अक्षररंग

गाणी! मनातली: गळ्यातली!

जुन्या भावगीतांच्या सुरांनी मनात उमटवलेल्या आठवणी कधीच पुसल्या जात नाहीत. त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारा आणि मराठी संगीतविश्वाचा सुवर्णठेवा उलगडणारा हा संग्रह आहे.

नवशक्ती Web Desk

महेश्वरी

डॉ. महेश केळुसकर

जुन्या भावगीतांच्या सुरांनी मनात उमटवलेल्या आठवणी कधीच पुसल्या जात नाहीत. त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारा आणि मराठी संगीतविश्वाचा सुवर्णठेवा उलगडणारा हा संग्रह आहे.

मोरेश्वर श्रीधर पटवर्धन नावाचे एक कवितावेडे सद् गृहस्थ पूर्वी गिरगावमध्ये होते. ते ‘साहित्य प्रसार केंद्र’ नावाची प्रकाशन संस्था चालवायचे आणि ‘कविताश्री’ नावाच्या कवितेला वाहिलेल्या छोट्याशा मासिकाचं संपादनही करायचे. १९८७ च्या नोव्हेंबर महिन्यात या केवळ कवितेला वाहिलेल्या ‘कविताश्री’ मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध करताना , पटवर्धन यांच्या मनात ज्या अनेक कल्पना होत्या त्यापैकीच एक म्हणजे ‘गाणी ! मनातली; गळ्यातली!!’ या मालिकेचं संपादन आणि प्रकाशन. आपली ही कल्पना त्यांनी आपले स्नेही वामन देशपांडे,माधवी गंगापूरकर आणि विद्या केसकर यांच्यापुढे मांडली. त्यांना ती खूप आवडली आणि कसलाही आर्थिक लाभ नसताना या मंडळींनी पटवर्धनाना मदतीचा पुढे केला. या मालिकेचा पहिला भाग प्रकाशित झाला ऑक्टोबर १९९० मध्ये. आणि मग पुढे काव्यरसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानं, १९९३ पर्यंत एकूण दहा भाग प्रकाशित झाले. आज २०२६ च्या काळात आजुबाजूला सगळीकडे एकंदरीत सांस्कृतिक गोंगाट असताना, ज्यांना स्वतःशी काही भावनाशील गुणगुणत, स्मरण आनंद मिळवायचाय त्यांनी या गाण्यांच्या मालिकेतून एकदा दोन- चार तास प्रवास करावा.. जिवाला थंडावा मिळेल. वाऱ्यावर अदृश्यपणे तरंगत असलेल्या अवीट गोडीच्या सुरांचं ऐश्वर्य अनुभवायला मिळेल.

मराठी रसिक मनाला आनंदाच्या अथांग सागरात ज्या गाण्यांनी आकंठ बुडंवलं आहे अशी हजारो गाणी गेल्या पाऊणशे-शंभर वर्षात तयार झाली. ती गाणी अजूनही ताजी टवटवीत आहेत. त्यांचे रंग फिके झालेले नाहीत. त्या गाण्यांचे सूर कानावर आले की आजही ऐकणारा जागच्या जागीच थबकतो आणि त्या सुरांना मनात घेण्यासाठी अधीर होतो. सगळीच गाणी साधी लक्षात ठेवायला सोपी आहेत असं नाही. काही थोडी अवघडही आहेत. पण तरीसुद्धा ज्याला गाणं गाता येत नाही असा सर्वसामान्य रसिकही ती गाणी आपल्या वेड्यावाकुड्या पद्धतीनं स्वतःशी गुणगुणत त्याचा आनंद लुटत असतो . काही वर्षांनी यातली बरीच गाणी भूतकाळात विस्मृतीच्या दरीत गडपही झाली असती‌. पण ती संग्रहित करून हे दहा भाग मराठी रसिकांसाठी खुले करणाऱ्या साहित्य प्रसार केंद्रानं फारच मोठी कामगिरी केलेली आहे.

१९५० ते १९७५ पर्यंत मराठी भावगीतांचा बहराचा काळ मानला जातो. या काळात एच.एम.व्ही, कोलंबिया सारख्या ग्रामोफोन रेकॉर्ड कंपन्या आणि आकाशवाणीच्या माध्यमातून जी. एन्. जोशी, गजानन वाटवे, जे. एल. रानडे, माणिक वर्मा, मालती पांडे यांच्यासारख्या अनेक पूर्वसरींनी अलीबाबाच्या गाण्यांच्या गुहेत मराठी रसिकांना पहिल्यांदा नेलं आणि अक्षरशः वेड केलं. गजानन वाटवे यांनी ‘दोन ध्रुवांवर’, ‘ वारा फोपावला’, यासारख्या गाण्यांनी त्या जमान्यातील तरुणांना अक्षरशः खिळवून ठेवलं होतं. हा काळ होता गायक, संगीतकार, कवी यांचा मेळ सहजपणे आणि सुरेखपणे जुळून आलेला! ना.घ. देशपांडे, गदिमा, पी.सावळाराम, स.अ. शुक्ल यांच्यासारखे कवी प्रतिभेच्या ऐन तारुण्यात होते. बालगंधर्वांचा सोनेरी कालखंड संपत आला होता आणि नव्या हव्या अशा वाटणाऱ्या मानवी भावभावनांच्या सुरांचं कारंजं सांस्कृतिक बागेत या गाण्यांमुळे उसळलं होतं. एक भारलेलं वातावरण सर्वत्र निर्माण झालेलं होतं. कलाक्षेत्रात आणि लेखन क्षेत्रात चैतन्याचे वारे वाहते झाले होते.

