अजब निसर्ग
मकरंद जोशी
निसर्गातील काही झाडांची ही विलक्षण किमया आहे. उंबर, वड आणि पिंपळ यांसारख्या झाडांची फुलं आपल्या नजरेला कधीच दिसत नाहीत, तरी त्यांना फळं कशी येतात, यामागचं रहस्य तितकंच रंजक आणि आश्चर्यकारक आहे.
निसर्गातील वनस्पतींच्या जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्यांची फुलं. या फुलांच्याच माध्यमातून तर वनस्पतींचा प्रसार होतो. मात्र या पृथ्वीवर जेव्हा वनस्पती अवतीर्ण झाल्या तेव्हा त्यांना फुलं येत नव्हती. सुमारे चाळीस कोटी वर्षांपूर्वीच्या या वनस्पती आपला बीजप्रसार फुलांच्या माध्यमातून करत नव्हत्या तर पानांमागे असलेल्या स्पोअर्स म्हणजे सूक्ष्म बीजाणूंच्या मदतीने या वनस्पतींचा प्रसार व्हायचा. आपल्या ओळखीची आणि चाळीस कोटी वर्षांपासून पृथ्वीवर टिकलेली वनस्पती म्हणजे नेचा (फर्न). आज आपण वेगवेगळ्या पद्धतीने फुलणारी झाडं सर्वत्र बघतो, या सपुष्प वनस्पती पृथ्वीवर अवतरल्या त्या सुमारे १३-१४ कोटी वर्षांपूर्वी. या वनस्पती अवतरल्या त्याच काळात पृथ्वीवर कीटक अवतरले. त्यामुळे कीटकांच्या मदतीने झाडांच्या फुलांचे परागीभवन होऊन फळं निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे तेव्हापासून झाडांनी फुलांच्या माध्यमातून आपली जाहिरात करायची, कीटकांना आकर्षित करून घ्यायचं आणि आपली संख्या वाढवायची हा निसर्ग नियमच बनून गेला. आता नियम म्हटला की अपवाद आलाच नाही का? त्याप्रमाणे मग फुलणाऱ्या, फुलं येणाऱ्या झाडांची संख्या सर्वात जास्त असली तरी अपवाद म्हणून काही झाडं मात्र फुलांशिवायच जणू आपलं काम चालवताना दिसतात. निसर्गाची अजब किमया अशी की या झाडांची फुलं दिसत नाहीत पण त्यांना फळं मात्र येतात.
अशी झाडं किंवा खरंतर त्यांची फळं सगळ्यांचच लक्ष वेधून घेणार ना? अगदी लोककथांमध्येसुद्धा सीतेनं रामाला बिन फुलाचं फळ आणायला सांगितल्याचा उल्लेख आढळतो. रामाला बिचाऱ्याला काही असं फळ कळेना मग सीतामाईंनीच सांगितलं की ‘बिनफुलाचं फळ म्हणजे उंबर!’. खरोखरच उंबराचं फूल तर कोणीच पाहिलेलं नसतं, मग उंबरं कशी तयार होतात? तर उंबराचं फळ आणि फूल एकच असते. तुम्ही बघितलंच असेल की उंबराची फळं घोसाने लगडलेली असतात. या गुच्छाला वनस्पती शास्त्रात ‘सायकोनियम’ म्हणतात. ही फळं (किंवा फुलं!) आधी हिरव्या रंगाची असतात. या फळांची आतली रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. या फळाच्या आतल्या भागातच पुंकेसर आणि स्त्रीकेसर असतात. ही फळं हिरवी असताना देठाच्या विरुद्ध भागावर असलेल्या छिद्रामधून ‘ब्लास्टोफॅगा सेनेस’ ही लहानशी माशी (वास्प) जिला आपण ‘चिलट’ म्हणतो ती उंबराच्या फळामध्ये शिरते. आत शिरल्यावर त्या फळाच्या (किंवा फुलाच्या) पोकळीत ती आपली अंडी घालते. तिच्या अंगावर दुसऱ्या फळाकडून आलेले परागकण असतात, त्यामुळे जेव्हा ती या फळाच्या बाहेर पडण्याची धडपड करते तेव्हा आपोआप परागीभवन होते आणि आता उंबराच्या फुलाचं रूपांतर फळामध्ये होऊ लागतं. मात्र बाहेर न पडता आल्याने ही माशी आतच मरते. पण फळातील माशीच्या अंड्यांमधून तिची पुढची पिढी जन्माला येते आणि त्यातील नर-माद्यांचं मिलन होऊन नर मरतात. मग या नवीन माद्या बाहेर पडण्याचा मार्ग शोधतात, एव्हाना फळ पिकायला आलेलं असल्याने त्यांना बाहेर पडणं सोपं जातं आणि या फळातील परागकण अंगावर घेऊन या माद्या नव्या कच्च्या फळांमध्ये शिरतात आणि तिथे हे चक्र पुन्हा सुरू होतं. त्यामुळे उंबराची झाडं वाढण्यासाठी या माशीचं अस्तित्व टिकणं आवश्यक आहे.
