनंदाचं झाड’ या टोपणनावाने ते शिक्षणातील अनेक बाबींवर लेखन करतात
yuvrajmane892@gmail.com