सुधीर फडके, दशरथ पुजारी,यशवंत देव, श्रीनिवास खळे, वसंत प्रभू ,वसंत पवार यासारखी मंडळी संगीत क्षेत्रात नवी कामगिरी बजावू लागली होती आणि मंगेश पाडगावकर नावाचे भावगीतं लिहिणारे एक विलक्षण समर्थ कवी या संगीतकारांना आणि गायकांना मिळाले होते. शांताबाई शेळके यांचं ‘भावसरगम’ कार्यक्रमातील पहिलं गाणं ‘प्रीती जडली तुझ्यावरी’ रसिकांना वेड लावून गेलं.’ शुक्रतारा मंद वारा’, ‘अशी पाखरे येती ‘ यासारखी गाणी मनाचा कब्जा घेऊ लागली. भा.रा .तांबे ,बालकवी, आरती प्रभू यांच्या गाण्यांना चाली लावणारे पंडित हृदयनाथ मंगेशकर आले. लतादीदी आणि आशा भोसले यांनी तर सगळ्या महाराष्ट्रात आपल्या आवाजानं वेडच लावलं. सुरेश भट यांच्या गजला़नी एक नवं दालन उघडलं. ग्रेस , महानोर यांच्या रचना गाजू लागल्या. त्याचवेळी सुमन कल्याणपूर, सुधीर फडके, दशरथ पुजारी, अरुण दाते यांच्या आवाजाची मोहिनी सर्वत्र पसरू लागली. रसिकांना वेडं करू लागली.

या शेकडो गाण्यांमधून निवडक गाणी या दहा भागांमध्ये घेणं तसं कठीण काम होतं. पण या मोरेश्वर पटवर्धन, वामन देशपांडे, माधवी गंगापूरकर ,विद्या केसकर या संपादकांनी अविरत मेहनत करून ज्या गाण्यांनी रसिकांना कालातीत ठेवा दिला ती गाणी या दहा खंडांसाठी निवडली. उत्तम आणि सर्वसमावेशक निवड करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि गाण्यांच्या आवडीचा तोल सांभाळला जाईल याची दक्षता घेतली.

गाणी! मनातली; गळ्यातली!!च्या दहा खंडांमधली गाणी गुणगुणत असतांना जुन्या रसिकांना मधुरस्मरणरंजन अनुभवायला मिळेल, तर नव्या रसिकांना जुन्या काळातला गोडवा कसा होता याचा मागवा घेता येईल. आकाशातल्या नेमक्या कोणत्या सोनेरी तुकड्यानं मनाचा पूर्ण ताबा घेतला हे शेवटी महत्त्वाचं. कुठल्या गाण्यांनं मनावर पहिली फुंकर घातली, गोड खूण केली आणि ही गाण्यांची एल.पी कायमसाठी कानामनात वाजत राहिली हा ज्याच्या त्याच्या अनुभवाचा भाग आहे. पण कुठल्या वळणावर मध्यरात्री रातराणीचा सुगंध आयुष्य उधळून गेला, कुठल्या वाटेवर आपल्यासाठी कुणीतरी फुलं वेचून ठेवली, कुठल्या कोवळ्या स्पर्शाने पहिल्यांदा तनामनावर शहारा उमटला ,याचं पुनःस्मरण करणं हा एक आनंदानुभव असेल. गाण्यांच्या ओळी ह्या आठवणींसारख्या सदासतेज असतात. वर्तमान काळातही जीवनात घडणाऱ्या हळुवार घटनांचा प्रत्यय यातली काही गाणी उत्कटतेनं आणून देतात. प्रणय भावनेचा वास्तवात आस्वाद घेणाऱ्या तरुण तरुणींना एखादं जुनं गाणंही ऐकताना वर्तमानातला सुखद- दुःखद अनुभव अधिक उत्कटतेनं जाणवू शकतो. तो अनुभव अधिक गडद होऊ शकतो. आणि म्हणून आज या ‘गाणी! मनातली; गळ्यातली!!’ च्या दहा खंडांचं पुनर्मुद्रण आवश्यक आहे.

ज्येष्ठ कवी आणि लेखक

maheshkeluskar@gmail.com

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय

रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू