विशेष
डॉ. मुकुंद कुळे
कलेच्या मुक्त अभिव्यक्तीतूनच जगभरच्या संस्कृतींचा विकास झालेला आहे. किंबहुना संस्कृतीच्या विकासात, बहरामध्ये विविध कलांच्या अभिव्यक्तीचं योगदान महत्त्वाचं आहे. पण विसंगती अशी की, अलीकडच्या काळात संस्कृती रक्षणाच्या नावाने कलांच्या मोकळ्या अभिव्यक्तीवर बंधनं लादली जात आहेत. कलावंतांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य विविध नजरांच्या पहाऱ्यात असेल तर स्वातंत्र्याचा संकोच होतो.
भावना दुखावणं हा सध्या एक मोठा सामूहिक आजार झालेला आहे. कोणाच्या, कधी आणि कोणत्या कारणाने भावना दुखावल्या जातील याचा काही नेम राहिलेला नाही. अर्थात हा आजार तसा नवीन नाही. मात्र गेल्या दहा-पंधरा वर्षांत या आजाराला एवढी हवा मिळाली आहे की निमित्ता-निमित्ताने या आजाराची साथ समाजात उफाळून येते. मग प्रत्येक वेळी एखादी राजकीय-सामाजिक कृतीच त्याला कारणीभूत ठरते असे नाही. उलट अलीकडच्या काळात सांस्कृतिक घटना-कलाकृतींनीच समाजाच्या भावना अधिक दुखावल्या गेल्या आहेत आणि त्याचे महत्त्वाचे कारण आहे - संस्कृती! नवीन काही मांडायला गेलं, नवीन काही सुचवायला गेलं की लगेच 'संस्कृती' नावाची गोष्ट आडवी येते आणि मग भावना दुखावल्याचं कारण सांगत 'ही आमची संस्कृती नव्हे' असे सामाजिक फुत्कार सुरू होतात.
कलावंताचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य : चाकोरी मोडणारं, नवं शोधणारं
खरंतर, बदलत्या काळाचा प्रत्येक क्षण माणसाला आणि त्याच्या मेंदूला अधिक प्रगल्भ, अधिक विचारी, अधिक आधुनिक करत असतो. त्या पार्श्वभूमीवर बदलत्या काळाचे सारे आयाम व्यायाम माणसाने मोकळेपणाने स्वीकारले पाहिजेत. नव्याला, प्रयोगशीलतेला दाद दिली पाहिजे. प्रत्येक अभिव्यक्ती किमान समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे वागण्या-बोलण्यातील स्वैराचाराला मान्यता नाही हे आपल्याला ठाऊक आहे. मात्र सर्वसामान्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लेखक-चित्रकार-शिल्पकार-नाटककार नर्तक अशा कलावंतांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य यात फरक करायला हवा. सर्वसामान्यांना जगण्यातलं स्वातंत्र्य हवं असतं आणि लेखक-कलावंताला आपल्या कलेत व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य हवं असतं. कारण हाडाचा कलावंत कधीही आपल्या कलेतील मळलेली वाट स्वीकारत नाही. उलट मळलेली वाट नाकारून तो स्वतःची वेगळी वाट निर्माण करतो आणि त्यासाठी मग त्याला संस्कृतीची-परंपराची सनातन चौकट मोडायला लागली तर तो तीही मोडतो... पण इथेच मग समाजाच्या (हे सामाजिक गट प्रत्येक वेळी वेगवेगळे असतात.) भावना दुखावतात आणि कलावंताच्या अभिव्यक्तीला विरोध केला जातो. ही आमची संस्कृती नाही, असे सांगत हा विरोध होतो.
कलेच्या अभिव्यक्तीला असे विरोध झाल्याचे आजवरचे दाखले काही कमी नाहीत. राजा रविवर्मा, एम. एफ. हुसेन, विजय तेंडुलकर, अकबर पदमसी यांच्यापासून बा. सी. मर्डेकर, चंद्रकांत काकोडकर, पेरुमल मुरुगन, गिरीश कार्नाड, अनंतमूर्ती... अशी कितीतरी नावं सांगता येतील. या साऱ्यांनी खरंतर आपापल्या कलेच्या माध्यमातून परंपरा आणि समकाळावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला होता. कलेला, लेखनाला वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला होता.
राजा रविवर्मा यांना आज आधुनिक भारतीय चित्रकलेचं जनक मानलं जातं. पण त्यांच्या काळात हिंदू देवतांना मानवी रूपात चित्रित केल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली होती. एका मोठ्या समूहाला त्यांच्या चित्रांमधील देवतांचं 'वास्तववादी' रूप स्वीकारणं कठीण गेलं. मग यामुळे आमच्या धार्मिक प्रतीकांचा अनादर होत असल्याची बोंब त्यांनी ठोकली.
