अजब एलियन, गजब तास 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
अक्षररंग

अजब एलियन, गजब तास

शाळेतल्या सातवीच्या वर्गाचा धिंगाणा, अचानक वर्गात झालेला एका हिरव्या एलियनचा प्रवेश आणि त्यानंतर सुरू झालेला General Knowledge चा प्रवास! भूगोल आणि विज्ञानाची अनोखी सांगड घालणारी ही आहे एक रंजक गोष्ट...

नवशक्ती Web Desk

कथा

सुरेशचंद्र वाघ

शाळेतल्या सातवीच्या वर्गाचा धिंगाणा, अचानक वर्गात झालेला एका हिरव्या एलियनचा प्रवेश आणि त्यानंतर सुरू झालेला General Knowledge चा प्रवास! भूगोल आणि विज्ञानाची अनोखी सांगड घालणारी ही आहे एक रंजक गोष्ट...

इयत्ता सातवीमधील आम्ही विद्यार्थी. वर्गात एखाद्या तासाला शिक्षक आले नाहीत तर काय धमाल असते. त्यावेळी आम्ही मनसोक्त धिंगाणा घालतो. कुणी कागदाचा बाण करून मारतो तर कुणी बाकाचा ढोल वाजवतो.  मॉनिटरचे कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. जास्त

गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे तो वर्गशिक्षकांना कळवतो. त्यासाठी दिलेली शिक्षा आम्ही अगदी आनंदाने सहन करतो. 

त्या दिवशी सोशल स्टडीज म्हणजे सामाजिक शास्त्राचा तास होता. आमचे शिक्षक वर्देसर रजेवर असल्याची बातमी लागताच आम्हाला हर्षवायू झाला. वर्गातील काही मुलांनी शीळ मारून तर काही मुलांनी लाईकचा अंगठा दाखवून आपला आनंद व्यक्त केला. सोशल स्टडीजमध्ये मुलांना समाज कसा तयार झाला, लोक कसे राहतात, देश कसा चालतो आणि जग कसे आहे हे समजते. हा विषय मुलांना चांगले नागरिक बनण्यासाठी मदत करतो.

पण आमचा धिंगाणा करण्याचा आनंद फार काळ टिकला नाही. वर्गात एकदम चित्रविचित्र दिसणारे वेगळेच सर शिरले. त्यांचा रंग रेडियमसारखा चमकदार हिरवा. एलईडीसारखे प्रकाशमान दिसणारे गोलगोल मोठ्ठे निळे डोळे. नाक मात्र एकदम छोटंसं नकटं. डोक्यावर अँटीना. अंगावरच्या कोटावर चमचम करणारे तारे. गळ्यात सप्तरंगी टाय. चालताना पाय जमिनीला टेकतच नव्हते… हवेत तरंगताना वाटत होते. 

“हॅलो... विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मनस्वी शुभेच्छा.... मी एलियन सर...आमच्याकडे दिवस-रात्र नसते त्यामुळे आम्ही गुड मॉर्निंग...गुड नाइट म्हणत नाही.” हसून बोलताना त्यांचे तोंड वर्तुळाकार आकार घेत होते. “मी त्रिज्या ग्रहावरून आलो आहे. चला तर सोशल स्टडीजचा तास घेऊ या.” 

“एलियनसर...पण तुमचं नाव काय?” खट्याळ चिंटूने विचारले,”आणि तुमचे पाय जमिनीला कां टेकत नाहीत?”

“माझं नाव गगन... पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आमच्या त्रिज्या ग्रहापेक्षा कमी आहे. त्यामुळे पृथ्वीवर आम्ही तरंगत चालतो.” 

“सर पण त्रिज्या ग्रह आहे कुठे? आणि तुम्ही इकडे पृथ्वीवर आलात कसे?” बगळ्याने विचारले. 

“त्रिज्याग्रह परीघ नावाच्या आकाशगंगेत आहे. त्यातील व्यास या ताऱ्याभोवती आम्ही प्रदक्षिणा घालतो. पृथ्वीपासून तो 20 प्रकाश वर्षे दूर आहे. पण आमचा ग्रह स्वतःभोवती प्रदक्षिणा घालत नाही. त्यामुळे आमच्याकडे दिवस रात्र नाहीत.” एलियन गगन सरांनी खुलासा केला. 

“तुम्ही वाटेत खाल्ले काय? तुमच्याकडे दिवस रात्र नाही मग नाश्ता, लंच, डिनर कसे घेता?झोपता कधी?” मिनीने विचारले. 

“पृथ्वीवरील वृक्षवल्ली जसे स्वतःचे अन्न स्वतः बनवतात तसे आम्ही आमचे अन्न व्यास ताऱ्याच्या सौरऊर्जेपासून स्वतः बनवतो.”

“मग तुम्ही पिझ्झा, बर्गर, वडापाव, पावमिसळ, इडली सांबार असे चविष्ट पदार्थ खात नाही कां? पिझ्झा खाण्याची  मज्जा तर औरच असते.” बंड्याने हसून विचारले.

