डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
चित्रकाराने कोकणातल्या एखाद्या स्वप्नवत गावाचं चित्र काढावं आणि त्यात सगळे रंग भरावेत, असंच काहीसं गणेशगुळ्याचं रूप आहे. पावसात चिंब भिजलेली हिरवाई, शांत समुद्र आणि प्राचीन मंदिरं या गावाची सफर खास बनवतात.
एखाद्या चित्रकाराने गावाची कल्पना करावी आणि चित्र चितारावं असं हे रत्नागिरीतील गाव. पावसपासून अगदी काहीच किमी अंतरावर हे स्वप्नवत गाव दडलंय. मुख्य रस्ता सोडला आणि आंब्यांच्या बागांतून जाणारी छोटीशी घाटी उतरली की, आपण पोहोचतो गणेशगुळे या निसर्गरम्य गावात. मी या गावात तीन चारदा जाऊन आली आहे, पण या गावातला पावसाळा माझ्या अगदी आठवणीत राहिलाय.
या गावात माझा मुक्काम आंब्यांच्या झाडांच्या सान्निध्यात असणाऱ्या आणि मागल्या दाराने थेट समुद्र दिसणाऱ्या एका नितांत सुंदर कौलारू व्हिलामध्ये होता. १०० वर्षांहून जास्त जुनं हे घर आहे. घराचं जुनं सौंदर्य जपून, घराची डागडुजी आणि सुंदर सजावट करून पर्यटकांसाठी राहण्याची उत्तम सोय तिथे केली आहे. तिथे मला सकाळी जाग यायची कौलांवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या आवाजाने. बाहेर येऊन पाहिल्यावर गाव पावसात चिंब भिजताना दिसायचं, समुद्राची गाज कानात गुंजत राहायची. गावाला कुशीत घेणाऱ्या हिरव्यागार टेकड्या पाहून मन अगदी प्रफुल्लित व्हायचं. छत्री घेऊन गावातून फेरफटका मारून यायचा बेत ठरला होता. पण आधी पोटभर नाश्ता केला. नाश्त्याला घावणे-चटणी आणि गरमगरम चहा होता, सोबत बागेतली फळं होती.
नाश्ता होईपर्यंत पावसाची सर येऊन गेली होती. गावातल्या त्या ओल्याचिंब झालेल्या वाटेवर पावलं पडू लागली. सारा आसमंत अगदी हिरवागार आणि ताजातवाना झाला होता. वाटेत भातशेतीचे कुणगे दिसले. तिथली भात लावणी नुकतीच पार पडली होती. भातशेतीच्या बाजूने जांभ्याची एक वाट आत गेलेली दिसली. कुतुहलाने तिकडे गेले आणि पाहते तर झरा अगदी झुळझुळ करत वाहत होता. झऱ्याचं पाणी पिऊ शकतो इतका तो स्वच्छ होता. शेतामागे काही अंतरावर असलेल्या टेकडीवरून याचं पाणी वाहत येत होतं आणि साऱ्या भातशेतीला संजीवनी देत होतं. तिथे कुणाची गजबज नव्हती की गोंगाट नव्हता. झऱ्याची झुळझुळ कानात साठवली. झऱ्याच्या बाजूलाच एक छोटी बावडी (विहीर) होती. त्यात डोकावून पाहिलं तर अगदी निळंशार पाणी दिसत होतं. सकाळची सुरुवात अगदी सुंदर झाली.
त्यानंतर आम्ही गाडीने इथली मंदिरे पाहायची ठरवलं. पहिल्यांदा आम्ही गावातील गणपती बाप्पाच्या मंदिरात गेलो. एका उंच टेकडीवजा सड्यावर हे मंदिर आहे. पायऱ्या उतरून गेल्यावर मंदिराचं प्रशस्त प्रांगण दिसलं. मंदिरात प्रवेश केल्यावर गणपती बाप्पाची कातळात निर्माण झालेली एक सुंदर स्वयंभू मूर्ती दिसली. बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतलं. या मंदिरात उभं राहिलं की, आंब्याच्या बागांची अप्रतिम दृश्य दिसतात. मंदिरातून बाहेर आल्यावर अगदी समोरच कातळात खोदलेली आणि बाराही महिने पाणी असणारी एक बारव आहे. त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पावसाळ्यात पायऱ्या गुळगुळीत, निसरड्या असल्याने, त्यात उतरणं मी टाळलं. पण कातळ खोदून केलेली ही बारव पाहताना मी थक्क झाले होते. हे गणेशगुळ्यातील प्रसिद्ध मंदिर पाहून तिथून जवळच असणाऱ्या दुसऱ्या मंदिराकडे गेले.