एम. एफ. हुसेन काय किंवा अकबर पदमसी काय, यांच्याबाबतीतही तेच झालं. हुसेन यांनी रंगवलेली सरस्वती प्रतिमा वादग्रस्त ठरली, तर अकबर पदमसी यांच्या 'लव्हर्स १' आणि 'लव्हर्स २' या चित्रांवर थेट १९५४ मध्येच आक्षेप घेण्यात आले होते. पदमसी यांनी स्त्री-पुरुष संबंधांचं चित्रण केल्यामुळे त्या चित्रांवर अश्लिलतेचा ठपका ठेवण्यात आला होता.
नग्नता म्हणजे अश्लिलता नव्हे
गंमत म्हणजे अलीकडेच दीडेक वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने एका आदेशान्वये सीमाशुल्क विभागाला, प्रसिद्ध चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सुझा आणि अकबर पदमसी यांच्या जप्त केलेल्या चित्रकृती नष्ट करण्यापासून रोखलं होतं. कारण सीमाशुल्क विभागाने या चित्रकृती अश्लील म्हणून जप्त केल्या होत्या आणि अश्लील म्हणून ते त्या जाळूनही टाकणार होते. कारण सीमा शुल्क विभागाच्या लेखी जे जे नग्न ते ते अश्लील. आता सामाजिक जीवनातील नग्नता आणि कलेतील नग्नता यात भेद असतो, हे यांना कोण सांगणार?
अगदी याच कारणाने समाजमाध्यमावर प्रसिद्ध झालेली प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगची नग्न छायाचित्रंही काही सामाजिक-सांस्कृतिक संस्थांनी आणि संस्कृती रक्षकांनी अश्लील ठरवली होती. कारण नग्नता आणि अश्लिलता या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आमच्या समाजाला कधी उमगणार? नग्नता हाच मुद्दा असेल तर नग्न साधूंची-मुनींची आपल्याकडे मोठी परंपरा आहे की. मग त्या नग्न साधूंमुळे जर कुणाच्या भावना दुखावत नसतील, तर चित्र-छायाचित्रांतील कलात्मक नग्नतेमुळे कुणाच्या भावना का दुखवाव्यात ? एवढंच कशाला, कलात्मक नग्नतेमुळे ज्यांच्या भावना दुखावतात, त्यांना खरंतर आपल्या प्राचीन मंदिरांवरची यक्ष-यक्षिणी, विविध देव-देवांगनांची विवस्त्र, तरी आखीवरेखीव मिथुनशिल्पं दाखवायला हवीत किंवा त्यांनी ती पाहायला हवीत.
ऐतिहासिक-पौराणिक पार्श्वभूमी आणि समकाळ
प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांचं 'घाशीराम कोतवाल' हे नाटक १९७२ मध्ये रंगभूमीवर आलं तेव्हाही या नाटकावर अनेक राजकीय आणि सामाजिक गटांनी तीव्र आक्षेप घेतला होता. हे नाटक खरंतर मानवाच्या हिंसक लोभी वृत्तीवर भाष्य करणारं होतं. मात्र ते भाष्य करण्यासाठी तेंडुलकरांनी जो काळ आणि जी पात्रनिवड केली ती विशिष्ट समूहाला रुचली नाही आणि त्यांनी आरडाओरड सुरू केली. ऐतिहासिक आणि पौराणिक आशय घेऊन समकाळावर भाष्य करणारी गिरीश कर्नाड यांची 'तलेदंड', 'तुघलक' सारखी नाटकंही वादग्रस्त ठरली. तसंच यू. आर. अनंतमूर्ती यांच्या 'संस्कार', 'भारतीपुरा' सारख्या कादंबऱ्यांच्या विरोधातही परंपरावाद्यांनी झोड उठवली.
समकाळातलं आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे तमिळ लेखक पेरुमल मुरुगन. २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'माधोरुबागन' (अर्धनारीश्वर) या कादंबरीला परंपरावाद्यांनी आक्षेप घेतला होता. ही कादंबरी एका वास्तव घटनेवर आधारित आहे. १८व्या शतकातील, मूल न होणाऱ्या एका जोडप्याची कथा या कादंबरीत सांगितली आहे. मात्र या कादंबरीत आलेल्या मंदिरातील उत्सवाच्या चित्रणामुळे सनातनी चिडले आणि त्यांनी या कादंबरीवर बंदी आणली. पेरुमल मुरुगन यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. परिणामी दुःखी झालेल्या मुरुगन यांनी एका क्षणी जाहीर केलं की - 'पेरुमल मुरुगन' नावाचा लेखक आता जिवंत नाही! आणि त्यांनी आपण आपलं लेखन थांबवत असल्याचं जाहीर केलं. मात्र मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि मुरुगन यांच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाने म्हटलं की, 'कलाकारांना लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे.' तसेच 'तुम्ही पुस्तक वाचू नका, पण तुम्ही वाचू इच्छिणाऱ्यांना रोखू शकत नाही.' न्यायालयाच्या या निर्णयानंतर मुरुगन यांनी पुन्हा आपलं लेखन सुरू केलं.