“बरोबर आहे तुझं. पण वृक्षवनस्पती जशी फळे, फुले तयार करतात तसं आमचं शरीर आमची जीवनसत्वे, कर्बोदके, प्रथिने, फॅट्स, खनिजे स्वतःच तयार करते. फळांच्या रसाळ चवी निसर्गतःच आमच्या शरीरात तयार होतात. आम्हाला ते चाखावं लागत नाही. शिवाय फुलांचा सुगंधही आमची त्वचाच निर्माण करते. “

हे सगळं अप्रूपच होतं. वर्गातील सर्व विद्यार्थी एलियन गगन सरांना पाहून हरखुन गेले. 

“सर, तुमची जीभ दाखवा पाहू.” छोट्या सोनूनं स्मार्ट प्रश्न विचारला. 

“आम्हाला जीभही नाही.” तोंडाचे बोळके दाखवित गगन हसून म्हणाला,” तुमच्यासारखी पंचेंद्रिये आम्हाला नसतात. नाक, कान, डोळे , जीभ , त्वचा आम्हाला नसते. जे दिसते तसे नसते. आमच्या डोक्यावरचा शक्तिमान अँटिना गंध, ध्वनी, दृष्टी, चव, स्पर्श या सर्वांच्या संवेदना निर्माण करतो आणि दुसऱ्यांच्या संवेदनाही स्वीकारतो.”

“पण मग तुला डोळे, तोंड, नाक, कान कसे काय?” राजूने विचारले.

“तो फक्त दाखवण्याचा मुखवटा आहे. त्यांना काहीच काम नसते.” गगन सरांनी खुलासा केला. 

“तुमच्या त्रिज्या ग्रहावर झाडीझुडी, डोंगर, नद्या आहेत कां? “पिंटूनं विचारले. 

“आम्ही व्यास ताऱ्याभोवती तीन महिन्यात एक प्रदक्षिणा घालतो. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा एकेक महिन्यांचा असतो. तीनही ऋतू आपापले कार्य महिनाभरात उरकत असल्याने आमच्या ग्रहावर भरपूर पाऊस पडतो आणि वर्षभर पुरेल इतके पाणी नद्यांना असते. इथे सुंदर हिरवे निळे डोंगर आहेत. थंडीत व उन्हाळ्यात आमच्या शरीरात एसी सारखी यंत्रणा कार्यरत असते. शरीराचे तापमान ते नियंत्रित करते. आम्हाला तुमच्यासारखे एसी रूममध्ये बंदिस्त रहायला लागत नाही.”

थोडे थांबून गगन सर म्हणाले, “आमच्या इथली झाडे पण बोलकी आहेत. आमच्या शास्त्रज्ञांनी वनस्पतींची बोली भाषा ऐकणारे यंत्र शोधून काढले आहे. ते कानाला लावले की आपण झाडांशी प्रत्यक्ष बोलू शकतो. वृक्ष आम्हाला हवामानाबद्दल अलर्ट देतात. वादळाची सूचना देतात. त्यामुळे आम्हाला वेधशाळेची  गरजच नाही.”

“पृथ्वीवरची झाडे बोलू लागली तर काय मज्जा येईल.” मिनी म्हणाली,” एलियन सर, येताना दोन चार रोपं तरी आणायची. आमच्याकडे ही बोलणारी झाडे लावली असती की आम्ही.”

“नाही इथे प्रदूषण खुप आहे. आमची झाडे इथे तग धरणार नाहीत. आमच्याकडे प्रदूषण “शून्य” पातळीवर आहे.” गगन सर.

“तुमच्याकडे चिमण्या, कावळे, पोपट, मैना, मोर, गरुड असे पक्षी आहेत कां?” बगळ्याने आणखी एक प्रश्न विचारला. 

“हो...आमच्या ग्रहावर पक्षीसुद्धा आमच्याशी संभाषण करतात. माणसासारखे गातातही. आम्ही फर्माईश करू तसे भावगीत, नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत, भजन सर्व काही ऐकवतात.” 

“आणि प्राण्यांचे काय ? तुमच्याकडे वाघ सिंह, हत्ती, घोडे, उंट, गाय, बैल, गाढव यासारखे प्राणी आहेत कां?.” बंड्याने विचारले.

“हे प्राणी आमच्याकडे नाहीत. पण त्यांच्यासारखी डोकी धडाला जोडलेले  मानवी आकाराचे बुद्धिमान प्राणी आमच्या ग्रहावर आहेत.  हे प्राणी विज्ञान आणि तंत्रज्ञान यात कुशल आहेत. त्यात काही शास्त्रज्ञ, इंजिनियर्स, डॉक्टर्स आहेत. “

“म्हणजे वाघ, सिंहाची डोकी असणारे प्राणी शिकार करीत नाहीत कां.” पिंटूने विचारले. 

“ते देखील वनस्पतींसारखे स्वतःचे अन्न स्वतःच तयार करतात. इथे कुणी कुणाची शिकार करीत नाही.” गगन सर.

“तुमच्याकडे चंद्र आहे कां. सुंदर चांदणे पडते कां.” मिनीने छान प्रश्न विचारला.  