दुसरं मंदिर बघितलं ते आदित्यनाथ मंदिर.. चारी बाजूने भातशेती आणि त्यात हे टुमदार कौलारू मंदिर आहे.. मंदिरात जाण्यासाठी भातशेतीच्या बांधावरून गेले. त्यावेळी भात लावणी जोरदार सुरू होती. एका बाजूला बैलाचं जोत लावून चिखलणी सुरू होती तर जिथे चिखलणी झाली होती तिथे भात लावणी सुरू होती. गोंगाट नाही, मशीनचा आवाज नाही. केवळ चिखल घुसळून निघण्याचा आवाज आणि तरवे लावतानाची बायकांच्या बांगड्यांची किणकिण ऐकू येत होती. भातशेती पार करून मंदिराच्या आवारात प्रवेश केला. तिथे मला दोन मंदिरं दिसली. दोन्हीही मंदिरं कोकणी धाटणीची. कौलारू. अत्यंत देखणी. एका मंदिरात शिवशंकर विराजमान होते, तर दुसऱ्या मंदिरात आदित्यनाथ. मंदिराच्या प्रांगणात असणाऱ्या विहिरी मात्र जमिनीला सलग असणाऱ्या. बिलकुल उंच नाहीत. थेट जमिनीतच खोदलेल्या होत्या. इथे फिरताना सावकाश लक्ष देऊन फिरावं लागतं.
त्यानंतर तिसरं मंदिर पाहिलं. ते टेकडीच्या कुशीत आणि आंब्याच्या झाडांच्या सान्निध्यात होतं. हे मंदिर आहे लक्ष्मी नारायणाचं. जवळपास ५०० वर्षं जुनं हे मंदिर असावं असा कयास आहे. हे मंदिरही कौलारू. आतील सभामंडप लाकडी खांबाचा आणि त्यावर सुबक अशी काष्ठशिल्प असणारा. गाभाऱ्यात लक्ष्मी नारायणाची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे. मंदिराच्या प्रांगणात मारुतीची आणि गरुडाची मूर्ती आहे. दीपमाळ आहे. इथल्या आवारातही जमिनीला समांतर अशीच विहीर आहे. या विहिरी खरंच विलक्षण आहेत. आजुबाजूला असणाऱ्या घनदाट अशा जंगलात आणि आंब्याच्या बागेत हळद्या, धनेश असे पक्षी मुक्तपणे बागडताना दिसतात.
सकाळची गावातील मंदिरं, आजुबाजूचा निसर्ग पाहत केलेली भटकंती अविस्मरणीय होती. संध्याकाळी तिथला समुद्रकिनारा आणि किनाऱ्या बाजूच्या टेकड्या बघायच्या ठरवलं. गणेशगुळ्याचा समुद्रकिनारा अगदी लांबलचक असा आहे. त्याच्या एका बाजूला असणाऱ्या टेकडीवर ट्रेक करत गेले. करवंदाच्या जाळीतून, झाडीझुडपातून जाणारी पायवाट तुडवत एका पॉइंटला पोहोचले. तिथून समुद्राचा क्षितिजापर्यंत पसरलेला विस्तार अगदी डोळे भरून पाहिला. पावसाळा असल्याने समुद्र अगदी उधाणलेला. खालच्या खडकावर लाटा फुटून आमच्यापर्यंत त्याचे तुषार उडत होते. वाराही सुटलेला. इतक्या वाऱ्यात समुद्र गरुड समुद्रावर विहरताना दिसला. त्याच्या पंखातल्या बळाची कल्पना करून मी अचंबित झाले.
टेकडी उतरून खाली आल्यावर राहत असलेल्या स्टे काढून एक उत्तम सोय केली होती. घराच्या समोर असणाऱ्या वाळूवर टेबल ठेवून हाय टी ची मांडणी केली होती. समोर सूर्य अस्ताला जात होता. काळे ढग बाजूला होऊन केशरी गुलाबी प्रकाश समुद्रावर आकाशात पसरला होता. खुर्चीत निवांत बसून, अशी दृश्य पाहत आणि समुद्राची गाज ऐकत चहा घेणं एक विलक्षण अनुभव होता.
रत्नागिरीचा प्लॅन करत असाल तर समुद्रकिनारा लाभलेलं, मंदिराने संपन्न आणि निसर्गसमृद्ध गणेशगुळे गावही नक्की प्लॅनमध्ये समाविष्ट करा. तिथे बरेच होमस्टे सुरू झाले आहेत. अगदी बजेटफ्रेंडली ते अगदी प्रीमियम असे स्टे तिथे उपलब्ध आहेत. पण कोकणात भटकंती करत असाल तर एकदा तरी या गावाला नक्की जाऊन याच.
जवळचे रेल्वे स्थानक, बस स्थानक हे रत्नागिरी आहे. पावसपासून गणेशगुळे जवळ आहे.
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com