या सर्व उदाहरणांवरून आपल्या सहज लक्षात येईल की, या कलाकृतींवर आक्षेप घेण्याची मुख्य कारणं कोणती ? तर- कलाकृतीमुळे धार्मिक भावना दुखावणे, कलाकृतीमध्ये सामाजिक किंवा राजकीय मुद्द्यांवर टीका केलेली असणे आणि कलाकृती 'अश्लील' वाटणे... आता ही कारणं बघितली तर अनेकदा हे वाद कलास्वातंत्र्य आणि समाजाच्या नैतिक मूल्यांमधील संघर्षच दर्शवतात.
पण शेवटी नैतिक मूल्य म्हणजे कोणती मूल्यं? तुम्ही सांगताय ती मूल्य लेखक-कलाकारांनी का मानायची? काळाच्या-संस्कृतीच्या-परंपरेच्या अभ्यासातून, चिंतनातून आणि प्रतिभेतून उमगलेली नैतिक मूल्य त्यांची त्यांना मांडू देत की!
करमणूक आणि कला यातला फरक
... कलावंताचं हे जे काही वेगळं सांगणं असतं, ती त्याची कलाभिव्यक्ती असते. त्यामागे त्याचा काहीएक विचार असतो. आपली सर्जनशीलता पणाला लावून लेखक-कलावंत एखाद्या आशय-विषय-अनुभवाला भिडत असतो. महत्त्वाचं म्हणजे लोकांसमोर दृश्यरूपाने आलेली कलावंताची अभिव्यक्ती जेवढी महत्त्वाची, तेवढीच पडद्यामागची त्याची सर्जनाशी चाललेली झुंजही महत्त्वाची असते. कारण खऱ्या कलावंताला निव्वळ समाजाचं रंजन करायचं नसतं, त्याला समाजाला पुढे घेऊन जायचं असतं आणि कोणत्याही कलेत तेच मूल्य महत्त्वाचं असतं. कारण एखादी कलाकृती पाहून रसिकाच्या जाणिवांमध्ये-अनुभवामध्ये काहीच भर पडली नाही, तर कलावंताची ती अभिव्यक्ती व्यर्थ होय. इथे दिवंगत समीक्षक दि. के. बेडेकर यांनी 'साहित्य निर्मिती व प्रक्रिया' या लेखात मांडलेला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. ते लिहितात, "प्रथम करमणूक व कला यांतील फरक आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. करमणुकीचे नवे-जुने सारे प्रकार घेतले तर त्यावरून असे दिसून येईल की, लोकांच्या भावना व विचार उद्दीपित करणे एवढेच करमणुकीमुळे साधावयाचे असते व साध्य होते. कलेचा उद्देश मात्र भावना आणि विचार यांना उद्दीपित करणे हा नसतो. कलावंताचे काम कोठल्याही भावनेचे व विचाराचे उद्दीपन नसून त्याला काय प्रतीत झाले हे सांगण्याचे असते. (त्याला जे प्रतीत झाले) त्याचे महत्त्व कार्यकारणभावाच्या पद्धतीने सांगण्याचे काम ज्ञानसाधना करणारा संशोधक करीत असतोच, पण ज्ञानाच्या पद्धतीने न उमगणारे महत्त्व, किंवा महत्त्वाचा एक पैलू कलावंताला दिसतो व कोठल्या तरी कला-माध्यमाच्या सहाय्याने आपल्याला जे उमगले ते तो इतर सर्वांना साकार व ग्रहणीय करून देतो. करमणुकीपेक्षा वेगळी आणि वेगवेगळ्या आशयांचे दर्शन कलात्मक रीतीने घडविणारी कला ही कलावंताच्या मनाचा, किंबहुना त्याच्या साऱ्या व्यक्तित्वाचा एक सहजोद्गार असते.'
तेव्हा खरा लेखक-कलावंत सतत वेगवेगळ्या अनुभूतीसाठी आसुसलेला असतो. आपल्या चिंतन-मननातून जेव्हा नवं जग, नवा अनुभव रसिकाला देण्याचा तो प्रयत्न करतो, तेव्हा एकप्रकारे त्याने केलेलं ते स्टेटमेंट असतं! संस्कृती-समाज आणि नातेसंबंध यांवर त्याने केलेलं ते भाष्य असतं... आणि हीच त्याची अभिव्यक्ती एखादा समूह, एखादा गट, केवळ भावना दुखावल्याच्या नावाखाली बाद करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या लेखक-कलावंतांची नाही, तर त्याला विरोध करणाऱ्या समाज-गटाचीच बौद्धिक यत्ता अधोरेखित होत असते!!
mukundkule@gmail.com
लोककलांचे अभ्यासक.