उंबर हे झाड वड, पिंपळ, अंजीर यांच्या कुळातील आहे. औदुंबर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंबराचं मूळ, साल, फळं, पानं औषधी आहेत. तांबट, बुलबुल, धनेश, होले असे अनेक पक्षी उंबराची फळं आवडीने खातात आणि त्यांच्या विष्ठेमधून पडलेल्या बियांतून उंबराची नवी झाडं येतात. उंबरासारखंच अंजिराचं फूलही बाहेर दिसत नाही. अंजिराच्या वेगवेगळ्या जातींप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या वास्प त्यांचं परागीभवन करतात.
उंबर आणि अंजिराच्याच कुळात फणसही येतो. फणसाची भाजी, फणसाचे गरे, त्या गऱ्यांचे वेगवेगळे पदार्थ सगळ्यांनाच माहिती असतात पण फणसाची फुले मात्र कोणी पाहिलेली नसतात. याची फुलं उंबराप्रमाणे पूर्णपणे अदृश्य नसतात, पण पानांना चिकटून येत असल्याने पटकन नजरेत भरत नाहीत. फणसाचा फुलोरा हा झाडाच्या खोडाला किंवा फांदीला चिकटून येतो. एकाच झाडावर नर आणि मादी अशी दोन्ही प्रकारची फुलं येतात. डिसेंबर ते फेब्रुवारी हा फणसाच्या फुलांचा बहरण्याचा काळ आहे. फणसाच्या फुलांचा गुच्छ असतो आणि या गुच्छामधून मिळून एक फळ तयार होतं. म्हणून एका फणसात शंभराहून अधिक बिया (आठळ्या) असतात. नर फुले लवकर गळून पडतात, तर मादी फुलांचा सगळा भाग एकवटून लंबगोल आकारात वाढतो. आपण जो फणस बघतो तो अनेक गऱ्यांनी बनलेला असतो, हा प्रत्येक गरा म्हणजे एक लहान फळ असते, म्हणून त्या प्रत्येकात एक बी म्हणजे आठळी असते.
उंबराप्रमाणेच ज्यांची फुलं अजिबात दिसत नाही अशी झाडं म्हणजे वड आणि पिंपळ. वड म्हटला की, सर्वात आधी आपल्याला आठवतात त्या त्याच्या पारंब्या, लांबवर पसरणाऱ्या पारंब्यांमुळे वडाची वाढ होत असली तरी त्याचबरोबर त्याच्या लाल चुटूक फळांमधूनही त्याचा बीजप्रसार होतो. पण वडाच्या फुलांचा रंग कोणता? या प्रश्नाचं उत्तर कोणालाच देता येणार नाही, कारण वडाची फुलं ही उंबरासारखीच न दिसणारी असतात. जे वडाचं फळ झाडावर दिसतं, तेच प्रत्यक्षात त्याचं फूल असतं. उंबरावर येणाऱ्या सायकोनियाप्रमाणेच, या फळासारख्या दिसणाऱ्या भागात आतमध्ये शेकडो नर आणि मादी फुलं असतात. उंबराप्रमाणेच ‘युप्ररिस्टिना मसोनी’ ही वास्प या कच्च्या फळात शिरते आणि आत जाऊन अंडी घालताना परागीभवन सुरू करते. अंड्यातून बाहेर आलेल्या माशा फळातून बाहेर पडताना तिथले पुंकेसर घेऊन बाहेर पडतात आणि दुसऱ्या फळात जाऊन तिथे परागीभवन करतात. पिंपळाच्या झाडावरचीही फुले कधी दिसत नाहीत, कारण उंबर आणि वडाप्रमाणेच ती सायकोनिक असतात. एका विशिष्ट माशीद्वारेच पिंपळाच्या फुलांचं परागीभवन होतं. नंतर येणारी फळं पक्षी खातात आणि त्यांच्या विष्ठेतून पिंपळाच्या बियांचा प्रसार सर्वत्र होतो, त्यामुळेच पिंपळाची रोपं कुठेही उगवलेली पाहायला मिळतात.
थोडक्यात निसर्गाने आपली रचना करताना जे नियम बनवले आहेत, त्याला अपवादही असे केले आहेत की नियमांचा भंग होणार नाही. त्यामुळेच उंबर, वड, पिंपळ या झाडांनाही फुलं येतात पण न दिसणारी. आता याचं रहस्य कळल्यानंतर तुम्हाला जर कोणी विचारलंच की, उंबराची फुलं पाहिली आहेत का, तर बिनधास्त सांगा हो पाहिली आहेत!
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.com