जगतवारी
मेधा आलकरी
ऑस्ट्रेलियातील केन्सजवळील कुरांडा पर्जन्यवन हा केवळ निसर्गाचा नव्हे, तर हजारो वर्षांच्या आदिवासी संस्कृतीचाही अद्भुत वारसा आहे. हिरव्यागार जंगलातून रेल्वे, स्कायरेल आणि पदभ्रमंती करत अनुभवलेली ही सफर निसर्ग, इतिहास आणि लोकपरंपरेचा अविस्मरणीय संगम घडवते.
खंडाळा, लोणावळ्याच्या असंख्य वर्षांसहलींमध्ये मखमली हिरवळ पांघरलेले डोंगर अगदी डोळे भरून पाहिले आहेत; पण सतत पर्जन्यवृष्टी होत राहणारी दाट जंगलं मी प्रथम पाहिली ऑस्ट्रेलियात. या निसर्गसंपन्न देशातील 'ग्रेट बॅरियर रीफ'च्या सागरसंपत्ती इतकीच ही डोंगरमाथ्यावरील हिरवाई मला वेड लावून गेली. केन्स शहारामधूनच या जंगलसफरी निघतात. पर्यटकांना या जंगलांचा आस्वाद घेता यावा म्हणून शंभरएक वर्षांपूर्वी इथे रेल्वे खोदण्यात आली. 'कुरांडा सिनिक रेल्वे' अशा नावाचा बिल्ला छातीवर मिरवत ही झुकझुक गाडी मोठ्या दिमाखानं केन्स ते कुरांडा हा डोंगरमाथ्यापर्यंतचा प्रवास करते. कुरांडा हे त्या डोंगरमाथ्यावर वसलेलं एक छोटंसं टुमदार गाव ! समुद्रसपाटीपासून तीनशे मीटर उंचीवर असलेल्या या थंड हवेच्या ठिकाणी नेणारा साडेसात किलोमीटरचा हा प्रवास नयनमनोहर दृश्यांनी परिपूर्ण आहे.
गर्द राईतून झुकझुक करत जाताना, पानांवरून टपटप गळणाऱ्या पावसाच्या थेंबांकडे मान वर करून पाहताना आकाशात विहार करणाऱ्या पक्ष्यांचा मला नेहमीच हेवा वाटत आलाय. असं वाटतं, त्यांच्या डोळ्यांतून ही हिरवीकंच जंगलं पाहता आली तर? इथे त्याचीही सोय आहे. स्कायरेल ! कुरांडा रेल्वे, स्कायरेल आणि आपली दोन पायांची रपेट या तिन्ही पर्यायांमुळे जंगलातील फेरफटक्याची छान सोय होणार होती. केबलकारमध्ये बसून त्या महाकाय वृक्षांच्या शेंड्यांनी बनलेलं हिरवं छत पाहायला मिळणार, झुकझुक गाडीतून जाताना ओसंडून वाहणारे धबधबे डोळ्याचं पारणं फेडणार आणि झाडांमधून जाणाऱ्या लाकडी वाटांवरून चालताना हिरवा रानगंध नाकात ओढून घेत त्या वृक्षवल्लींना स्पर्श करता येणार, त्यांची इत्यंभूत माहिती वाचता येणार, त्यांची नावं वाचून त्यांना साद घालत त्यांच्याशी संवाद साधायला मिळणार, गंतव्यस्थानी पोहोचण्याआधी कल्पनेनंच मी हुरळून गेले.
आम्ही सुरुवात केली स्कायरेलने. डोंगराळ प्रदेश, गर्द वनराई आणि अगदी धीम्या गतीनं वर चढणारी केबलकार ! खोल अरुंद दऱ्या, मध्येच खळाळत जाणारा झरा.. खाली पसरलेल्या पाचूच्या बनात काही वृक्ष ओळखीचे, तर काही अगदीच अनोळखी. घरातील कुंडीत कसाबसा सामावलेला फर्न इथे उदंड फोफावला होता. मात्र इथे त्याचे बरेच चुलते दिसले. कुठे परडीसारखा, कुठे घरट्यासारखा तर कुठे ढोलीसारखा ! एके ठिकाणी तर तो वृक्षाच्या डोक्यावर मुकुटासारखा उगवलेला दिसला. हिरव्या रंगाच्या कितीतरी विविध छटा दिसत होत्या. कोवळ्या पालवीचा पोपटी आणि प्रौढत्वाला झुकलेला काळसर दाट हिरवा. पिकलं पान मात्र औषधालाही दिसलं नाही. पावसाच्या सतत शिडकाव्यामुळे सगळं जंगल हिरवंगार! काही वृक्ष इतके उंच की वरून जाणाऱ्या गोंडोलातून वाकून एखादं अनाघ्रात पान तोडता येईल. झाडांच्या मुळाशी तर नजर पोहोचतच नव्हती. उन्हं अंगावर घेण्यासाठी झाडांची जणू चढाओढ लागली होती. जागा मिळेल तिथे वाकडं-तिकडं होत शिरकाव करणं हाच येथील जीवन मंत्र असावा.
