अजब निसर्ग
मकरंद जोशी
पावसाळा आला की कानावर पडतो तो बेडूकमामांचा खास ‘डराव डराव’ आवाज! पण हा आवाज करणारे बेडूक फक्त गंमत नाहीत, तर त्यांच्या जगात अनेक रहस्यं दडलेली आहेत.
अवघ्या सृष्टीला तापवणारा, सूर्याच्या कडक उन्हात भाजून काढणारा आणि नद्या-सरोवरांचे पाणी आटवून सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवणारा उन्हाळा कधी एकदा संपतोय असंच या निसर्गातल्या सगळ्यांना वाटत असतं. आकाशातून बरसणाऱ्या जीवनदायी जलधारांची पहिली चाहूल लागते ती उन्हाळ्यात जमिनीखाली दडून बसलेल्या बेडकांना. त्यामुळे मग संध्याकाळी एकत्र जमून किंवा एकेकट्याने मंडूक राग आळवणारे बेडूक दिसायला लागले (खरंतर ऐकू यायला लागले!) की, पावसाळा जवळ आल्याची खरी वर्दी मिळते. पावसाळ्यातील निसर्गाचा विचार करताना बेडूकरावांचा उल्लेख अपरिहार्य असतो. वर्षभर गायब असणारे बेडूकराव पावसाळ्यात मात्र हमखास दर्शन देतातच.
निसर्गाच्या उत्क्रांतीच्या चक्रात साधारणतः पस्तीस ते अडतीस कोटी वर्षांपूर्वी उभयचर म्हणजे जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकतात असे प्राणी निर्माण झाले. या उभयचरांमधील सर्वात मोठा गट बेडकांचा. बेडकांच्या गटाला ‘अनुरा’ म्हणतात. या ग्रीक शब्दाचा अर्थ होतो ‘पुच्छ विहिन’ अर्थात शेपूट नसलेले प्राणी. हे शेपूट नसलेले प्राणी म्हणजे जलचर प्राण्यांची उत्क्रांत अवस्था होती. त्यामुळे या उभयचरांना जमिनीवर श्वासोच्छ्वास करण्यासाठी फुफ्फुसे असतात आणि पाण्यात ते आपल्या त्वचेच्या मदतीने श्वासोच्छ्वास करतात. बेडकांचा जीवनक्रम पाण्यात सुरू होतो. बेडकाची मादी पाण्याजवळच्या वनस्पतींच्या पानावर किंवा पाण्यातच अंडी घालतात. या अंड्यांमधून बाहेर आलेल्या पिलांना टॅड्पोल्स म्हणतात, या पिल्लांना शेपटी असते आणि ते माशांप्रमाणे पाण्यात पोहताना दिसतात. ही अवस्था संपताना बेडकामध्ये आमूलाग्र बदल होतात, त्याच्या शरीरातील कल्ले जाऊन फुफ्फुसे तयार होतात, डोळ्यांपासून ते चेतासंस्थेपर्यंत असे बदल होतात की, ज्यामुळे प्रौढावस्थेतील बेडूक आपले उर्वरित आयुष्य जमिनीवरही आरामात घालवू शकतो.
बेडकाच्या शरीरातील वैशिष्ट्यपूर्ण अवयव म्हणजे त्याची जीभ. अतिशय मऊ असलेली बेडकाची जीभ आकाराने लांबलचक असते आणि ती त्याच्या जबड्याच्या पुढच्या भागाला चिकटलेली असते. भक्ष्य पकडताना एखादी इलॅस्टिकची दोरी ताणून सोडावी त्याप्रमाणे बेडकाची जीभ त्याच्या तोंडातून वेगाने बाहेर फेकली जाते आणि जिभेवरील चिकट लाळेत भक्ष्य अडकले की परत ती तोंडात येते. हा सगळा प्रकार अगदी क्षणार्धात घडतो. आपल्याला बेडकांचे अस्तित्व त्यांच्या मंडूक वाणीमुळे चटकन जाणवते. घशात घेतलेली हवा बाहेर सोडताना स्वरयंत्राच्या मदतीने बेडूक हा आवाज करतात आणि तो मोठा करण्यासाठी त्यांच्या गळ्याजवळ किंवा तोंडापाशी कातडी पिशव्या असतात. ही सगळी डराव डराव सुरू असते ती मादीला साद घालण्यासाठी. त्यामुळे अनेक बेडकांची डराव डराव चक्क मैलभर अंतरावरूनही ऐकू येते. बेडकांच्या ओरडण्यातील विविधता थक्क करणारी आहे. तुम्हाला जर रात्रीच्या वेळी झाडाझुडपातून टाईपरायटर वापरल्यासारखा ‘टक टक टकाक टक’ असा आवाज आला तर समजून जा की आसपास बॉम्बे बुश फ्रॉग आहे. आकाराने अगदी लहान असलेला हा बेडूक त्याच्या गळ्याजवळची पिशवी फुगवून हुबेहूब टाईपरायटरचा आवाज काढतो.