“आमच्या ग्रहाला सहा चंद्र आहेत. त्यावर आम्ही वेळ ठरवतो. आमचे कालमापन त्यांच्या पूर्वेला उगवण्यावर ठरते.”

“तुमच्या ग्रहावर भारत, रशिया, अमेरिकेसारखे देश आहेत कां? आफ्रिका, आशिया सारखे खंड आहेत कां? महासागर आहेत कां? व्हेल, डॉल्फिन सारखे जलचर मासे आहेत कां?” चिंटूने प्रश्नांचा भडिमार केला. 

“त्रिज्या ग्रहावर दोनच खंड आहेत. कायम उजेड असणारा अभ्रिका खंड आणि अंधार असणारा निद्रिका खंड. आमच्याकडे गोड्या पाण्याचा समुद्र आहे. मासेही स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात.”

“तुमच्याकडे राजा, राणी किंवा पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष आहेत कां?” पिंट्याने विचारले.

“नाही...प्रत्येकाकडे पुरेसे अन्न, वस्त्र, निवारा आहे. आमच्या गरजा खूप कमी आहेत. आम्ही स्वयंपूर्ण आहोत. आमची वैज्ञानिक प्रगती खूप झाली आहे. आम्हाला राज्यकर्त्यांची गरज नाही.” गगन सरांनी स्पष्टीकरण दिले.

“तुमच्याकडे रुपया आणि डॉलर्स आहेत कां.” राजुने विचारले. 

“नाही..कुणालाच कशाची गरज पडत नाही. त्यामुळे व्यवहारात चलन नाही.”

“गगन सर, तुमच्या ग्रहावर शाळा आहेत कां. बोर्डाची परीक्षा असते कां?” राजुने विचारले. 

“नाही...प्रत्येक जन्मलेल्या बाळांना ज्ञान, विज्ञान, आरोग्य, यांची लस टोचतात. यातूनच नवा नागरिक घडतो.”

हे ऐकून सारे चकित झाले. “पृथ्वीवर अशी लस असती तर आपल्याला शाळेत जायचे वाचले असते.” छोट्या म्हणाला. 

“गगन सर, तुम्ही एलियन आहात. पण तुमच्या ग्रहावर तुम्ही काय काम करता?” टिनुचा प्रश्न. 

“आम्ही सर्व एलियन्स अंतराळ प्रवास करतो. सृष्टीतील आकाशगंगा, त्यातील ताऱ्यांभोवती फिरत असणाऱ्या ग्रहांचा अभ्यास दौरा करतो. तेथील माहिती आमच्या ग्रहावरील डेटा बेसमध्ये साचवतो.”

“आमच्या पृथ्वीच्या अभ्यास दौऱ्यात तुम्हाला काय आवडले. आमची वसुंधरा कशी वाटते?” मिनीने मोठ्या कौतुकाने विचारले. 

“पृथ्वी ग्रह सध्या पूर्णपणे पर्यावरण प्रदूषित झाला आहे. गरीबी, कुपोषण, भ्रष्टाचार, लाचलुचपत, काळापैसा, राजकारण, धार्मिक तेढ, जातीयवाद अशा समस्यांनी बरबटलेला आहे. दहशतवादाने पृथ्वीला पूर्णपणे विळखा घातला आहे. विनाशकारी अण्वस्त्रांचे साठे न भूतो न भविष्यती वाढले आहेत. त्यांचा वापर झाला तर पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होईल.” एलियन सर गंभीर होऊन म्हणाले. 

एवढ्यात तास संपल्याची घंटा झाली. एलियन सर वर्गातील खिडकीवाटे अंतराळाच्या दिशेने निघून गेले. जाताना ते म्हणाले, “बाय...पुढल्या वेळी मी अशाच ऑफ तासाला येईन. तोपर्यंत तुम्ही तुमचे सोशल स्टडीजचे नवे प्रश्न तयार ठेवा.” 

त्या दिवशी आम्हाला कळलं—समाजशास्त्र फक्त पुस्तकात नसतं… ते पृथ्वीवरंच नाही तर साऱ्या विश्वामध्ये व्यवहारात आहे. 

विनोदी लेखक

sureshchandrawagh@gmail.com

मुंबईला मिळणार मनोरीचे गोड पाणी; अखेर मनोरी प्रकल्पाला MPCB मेरिटाईम बोर्डाची मंजुरी;'डिसेलिनेशन'च्या प्रकल्पाला गती

नवी मुंबई विमानतळावर शिवाजी महाराजांचा पुतळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; अनेक मान्यवरांची उपस्थिती

Mumbai : धारावी पुनर्विकासात ६९१ धार्मिक स्थळे; न्यायमूर्ती भोसले समितीने मुख्यमंत्र्यांकडे सोपवला हंगामी अहवाल

Mumbai : पाणी टँकरचालकांचा उद्यापासून संप; बडे टॉवर, कार्यालये यांना फटका बसण्याची भीती

अंधेरी क्रीडा संकुल की लॉजिंग अँड बोर्डिंग? ५०हून अधिक खोल्यांमध्ये गैरप्रकार, BMC चौकशी करणार, महापौरांचे कारवाईचे आदेश