रेड पीक हे केबलकारचं पहिलं स्टेशन. तिथे जवळजवळ चारशे वर्ष जुना पाईन वृक्ष पाहिला. राक्षसाच्या 'पाम' एवढी मोठी पाम वृक्षाची पानं पाहिली. आपल्याला परिचित पामही होता तिथे, मात्र त्याचे बुंधे लाल होते. एखाद्या उत्तर भारतीय स्त्रीनं भांगात लांबवर सिंदूर भरावा असे. भल्यामोठ्या वृक्षांना बिलगून उभ्या नाजूक वेली भेटल्या. विशिष्ट वृक्षांसमोर त्याचं नाव, गाव, वय, पर्यावरणातील त्याची भूमिका, स्थानिक, सामाजिक, सांस्कृतिक लोकजीवनातील त्यांचं महत्त्व इत्यादी बरीच माहिती होती. उंच झाडांच्या फांद्यांवरून ठिबकणारं पाणी छोट्या झाडांच्या माथ्यावर पडत होतं. त्यातून एक लयबद्ध संगीत स्त्रवत होतं. मध्येच एक मोठा वृक्ष धारातीर्थी पडलेला दिसला. वरून येणाऱ्या प्रकाशाची तिरीप आता खालच्या स्तरापर्यंत पोहोचत होती. कदाचित या 'आशेच्या किरणा' द्वारे एक नवा अंकुर फुटेल. अंधारात जीवन कंठणाऱ्या या वंशजांमध्ये 'ज्योतिर्गमय' म्हणत, सूर्यप्रकाश पिणारा स्वतंत्र वर्गातील एक निराळा वनस्पती जीव जन्माला येईल. म्हणूनच म्हणतात, ही पर्जन्यवनं प्राचीन असली तरी अशा प्रकारे नित्यनूतनच आहेत.
बॅरन फॉल्स या दुसऱ्या स्टेशनवर उतरल्यावर ८५३ फुटांवरून स्वतःला झोकून देणारा जलप्रपात पाहून आम्ही अगदी मुग्ध झालो. त्याचा आनंद घेऊन आम्ही कुरांडा या अंतिम स्टेशनवर उतरलो. या छोट्याशा निसर्गरम्य गावावर दुकानं आणि आहारगृहांनी केलेला कब्जा पाहून सुरुवातीला तर मन खडूच झालं. चायनीज पदार्थांचा धुरकट उग्र वास आसमंतात भरून राहिला होता. अर्थात संपूर्ण दिवस घालवण्यासाठी कुरांडामध्ये भरपूर आकर्षणं आहेत. छानशी फुलपाखरांची बाग आहे, पक्ष्यांचा शिकारखाना आहे, कोआला पार्क आहे. धाडसी पर्यटकांसाठी जीप, बाइक, बग्गी चालवत जंगलाच्या आतून नेणारा प्रवास आहे, घोडेस्वारी आहे. बॅरन नदीतील नौकाविहारसुद्धा आहे.
शंभर दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या पर्जन्यवनात १२०० प्रकारची फुलझाडं आहेत, नाजूक वेली आहेत, तसेच आवळून गिळून टाकणारे महाकाय 'फिग्स' आहेत. (पर्यटकांना ती भीती नाही) फिग्सची ही जात त्याच्या शेजारील झाडाभोवती आपल्या फांद्या पसरवून शेवटी त्याला आवळून 'खल्लास' करून टाकते. टेबललँडच्या टूरमध्ये असाच एक प्राचीन 'कर्टन फीग ट्री' आम्ही पाहिला होता. त्याच्या पारंब्या वाढून एक मोठा पडदा तयार झाला आहे. दहा हजार चौरस मीटरचं हे पर्जन्यवन हवामान, पर्जन्यवृष्टी, आर्द्रता, जमिनीचा कस, उंच-सखलपणा, ऊन-सावलीचा खेळ यामुळे खूप फोफावलं आहे. ही जंगलं ताजी, शुद्ध हवा पुरवतात आणि वर्षाला सरासरी ४००० मिमी पाऊस पडल्यामुळे इथे पाण्याचा मुबलक साठा आहे. दाटीवाटीनं उभ्या असलेल्या झाडांची मुळं जमिनीत खोलवर रुजून जमिनीची झीज थांबवतात. उष्ण कटिबंधातील या जंगलामध्ये खूप औषधी वनस्पती उगवतात. मांसल गराची फळं आणि उत्तम प्रकारचं लाकूड हे या जंगलसंपत्तीचं वैशिष्ट्य !
मला इथल्या मूळच्या आदिवासींच्या संस्कृतीत स्वारस्य होतं. इथे त्यांना अबोर्जिनल्स म्हणतात. त्यांची संस्कृती आणि कलाकौशल्य जतन करण्याचा वसा इथल्या सरकारनं घेतलाय. बुमरँग हे त्यांचं पसरट व्ही आकाराचं लाकडी शस्त्र बघण्याची मला खूप उत्सुकता होती. ते विशिष्ट प्रकारे फेकलं असता पक्ष्याचा वेध घेऊन फेकणाऱ्याकडे परत येतं. परंतु हे ऐऱ्यागैऱ्याचं काम नोहे !