भारतात आढळणाऱ्या बेडकांचे ढोबळपणे जमिनीवर राहणारे, पाण्यात आणि पाणथळ जमिनीवर राहणारे, झाडांवर राहणारे अशा गटांमध्ये करता येते. भारतात जे उभयचर आहेत त्यात ९०% जाती या बेडकांच्या आहेत. भारतात आढळणाऱ्या बेडकांमधील सर्वात मोठा बेडूक म्हणजे ‘इंडियन बुल फ्रॉग’. पावसाळ्यात याचा विणीचा हंगाम असतो तेव्हा याचा मळकट हिरवा रंग बदलून हा पिवळा धम्मक होतो आणि हा ओरडायला लागला की याच्या गळ्याजवळच्या निळ्या रंगाच्या हवेच्या पिशव्या फुगतात. पावसाळ्यात सह्याद्रीच्या रानवाटांवर दिसू शकणारा बाय कलर्ड फ्रॉग हा नावाप्रमाणेच दोन रंगी असतो. डोक्यापासून ते पार्श्वभागापर्यंत येणारा गडद पिवळा पट्टा आणि शरीराच्या दोन्ही बाजूंचा काळा रंग यामुळे हा
दुरंगी बेडूक नजरेत भरतो. यालाच मलबार फ्रॉग असेही नाव आहे. आपल्या शिकाऱ्यांना फसवण्यासाठी काही वेळा हे बेडूक मेल्याचे नाटक करतात आणि जीव वाचवतात.
आपल्या रंगीत अवतारामुळे लक्ष वेधून घेणारा आणखी एक बेडूक म्हणजे फंगॉइड फ्रॉग. पाठीवरचा मातकट पिवळा रंग, कडेचा काळा रंग आणि पायावरचे काळे पिवळे पट्टे यामुळे अगदी नटून सजून तयार असल्यासारखा हा बेडूक दिसतो. याच्या बाबतीत विशेष सांगायचं तर दोनशे वर्षांपूर्वी याचं वर्गीकरण करताना ‘मलबार फंगॉइड फ्रॉग’ असे करण्यात आले होते आणि केरळसह भारतातील अन्य राज्यांमध्ये हा दिसतो असे नोंदवण्यात आले होते. पण काही वर्षांपूर्वी संशोधकांच्या लक्षात आले की, केरळच्या बाहेर दिसणारा फंगॉइड फ्रॉग थोडा वेगळा आहे आणि मग त्याचे नामकरण करताना ‘बहुविस्तारा’ म्हणण्यात आले. हा बहुविस्तारा फंगॉइड फ्रॉग त्याच्या नावानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आढळतो.
पावसाळ्यात ज्या बेडकाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंबोली घाटात गर्दी होते तो बेडूक म्हणजे मलबार ग्लायडिंग फ्रॉग. आपल्या पायाच्या बोटांना जोडणारे पडदे ताणून हा बेडूक एखाद्या पॅराशूटसारखा तरंगत तरंगत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातो. प्रामुख्याने झाडावरच्या शेवाळ्यात लपून बसणारा हा बेडूक हिरव्यागर्द रंगाचा असतो. त्याच्या पायांचे कातडी पडदे मात्र लालभडक रंगाचे असतात. महाराष्ट्रापासून ते केरळपर्यंत अनेक ठिकाणी हा बेडूक आढळतो. याची मादी पानांच्या मदतीने फेसाचा गोळा करून त्यात अंडी घालते. हे फेसाचे घरटे पाण्याजवळ असते. त्यामुळे अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले पाण्यात वाढू शकतात.
बेडूकरावांविषयी बोलताना एका अनोख्या बेडकाचा उल्लेख करायलाच हवा, कारण हा बेडूक सुमारे तेरा कोटी वर्षांपासून पृथ्वीवर नांदतो आहे. या ‘इंडियन पर्पल फ्रॉग’ला लिव्हिंग फॉसिल असंच म्हणतात. आता हा बेडूक फक्त भारतातल्या पश्चिम घाटातील रानात अर्थात सह्याद्रीच्या रांगांमध्ये आढळतो. आश्चर्य म्हणजे तेरा कोटी वर्षे इतका काळ अस्तित्वात असूनही या बेडकाची एक प्रजाती म्हणून शास्त्रीय नोंद २००३ साली करण्यात आली. इतर बेडकांपेक्षा याचा अवतार अगदी वेगळा असतो. एखाद्या रबरी फुग्यात हवा भरावी तसा हा दिसतो. त्याचे एखाद्या तोटीसारखे दिसणारे आखूड नाक चटकन लक्ष वेधून घेते. आपल्या आयुष्याचा जास्तीत जास्त काळ जमिनीच्या खाली घालवणारा हा बेडूक फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीला जेमतेम दोन आठवड्यांपुरता जमिनीवर येतो आणि जोडीदाराशी मिलन झाल्यानंतर पुन्हा जमिनीत गडप होतो. त्यामुळे फार क्वचित नजरेस पडतो.
या बेडकाचा आवाजही अगदी विचित्र एखाद्या कोंबडीच्या पिल्लाच्या ओरडण्यासारखा असतो. तर प्रामुख्याने पावसाळ्यातच पाहायला मिळणाऱ्या बेडूकरावांची डराव डराव म्हणजे जणू पावसाची नांदीच आणि निसर्गाचे चक्र सुरळीत सुरू आहे याचीच घोषणा असते हे विसरू नका.
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.com