ते एक वेगळंच कौशल्य आहे. त्या बुमरँगवर बारीक ठिपक्यांची चित्रं काढलेली होती. त्यात साप, पाली, सरडे, चिमण्या आणि काही अगम्य चिन्हे रेखाटलेली दिसली. हे ठिपके म्हणजे केवळ रंग किंवा चित्रकला नव्हे; तर हजारो वर्षांचा इतिहास पाश्चात्यांच्या नजरेपासून लपवून ठेवणारी ती एक गुप्त भाषा होती. आपल्या पूर्वजांचे ज्ञान, पाण्याचे गुप्त साठे आणि धार्मिक विधींची माहिती युरोपियनांना समजू नये म्हणून त्यांनी ही ठिपक्यांची भाषा वापरायला सुरुवात केली. यातील वेगवेगळे रंग वाळू, पाणी, डोंगर किंवा पवित्र जागा यांचे आकाशातून दिसणारे नकाशे असतात. वरून पाहताना ती नक्षी वाटते, पण त्या ठिपक्यांच्या आत त्यांचा इतिहास लपलेला असतो. या प्रदर्शनात पोकळ बांबू किंवा लाकडापासून केलेलं 'डीजरीडू' हे वाद्य बघितलं. दुरून वाटलं, वाजवायला सोपं असावं. मात्र बेंबीच्या देठापासून त्यात हवा फुंकली तरी ते वाजेना. त्या आदिवासींनी त्यात प्राण फुंकल्यावर मात्र त्यातून खोल, धीरगंभीर नाद उमटू लागला आणि सारे वातावरण मंतरल्यासारखे झाले. अंगावर पांढऱ्या पिवळ्या मातीचे ठिपके लावून या आदिवासींनी काठ्या, भाले घेऊन सादर केलेलं पारंपरिक नृत्य मला थेट आपल्या आदिवासी पाड्यांमध्ये घेऊन गेलं. फार पूर्वी देशांच्या सीमा नव्हत्या तेव्हा एकच संस्कृती असावी नाही? उदरभरण, प्रजनन आणि स्वसंरक्षण या तीन गोष्टी साधल्या की उरलेला वेळ माणसं असा नाचगाण्यात घालवत असावीत.
आमचा परतीचा प्रवास होता कुरांडा सिनिक रेल्वेमधून. आपल्या दख्खन राणीसारखी ती बोगद्यातून वाट काढत धावत होती. डोंगरांशी लपाछपी खेळत, पावसाची रिमझिम अंगावर झेलत, ओसंडून वाहणारे धबधबे न्याहाळत आणि पळती झाडे पाहत हा प्रवास चालू होता. पंधरा बोगदे आणि ९३ वळणं घेत गाडी तळाशी पोहोचली. या गाडीच्या इंजिनावर एका भल्यामोठ्या सापाची आकृती रंगवलेली दिसली. त्यामागे एक मोठी मजेशीर दंतकथा आहे. बुदादजी हा या आदिवासींचा देव. सृष्टीचा निर्माता ! तो नागमोडी वळणं घेत, समुद्रतटापासून गिरिशिखरापर्यंत सरपटत जायचा. बॅरन नदी, समुद्राला जोडणारी त्याची खाडी आणि बॅरनची खिंड कोरून काढणारा म्हणे हाच तो शिल्पकार ! त्याच्या पाठीवर आतून मोतिया रंगाची चकाकी असलेलं शिंपल्यांचं सुंदरसं कवच होतं. बॅरन खिंडीतून वर चढताना बुदादजी आपले हे प्रभुदत्त शिंपले विकून त्याबदल्यात जीवनोपयोगी वस्तू घेत असे. असा हा 'बाजारा'ला जायचा प्रवास बरीच वर्ष चालू होता. एके दिवशी तीन पारध्यांची नजर बुदादजींच्या पाठीवरील त्या अलौकिक चमकदार खजिन्यावर पडली. त्या शिंपल्याच्या हव्यासापोटी त्यांनी बुदादजीला मारून, त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते इतस्ततः विखरून टाकले. शरीर शांत झालं तरी त्याचा अमर आत्मा या जंगलात विश्रांती घेतोय आणि त्याचं रक्षणही करतो आहे अशी इथल्या स्थानिकांची श्रद्धा आहे. कुरांडाच्या जंगलानं आणि तिथल्या माणसांनी त्याला आपल्या हृदयात जिवंत ठेवलंय.
अमर आत्म्याच्या इच्छाशक्तीत अतुलनीय बळ असतं म्हणतात. त्याच्यापाशी केवळ एकच प्रार्थना- हे बुदादजी, येथील मानवाला तुझं हे पाचूचं बन अबाधित ठेवण्याची बुद्धी दे!
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com
(पुढच्या लेखात जाऊ ऑस्ट्रेलियातील पर्जन्यवनात)